Tuesday, 24 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.01.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२४ जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रीय बालिका दिवस आज साजरा होत आहे. देशात मुलींना प्रोत्साहन आणि संधी देण्याच्या उद्देशानं हा दिवस पाळला जातो. मुलींच्या अधिकारांचं आणि शिक्षणाचं महत्व तसंच त्यांच्या आरोग्य आणि पोषणाबाबत जागरुकता वाढवणं हा देखील या दिनामागचा उद्देश आहे. देशात मुलींच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्या आहेत. ज्यामध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ, आणि सुकन्या समृद्धी योजना यासारख्या योजनांचा समावेश आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त बालकांशी संवाद साधणार आहेत. काल ११ बालकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.

****

बिजनेस 20 अर्थात बी 20 ची पहिली बैठक काल गुजरातमधल्या गांधीनगर इथं घेण्यात आली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अश्विनी वैष्णव, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, जी 20 साठीचे भारताचे शेरपा अमिताभ कांत, टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन आणि अनेक राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय उद्योगांच्या प्रमुखांनी या बैठकीत सहभाग नोंदवला. बी 20 च्या या स्थापना बैठकीचा रेझ म्हणजेच- वृद्धी हा विषय आहे.

****

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत, केंद्रीय अन्वेषण विभाग- सीबीआयने दाखल केलेलं जामीनाविरोधातील अपील, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलं.

****

नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमधल्या तोफखाना केंद्रीय विद्यालयात काल परीक्षा पे चर्चा उपक्रम राबवण्यात आला. त्याअंतर्गत परीक्षेतल्या विविध समस्या आणि त्यासाठीच्या तयारीविषयी चर्चा करण्यात आली.

अहमदनगर शहरात भुईकोट किल्ल्याच्या जवळ असलेल्या केंद्रीय विद्यालय क्रमांक एक मध्ये परीक्षा पे चर्चा या सहाव्या महोत्सवानिमित्त काल चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

****

ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना या भारतीय जोडीनं मिश्र दुहेरीच्या उपांत्य पूर्व फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या सामन्यात या जोडीनं एरियल बेहेर आणि मकातो निनोमिया या जोडीचा ६-४, ७-६ असा सरळ सेटमधे पराभव केला.

//*********//

No comments: