Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 26 February
2023
Time : 07.10
AM to 07.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २६ फेब्रुवारी २०२३ सकाळी ७.१०
मि.
****
· जी ट्वेंटी अंतर्गत महिलांच्या डब्ल्यू ट्वेंटी च्या दोन दिवसीय बैठकीसाठी औरंगाबाद शहर
सज्ज
· राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय
अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात
· समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून परभणी जिल्हा पुणे आणि मुंबईला जोडण्याची केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
· पुण्यातल्या कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान
· औरंगाबादमध्ये वेरुळ - अजिंठा
आंतरराष्ट्रीय महोत्सवाला प्रारंभ, आज
उस्ताद सुजात हुसेन यांचं सतार, पद्मश्री शिवमणी यांचं ताल वादन
तर अदिती भागवतचं कथ्थक नृत्य
·
कर्ज देण्याच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी औरंगाबादमधील आदर्श महिला नागरी सहकारी बँकेसह
पाच बँकावर भारतीय रिझर्व्ह बँकेची
कारवाई, गुंतवणूक आणि ठेवी
स्वीकारण्यास मनाई
· हिंगोली जिल्ह्यात शंभर एकर जागेत लॉजिस्टिक
पार्क उभारणार
आणि
· औरंगाबादमध्ये आंतरराष्ट्रीय कौशल्य केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्नशील
असल्याची केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची
ग्वाही
****
जी ट्वेंटी अंतर्गत महिलांच्या डब्ल्यू ट्वेंटी च्या दोन दिवसीय बैठकीसाठी औरंगाबाद शहर
सज्ज झालं आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली W20 ची पाच प्राधान्य क्षेत्रं निश्चित करण्यात आली आहेत, ज्यात, उद्योजक
महिला, तळागाळातील महिला नेतृत्व, डिजिटल लैंगिक समानता, शिक्षण आणि कौशल्य विकास आणि हवामान बदलावरच्या उपाययोजनेवर कृती समूहात महिला
आणि मुलींचा परिवर्तनकर्त्या म्हणून समावेश, यांचा समावेश आहे. औरंगाबाद इथं होत असलेल्या या बैठकीची संकल्पना ‘स्त्रियांच्या नेतृत्वाखालील विकासासाठी लिंग समानता, समानता आणि प्रतिष्ठेचा पाठपुरावा अशी आहे. या लिंग-संबंधित
समस्यांवर लक्ष केंद्रित करणारी चर्चा, विचारविनिमय आणि एक ठोस धोरण विकसित करणं, हे या बैठकीचं उद्दिष्ट आहे. या बैठकीला दीडशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित
राहणार असून, कालपासून हे प्रतिनिधी
शहरात दाखल होण्यास सुरुवात
झाली आहे.
****
राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. २४
मार्चपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात ९ मार्च ला अर्थसंकल्प सादर होईल. राज्यपाल
रमेश बैस यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला प्रारंभ होईल.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सर्वपक्षीय चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात
आला आहे.
दरम्यान त्यापूर्वी आज दुपारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक विधानभवनात होणार आहे. त्यानंतर
विरोधी पक्षनेते अजित पवार अधिवेशनासंदर्भात महाविकास आघाडीचं धोरण जाहीर
करतील.
****
समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून परभणी जिल्हा हा पुणे
आणि मुंबईला जोडणार असल्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. परभणी इथं जिल्ह्यातल्या विविध महामार्गांचं चौपदरीकरण आणि सुधारणा कामाचं
भूमिपूजन तसंच कोनशीला अनावरण काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात आगामी काळात सर्व राष्ट्रीय महामार्ग आणि
मंत्रालयाच्या माध्यमातून बांधले जाणारे सर्व रस्ते, सिमेंटचेच बांधण्यात येतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. जिल्ह्यातले
विविध रस्ते, पुलांसाठी निधीच्या
मंजुरीसह गंगाखेड-लातूर राज्य महामार्गाचा रेल्वे उड्डाणपूल मंजूर केल्याची घोषणा
गडकरी यांनी यावेळी केली. गंगाखेड वळण रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गाच्या
प्रकल्पात समाविष्ट करुन हे काम करण्यात येईल तसंच परभणी शहरातल्या मुख्य
रस्त्याचं विस्तारीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा गडकरी यांनी
यावेळी केली.
****
पुण्यातल्या कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस
बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
****
औरंगाबाद इथं कालपासून वेरुळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाला प्रारंभ झाला.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन
झालं. जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. डॉ
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात असलेल्या सोनेरी महालाच्या
प्रांगणात आयोजित या तीन दिवसीय महोत्सवाला काल मयूर वैद्य आणि मृण्मयी देशपांडे
यांच्या कथ्थक नृत्यानं
सुरुवात झाली. प्रार्थना बेहरेचं भरतनाट्यम् आणि भार्गवी चिरमुले यांचं लावणी
सादरीकरण झालं. पद्मभूषण पंडित राशिद खान, महेश काळे यांचं गायन आणि पद्मश्री विजय घाटे, पंडित राकेश चौरसिया यांच्या तबला आणि बासरीची जुगलबंदी काल रसिकांना अनुभवायला मिळाली.
आज या महोत्सवात तबला वादक अमित चौबे आणि मुकेश जाधव यांच्यासह
उस्ताद सुजात हुसेन यांचं सतार वादन, पद्मश्री शिवमणी यांचं ड्रम वादन, रवी चारी यांच
सतार वादन, संगीत हल्दीपूर यांचं पियानो, सेल्वा गणेश यांचं खंजीर वादन सादर करणार
आहेत. याशिवाय सेल्डॉन डिसिल्वा बास गिटार सादर करतील तर अदिती भागवत कथ्थक नृत्य पेश
करणार आहेत.
****
नांदेड इथल्या संगीत शंकर दरबारचं आज प्रसिद्ध सतारवादक पंडित नयन घोष यांच्या
हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यापूर्वी सायंकाळी साडे पाच वाजता शहनाईवादक कल्याण
अपार यांच्या सादरीकरणानं महोत्सवाला सुरवात होईल. उद्घाटनानंतर पंडित घोष यांचं
सतारवादन आणि त्यानंतर प्रसिद्ध गायिका सावनी शेंडे यांचं शास्त्रीय गायन होणार
आहे. या समारंभात आज सीताभाभी राममोहनराव यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार
आहे. यशवंत महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर हे कार्यक्रम होणार आहेत.
****
कर्ज देण्यासह इतर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेनं
देशातल्या पाच सहकारी बँकांवर निर्बंध घातले आहेत. या बँकांना कर्ज देण्यास, गुंतवणूक करण्यास किंवा ठेवी स्वीकारण्यास मनाई करण्यात आली
आहे. या बँकांच्या ग्राहकांसाठी रिझर्व्ह बँकेनं पैसे काढण्याबाबत मार्गदर्शक
तत्त्वंही जारी केली आहेत. यामध्ये औरंगाबाद इथली आदर्श महिला नागरी सहकारी बँक
तसंच सोलापूरच्या शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेचा समावेश आहे. इतर तीन बँका
उत्तरप्रदेश, कर्नाटक तसंच
आंध्रप्रदेशातल्या आहेत. आदर्श महिला बँकेतून ठेवीदार सध्या पैसे काढू शकणार नाहीत, मोहिते पाटील बँकेचे ग्राहक मात्र आपल्या खात्यातून पाच
हजार रुपयांपर्यंत पैसे काढू शकतील, असं
या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सर्व बँकांचे पात्र ठेवीदार ठेव विमा आणि क्रेडिट
गॅरंटी कॉर्पोरेशनकडून पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेव विमा दाव्याची रक्कम मिळण्यास
पात्र असतील असंही रिझर्व्ह बँकेनं सांगितलं आहे. हे निर्बंध सहा महिने लागू
राहणार आहेत.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल अवमानकारक वृत्त
प्रसिद्ध करणाऱ्या एका खाजगी वृत्त वाहिनीचे संपादक आणि भारतीय जनता पक्षाचे
प्रवक्ते केशव उपाध्ये यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं कायदेशीर नोटीस
बजावण्यात आली आहे. पुण्यात २२ फेब्रुवारीला पवार यांनी जनतेशी संवाद साधला होता
त्यातील काही संवाद बदलून ते या वृत्तवाहिनीवर दाखवण्यात आले. दरम्यान हीच बातमी
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सामाजिक माध्यमांवर टाकली, हा संपूर्ण प्रकार मुद्दाम केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे
सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी ही कायदेशीर नोटीस बजावली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ९८वा भाग असेल. आकाशवाणी आणि
दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
हळदीसाठी प्रसिद्ध असलेला हिंगोली जिल्हा या जिल्हात शंभर एकर जागेत लॉजिस्टिक पार्क उभारला जाणार असून त्यात हळद क्लस्टर साठी
मोठा वाव देता येणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. हिंगोली इथं रामलीला मैदानावर महामार्गांच्या रस्ते
लोकार्पण कार्यक्रमात काल ते बोलत होते.
नव्यानं मंजूर झालेल्या इंदौर -
जबलपूर या राष्ट्रीय महामार्गामुळे हिंगोली आणि
नांदेड जिल्ह्यातील जनतेचा मोठा फायदा होणार असल्याचं ते म्हणाले. जिल्ह्यातील नरसी नामदेव इथं संत नामदेव महाराजांच्या
मंदिराच्या रस्त्याला केंद्रीय मार्ग निधीनं मंजुरी दिल्याची घोषणा त्यांनी यावेळी
केली, तर भेंडेगाव उड्डाणपुलासाठी ७५ कोटी
रुपयांचा निधी, बासंबा फाटा पुलासाठी वीस
कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही
यावेळी परिवहन मंत्री गडकरी यांनी केली.
****
जी-20 जागतिक परिषद आणि आंतरराष्ट्रीय तृणधान्य विषयक जनजागृती करण्यासाठी
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान महिला स्वयंसहायता समूहाद्वारे काल
औरंगाबाद जिल्ह्यात गाव पातळीवर प्रभात फेरी काढून ग्रामस्थांमध्ये जनजागृती
करण्यात आली. स्वयंसहायता समूहातील सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी गावात प्रभात फेरी
काढून हर घर नर्सरीचा शुभारंभ केला. प्रभातफेरीत सहभागी स्वयंसहायता समूहातल्या
महिलांनी ग्रामस्थांना तृणधान्य आणि नर्सरी बाबत मार्गदर्शनही यावेळी केलं.
जिल्ह्यात तृणधान्य पिकांचं क्षेत्र वाढावं आणि ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांनी
नर्सरीमध्ये भाजीपाल्याची आणि इतर फळांची झाडं लावून जोपासणी करण्याचं आवाहन
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केलं आहे.
****
औरंगाबाद शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर थुंकणं, केरकचरा टाकणं आणि मलमूत्र विसर्जन करणाऱ्या ६० उपद्रवी व्यक्तींवर पोलिस
प्रशासनानं कारवाई केली आहे. तसंच त्यांच्यावर महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ११५
अन्वये न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबाद शहरात G-20
परिषदेच्या अनुषंगानं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे. त्याचं विद्रुपीकरण
करणाऱ्यांवर आता पोलिस प्रशासनाच्या वतीनं कारवाई करण्यात येत आहे. शहर
आयुक्तालयाच्या हद्दीतल्या विविध पोलिस ठाण्याच्या वतीनं ही कारवाई करण्यात येत
आहे. नागरिकांनी अशा प्रकारे गैरवर्तन करु नये तसंच इतरांना देखील परवृत्त
करण्याचं आवाहन औरंगाबाद पोलिस आयुक्त कार्यालयातल्या गुन्हेशाखेचे पोलिस निरिक्षक
अविनाश आघाव यांनी केलं आहे.
****
W-20 बैठकीच्या महिला सदस्य वेरुळ लेणीला भेट देणार असल्यानं
या मार्गावरील वाहतुकीत पुढील दोन दिवसांसाठी बदल करण्यात आला आहे. औरंगाबाद -
दौलताबाद - मार्गे वेरुळ - कन्नडकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक आता औरंगाबाद -
दौलताबाद टी पॉंईट - कसाबखेडा वेरुळ मार्गे कन्नडकडे जाणार आहे. तर फुलंब्री -
खुलताबाद मार्गे वेरुळला जाणारी सर्व प्रकारची वाहतूक फुलंब्री - औरंगाबाद - नगरनाका - दौलताबाद टी
पॉंईट - कसाबखेडा - वेरुळ मार्गे जाणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक कार्यालय
ग्रामीणच्या वतीनं देण्यात आली आहे.
****
कृषी विभागानं योजनांच्या अंमलबजावणीचा ‘लातूर पॅटर्न’ विकसित
करावा, असं लातूरचे जिल्हाधिकारी
पृथ्वीराज बी. पी. यांनी म्हटलं आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा-आत्मा
आणि श्री सिध्देश्वर - रत्नेश्वर देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात
आलेल्या श्री सिद्धेश्वर कृषि महोत्सव २०२३चं उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते
काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. सोयाबीनचा ‘लातूर ब्रॅंड’ विकसित करण्यासाठी कृषी विभागाने लातूर जिल्ह्यासाठी
सोयाबीनचे स्वतंत्र वाण विकसित करण्याचे प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी केली.
‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या पार्श्वभूमीवर या
कृषी महोत्सवातही तृणधान्य विषयक माहिती देण्यासाठी स्वतंत्र दालन, ‘मिलेट हाऊस’ उभारण्यात
आलं आहे. महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचं स्वागत ज्वारी, बाजरीची कणसं आणि सूर्यफुल यापासून बनवलेला पुष्पगुच्छ देऊन
करण्यात आलं.
****
देशात तीस नवीन आंतरराष्ट्रीय कौशल्य केंद्र सुरु होणार असून औरंगाबाद मध्ये
त्यातील एक केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही केंद्रीय अर्थ
राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली आहे. औरंगाबाद इथं भारतीय जनता पक्षाच्या
वतीनं घेण्यात आलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा तसंच कौशल्य विकास
रोजगार, स्वयंरोजगार आणि समृद्धी
मेळाव्यात बोलत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात १० लाख कोटी निधी हा उद्योग आणि नव
उद्योगांसाठी मंजूर करण्यात आला आहे. देशात जवळपास ९० हजार स्टार्टअप सुरु झाले
आहेत. त्यामुळे युवकांनी, नोकरी
देणारे होण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन व्यवसाय सुरु
करण्याचं आवाहन डॉ. कराड यांनी यावेळी केलं.
या रोजगार मेळाव्यात ४० हून जास्त कंपन्या आणि शासनाचे विविध महामंडळ सहभागी
झाले.
****
नांदेड जिल्ह्यात बिलोली इथं अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयातल्या आधुनिक
सोयी-सुविधांमुळे कामाचा दर्जा अधिक वाढणार असून न्यायदानाचं कार्य अधिक गतिमान
होईल, असं न्यायमूर्ती नितीन
सूर्यवंशी यांनी म्हटलं आहे. बिलोली इथल्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र
न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी काल ते बोलत होते. न्यायदानाचं काम
कमी मनुष्यबळात आणि कमी वेळेत होण्यासाठी सर्व विधीज्ञांनी ई-कोर्ट सुविधेचा
स्वीकार केला पाहिजे असं त्यांनी ते यावेळी सांगितलं.
****
शिक्षणातून स्वत:च्या आयुष्याचे प्रश्न सुटायला हवे अश्या शिक्षणाची आज गरज
असल्याचं ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर
प्रल्हाद लुलेकर यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथल्या देवगिरी महाविद्यालयातल्या
फुले- शाहू- आंबेडकर व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी फुले शाहू आंबेडकर यांच्या
विचारांची प्रासंगिकता या विषयावरील व्याख्यानात काल ते बोलत होते. फुले, शाहू आणि आंबेडकर या विचारवंतांनी
भौतिक तत्वज्ञानाची शिकवण सर्वसामान्यांना दिली असल्याचं ते यावेळी म्हणाले.
****
No comments:
Post a Comment