Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 February 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ फेब्रुवारी २०२३ सायंकाळी
६.१०
****
·
हळदीसाठी
प्रसिद्ध असलेला हिंगोली जिल्हा जगाच्या नकाशावर पोहचवा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांचं आवाहन.
·
रिझर्व्ह
बँकेने देशातील पाच सहकारी बँकांवर निर्बंध; औरंगाबाद इथल्या आदर्श महिला नागरी सहकारी
बँक तसंच सोलापूरच्या शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेचा समावेश.
·
औरंगाबाद
इथं आजपासून वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाला प्रारंभ.
आणि
·
रस्त्यांवर
थुंकणाऱ्या ६० जणांवर औरंगाबाद पोलिसांची कारवाई.
****
हळदीसाठी प्रसिद्ध असलेला हिंगोली जिल्हा जगाच्या नकाशावर
पोहचवा असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. हिंगोली इथं रामलीला
मैदानावर महामार्गांच्या रस्ते लोकार्पण कार्यक्रमात ते आज बोलत होते. शहरात शंभर एकर
जागेत लॉजिस्टिक पार्क उभारला जाणार असून त्यात हळद क्लस्टर साठी मोठा वाव देता येणार
असल्याचं त्यांनी सांगितलं. नव्याने मंजूर झालेल्या इंदौर - जबलपूर या राष्ट्रीय महामार्गामुळे
हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील जनतेचा मोठा फायदा होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
जिल्ह्यातील नरसी नामदेव इथं संत नामदेव महाराजांच्या मंदिराच्या रस्त्याला केंद्रीय
मार्ग निधीनं मंजुरी दिल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली असून भेंडेगाव उड्डाणपुलासाठी
७५ कोटी रुपयांचा निधी, बासंबा फाटा पुलासाठी वीस कोटींचा निधी देण्याची घोषणाही यावेळी
परिवहन मंत्री गडकरी यांनी केली.
दरम्यान, या कार्यक्रमात वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं,
शासनानं राष्ट्रीय महामार्ग १६१ च्या चौपदरीकरणासाठी ताब्यात घेण्यात आलेल्या जमिनींचा
मोबादला दिल्या नसल्याचा आरोप करत गोंधळ घातला. पोलिसांनी त्या शेतकऱ्याला ताब्यात
घेतलं असून अन्य दोन शेतकऱ्यांची निवेदनं घेतली आहेत. राष्ट्रीय महामार्ग १६१ च्या
चौपदरीकरणात सीमांकनाबाहेरील जमिनी दाखवून काहींना मोबदला दिला तर पोटखराब जमिनी गहाळ
करून मोबदला दिला नसल्याची तक्रार या शेतकऱ्यांनी केली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय
चौकशीची मागणी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून केली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल
अवमानकारक वृत्त प्रसिद्ध करणाऱ्या एका खाजगी वृत्त वाहिनीचे संपादक आणि भारतीय जनता
पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कायदेशीर नोटीस
बजावण्यात आली आहे. पुण्यात २२ फेब्रुवारीला पवार यांनी जनतेशी संवाद साधला होता त्यातील
काही संवाद बदलून ते या वृत्तवाहिनीवर दाखवण्यात आले. दरम्यान हीच बातमी भाजप प्रवक्ते
केशव उपाध्ये यांनी सामाजिक माध्यमांवर टाकली, हा संपूर्ण प्रकार मुद्दाम केल्याचा
आरोप करत राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी ही कायदेशीर नोटीस बजावली आहे.
****
कर्ज देण्यासह इतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय
रिझर्व्ह बँकेने देशातील पाच सहकारी बँकांवर बंदी घातली आहे. या बँकांना कर्ज देण्यास,
गुंतवणूक करण्यास किंवा ठेवी स्वीकारण्यास मनाई करण्यात आली आहे. या बँकांच्या ग्राहकांसाठी
रिझर्व्ह बँकेने पैसे काढण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. यामध्ये औरंगाबाद
इथली आदर्श महिला नागरी सहकारी बँक तसंच सोलापूरच्या शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेचा
समावेश आहे. इतर तीन बँका उत्तर प्रदेश, कर्नाटक तसंच आंध्र प्रदेशातल्या आहेत. आदर्श
महिला बँकेतून ठेवीदार सध्या पैसे काढू शकणार नाहीत, मोहिते पाटील बँकेचे ग्राहक मात्र
आपल्या खात्यातून पाच हजार रुपयांपर्यंत पैसे काढू शकतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे. सर्व बँकांचे पात्र ठेवीदार ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून पाच लाख
रुपयांपर्यंतच्या ठेव विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र असतील असंही रिझर्व्ह बँकेनं
सांगितलं आहे. हे निर्बंध सहा महिने लागू राहणार आहेत.
****
गावांच्या विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू दिला जाणार
नाही असं राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. ते आज
सातारा जिल्ह्यात पाटण तालूक्यात दौलतनगर इथं एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्धाटनप्रसंगी
बोलत होते. जिल्ह्यात आदर्श शाळा आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र हा उपक्रम राबवण्यात
येणार असून यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर भौतिक
सुविधा उपलब्ध होणार तसंच स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रामुळं ग्रामीण भागातील नागरिकांना
दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार आहेत. या दोन्ही उपक्रमांमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत
सदस्यांनी सहभाग घ्यावा असंही देसाई यांनी यावेळी सांगितलं
****
देशात तीस नवीन आंतरराष्ट्रीय कौशल्य केंद्र सुरु होणार
असून औरंगाबाद मध्ये त्यातील एक केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली आहे. ते आज औरंगाबाद इथं सहकार
मंत्री अतुल सावे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं घेण्यात आलेल्या
पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा तसंच कौशल्य विकास रोजगार, स्वयंरोजगार आणि
समृद्धी मेळाव्यात बोलत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात १० लाख कोटी निधी हा उद्योग आणि
नव उद्योगांसाठी मंजूर करण्यात आला आहे. देशात जवळपास ९० हजार स्टार्टअप सुरु झाले
आहेत. त्यामुळे युवकांनी नोकरी देणारे होण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा
लाभ घेऊन व्यवसाय सुरु करण्याचं आवाहन डॉ.भागवत कराड यांनी यावेळी केलं.
या रोजगार मेळाव्यात ४० हून जास्त कंपन्या आणि शासनाचे
विविध महामंडळ सहभागी झाले.
****
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात जगरगुंडा नजीक आश्रमपारा
परिसरात आज सकाळी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जिल्हा राखीव गट डीआरजी
चे तीन सैनिक हुतात्मा झाले. आश्रम पारा परिसरात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर
शोधमोहीम राबवत असतांना नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात रामूराम नाग, कुंजम जोगा
आणि वंजम भीमा हे तीन सैनिक हुतात्मा झाले. दरम्यान या भागात नक्षलवाद्यांचा शोध सुरु
असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील शर्मा यांनी दिली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात
या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ९८वा भाग असेल.
आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित
होईल.
****
औरंगाबाद इथं आजपासून वेरुळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाला
सुरुवात झाली आहे. सोनेरी महलात होणाऱ्या या महोत्सवात आज मयुर वैद्य आणि मृण्मयी देशपांडे
यांच्या कथ्थक नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात होईल. प्रार्थना बेहरेचं भरतनाट्यम आणि
भार्गवी चिरमुले यांचं लावणी सादरीकरण होणार आहे. पद्मभूषण पंडित राशिद खान, महेश काळे
यांचं गायन आणि पद्मश्री विजय घाटे, पंडित राकेश चौरसिया यांच्या तबला आणि बासरीची
जुगलबंदी देखील रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
****
औरंगाबाद शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर थुंकणे, केरकचरा
टाकणे आणि मलमुत्र विसर्जन करणाऱ्या ६० उपद्रवी व्यक्तींवर पोलिस प्रशासनानं कारवाई
केली आहे. तसंच त्यांच्यावर महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ११५ अन्वये न्यायालयात खटला
दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद शहरात G-20 परिषदेच्या अनुषंगानं सुशोभीकरण करण्यात
आलेलं आहे. त्याचं विद्रुपीकरण करणाऱ्यांवर आता पोलिस प्रशासनाच्या वतीनं कारवाई करण्यात
येत आहे. शहर आयुक्तालयाच्या हद्दीतल्या विविध पोलिस ठाण्याच्या वतीनं ही कारवाई करण्यात
येत आहे. नागरिकांनी अशा प्रकारे गैरवर्तन करु नये तसंच इतरांना देखिल परवृत्त करण्याचं
आवाहन औरंगाबाद पोलिस आयुक्त कार्यालयातल्या गुन्हेशाखेचे पोलिस निरिक्षक अविनाश आघाव
यांनी केलं आहे.
****
औरंगाबाद इथं परवा होत असलेल्या जी-20 जागतिक परिषद आणि
आंतरराष्ट्रीय तृणधान्य विषयक जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती
अभियान महिला स्वयंसहायता समूहाद्वारे आज जिल्ह्यात गाव पातळीवर प्रभात फेरी काढून
ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. स्वयंसहायता समूहातील सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी
गावात प्रभात फेरी काढून हर घर नर्सरीचा शुभारंभ केला. प्रभातफेरीत सहभागी स्वयंसहायता
समूहातल्या महिलांनी ग्रामस्थांना तृणधान्य आणि नर्सरी बाबत मार्गदर्शनही यावेळी केलं.
जिल्ह्यात तृणधान्य पिकांचं क्षेत्र वाढावं आणि ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांनी नर्सरीमध्ये
भाजीपाल्याची आणि इतर फळांची झाडं लावून जोपासणी करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केलं आहे.
****
G-20 बैठकीच्या महिला सदस्य वेरुळ लेणीला भेट देणार असल्यानं
या मार्गावरील वाहतूकीत पुढील दोन दिवसांसाठी बदल करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment