Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 23 February 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २३ फेब्रुवारी
२०२३ दुपारी १.०० वा.
****
राज्यातल्या
सत्तासंघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी
होत आहे. सकाळच्या सत्रात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. राज्यपालांनी
एकनाथ शिंदे यांना सत्तास्थापनेसाठी बोलावणं, शिंदे गटाकडून प्रतोदाची केलेली निवड,
बहुमताचा आकडा, या विषयावर त्यांनी भाष्य केलं.
****
यंदाचा अर्थसंकल्प
देशातले गुंतवणूकदार आणि नागरीकांना हरित विकासाकडे वाटचाल करून त्यांचं भविष्य सुरक्षित
करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून देतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
हरित विकासासंदर्भातल्या अर्थसंकल्पपश्र्चात पहिल्या वेबिनारला संबोधित करताना ते आज
बोलत होते. भारताला जागतिक हरित ऊर्जा बाजारपेठेत एक जागतिक शक्ती म्हणून स्थान निर्माण
करण्याच्या दृष्टीनं हा अर्थसंकल्प उपयुक्त असेल, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी
व्यक्त केला. केंद्र सरकारनं आतापर्यंत सादर केलेल्या अर्थसंकल्पांमध्ये वर्तमानातल्या
आव्हानांवरच्या उपाययोजना शोधण्याबरोबरच नव्या युगातल्या सुधारणांना पुढे नेण्याचं
काम केलं, असं ते म्हणाले. सरकार जैव इंधनावर भर देत असून, गोवर्धन योजना महत्त्वपूर्ण
आहे. सरकार पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मीतीला देखील प्रोत्साहन देत असल्याचं त्यांनी सांगितलं.
नवीकरणीय ऊर्जा उत्पादनात वाढ, जीवाश्म इंधनांचा वापर कमी करणं, वायू आधारित अर्थव्यवस्थेकडे
वाटचाल करणं, हे भारताच्या धोरणाचे तीन मुख्य सूत्र असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
अर्थसंकल्पात
करण्यात आलेल्या घोषणांच्या अंमलबजावणीबाबत विविध सूचना जाणून घेण्याच्या उद्देशानं
केंद्र सरकारच्या वतीनं १२ वेबिनार आयोजित करण्यात येणार आहेत. आजचा हरित विकासासंदर्भातला
वेबिनार हा त्याचाच एक भाग आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात सप्तर्षी म्हणजेच सर्वाधिक प्राधान्याच्या
सात विषयांवर या वेबिनार मध्ये विचारमंथन केलं जाणार आहे.
****
आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त आज उस्मानाबाद इथं
मिलेट रॅली काढण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि जिल्हा कृषी अधिक्षक अभिमन्यू काशीद यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून
रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी तृणधान्यांचे महत्त्व सांगणारे फलक विद्यार्थ्यांनी
आणि कृषी कर्मचाऱ्यांनी हातात घेऊन त्याच्या घोषणा देऊन जनजागृती केली. तसंच कृषी कर्मचाऱ्यांनी
ज्वारी, बाजरी, नाचणी यासारख्या तृण धान्याचे
पोशाख परिधान केले होते आणि तृणधान्यापासून बनवलेली रांगोळीही काढण्यात आली
होती. ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखी तृणधान्यांची मागणी वाढून त्याचं उत्पादन घेणाऱ्या
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली पाहीजे,
हा या रॅलीचा हेतू असल्याचं जिल्हा कृषी अधीक्षक काशीद यांनी यावेळी सांगितलं.
****
पौष्टिक
तृणधान्य वर्षानिमित्त मुंबईत आयोजित मिलेट विपणन आणि मुल्यसाखळी या राज्यस्तरीय परिषदेचं
उद्घाटन काल पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांच्या हस्ते झालं. राज्यात पौष्टिक
तृणधान्य पणन आणि मूल्यसाखळी कार्यक्रम राबवणार असल्याचं, कुमार यांनी यावेळी सांगितलं.
तृणधान्यांना भविष्यासाठी अन्नाचा पर्याय बनवणं, ही काळाची गरज असून, या पीकांच्या
आरोग्यविषयक फायद्यांबाबत लोकांमध्ये जनजागृती करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.
****
नाशिक जिल्ह्यात
इगतपुरी तालुक्यात घोटी इथल्या जिंदाल कंपनीत एक जानेवारीला लागलेल्या आग प्रकरणी नाशिक
पोलिसांनी कंपनीच्या व्यवस्थापनामधल्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जिंदाल
पॉलिफिल्म या कंपनीचे भोगवटादार संजीव सक्सेना, फॅक्टरी मॅनेजर विद्याधर नरहरी मधूआल
यांच्यासह सात जणांचा यात समावेश आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला होता, तर
१७ कामगार जखमी झाले होते.
****
लातूर जिल्ह्यात
६८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूकीसाठी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी उद्या प्रसिद्ध
करण्यात येईल. उद्यापासून दोन मार्च पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. त्यानंतर
प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी नऊ मार्चला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती
उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी दिली.
****
कैरो इथं
सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्र्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या ऐश्र्वर्य प्रतापसिंग
तोमर यानं पुरुषांच्या ५० मीटर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेत चार
सुवर्णपदकांसह भारत पदक तालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.
****
दक्षिण आफ्रिकेत
सुरु असलेल्या महिला टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा उपान्त्य फेरीचा
सामना आज ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे सहा वाजता सामन्याला
सुरुवात होईल. स्पर्धेतला दुसरा उपान्त्य सामना उद्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान
होणार आहे. तर येत्या रविवारी अंतिम सामना होणार आहे.
****
No comments:
Post a Comment