Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 24 February
2023
Time : 07.10
AM to 07.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २४ फेब्रुवारी २०२३ सकाळी ७.१०
मि.
****
ठळक
बातम्या
· वर्णनात्मक
स्वरूपात राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्याचा निर्णय २०२५ पासून लागू करण्याची महाराष्ट्र
लोकसेवा आयोगाची घोषणा
· महाराष्ट्र
औद्योगिक विकास महामंडळाच्या धर्तीवर वन औद्योगिक विकास महामंडळ सुरू करणार - वनमंत्री
सुधीर मुनगंटीवार
· राज्यातील
सत्तासंघर्षामध्ये शिंदे -फडणवीस सरकारचा शपथविधी अवैध ठरवण्याची तसंच उपाध्यक्षांना
आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेऊ देण्याची ठाकरे गटाची न्यायालयाकडे मागणी, पुढची
सुनावणी येत्या २८ तारखेला होणार
· जमिनींच्या
मोजणीसाठी आणखी ५०० रोव्हर उपलब्ध करुन देण्याची महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
यांची ग्वाही
· चंद्रपूरचे
जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करुन हजर करण्याचा राष्ट्रीय आदिवासी आयोगाची आदेश
· केंद्रीय
परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री कमलकिशोर कदम यांना आज नांदेडचं स्वामी
रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ मानद डी. लिट पदवी प्रदान करणार
· औरंगाबाद
महानगरपालिकेत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत निविदा प्रक्रियेत घोटाळा करणाऱ्या तीन
कंपन्यांच्या संचालकासह १९ भागीदारांविरुद्ध
तर विविध नोकऱ्यांचं आमिष दाखवून ४५ जणांना पाच कोटी रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी
राज्य परिक्षा परिषदेच्या उपायुक्त शैलजा दराडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
आणि
· महिला
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला पाच धावांनी पराभूत करत ऑस्ट्रेलियाचा
संघ अंतिम फेरीत दाखल
सविस्तर बातम्या
वर्णनात्मक स्वरूपात राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्याचा
निर्णय २०२५ पासून लागू करण्याची घोषणा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं काल केली. आयोगानं
ट्विट संदेशाच्या माध्यमातून ही घोषणा केली. परिक्षार्थींची मागणी, कायदा आणि सुव्यवस्थेची
निर्माण झालेली परिस्थिती, तसंच उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी
विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं आयोगानं या संदेशात म्हटलं आहे.
आयोगाच्या या निर्णयाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
समाधान व्यक्त केलं आहे. याबाबत अहमदनगरमध्ये वार्ताहरांशी बोलतांना ते म्हणाले....
आयोगाच्या
निर्णयाचं स्वागत आहे. शासन देखील विद्यार्थ्यांच्या भुमिकेशी सहमत होतं, आणि म्हणून
आम्ही एमपीएससीला देखील विनंती केली होती. त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला आहे. त्याबद्दल
मी त्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे याच्यामध्ये आम्हाला कुठलंही राजकीय श्रेय घ्यायचं
नव्हतं, घ्यायची आवश्यकताही नाही. परंतू काही लोक त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या
आडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत होते. नवीन अभ्यासक्रमाचा ऑब्जेक्टिव्ह ते डिस्क्रिप्टिव्ह
हा निर्णय पुर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. तरी सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांची
भावना लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करुन आम्ही सकारात्मक भुमिका घेतली
होती.
****
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या धर्तीवर आता वन
औद्योगिक विकास महामंडळ - एफ आय डी सी सुरू करण्यात येईल, अशी घोषणा, राज्याचे वनमंत्री
सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. नागपूर इथं काल वन विकास महामंडळाच्या विभागीय क्रीडा
स्पर्धेचं पुरस्कार वितरण केल्यानंतर ते बोलत होते. या माध्यमातून वन आधारित उद्योगांना
चालना देण्यात येणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. लवकरच वन विभागाच्या आणि वन विभाग
विरुद्ध वन विकास महामंडळ अशा विभागीय क्रीडा स्पर्धा घेण्यात येतील, असं ते म्हणाले.
नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार दोन हजार ५५० वर्ग किलोमीटरचं वनक्षेत्र
महाराष्ट्रात वाढलं आहे, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या
पाच सदस्यीय घटनापीठापुढे काल सकाळच्या सत्रात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी,
आणि नंतर अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना
सत्तास्थापनेसाठी बोलावणं, शिंदे गटाकडून प्रतोदाची केलेली निवड, बहुमताचा आकडा, या
विषयावर सिब्बल यांनी भाष्य केलं. तर, दहाव्या सूचीचा उद्देशच आपण विसरत आहोत, आमदारांवर
अपात्रतेच्या कारवाईबाबत आणि नव्या सरकारला विश्वासदर्शक ठराव मांडण्याची अनुमती देण्याबाबत,
जुलैमधे न्यायालयानं दिलेल्या दोन आदेशांची अटळ परिणती म्हणून नवं सरकार स्थापन झालं,
असं सिंघवी यांनी न्यायलयाला सांगितलं. प्रारंभीची गोष्टच कायद्याच्या दृष्टीनं चुकीची
असेल, तर त्यामुळे घडणाऱ्या पुढच्या सगळ्या गोष्टी बेकायदेशीर ठरतात, हेच तत्व न्यायालयीन
आदेशालाही लागू पडतं, असं ते म्हणाले. शिंदे -फडणवीस सरकारचा शपथविधी अवैध ठरवावा आणि
विधानसभेच्या उपाध्यक्षांना शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय देण्याची मुभा
द्यावी, अशी मागणी देखील सिंघवी यांनी केली. या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या २८
तारखेला होणार आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे
यांनी काल मुंबईत राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या
आमदारांची बैठक घेतली. ठाकरे गटाचे १६ आमदार यावेळी उपस्थित होते. विरोधी गटाने व्हीप
बजावला आणि आमदारकी धोक्यात आली, तरीही कायम ठाकरे गटासोबतच राहू असा विश्वास या आमदारांनी
यावेळी दिलं. कायदेशीर लढाई मी लढेन, आमदारांनी मतदारसंघाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं,
ते प्रश्न सभागृहात मांडावे, अशी सूचना ठाकरे यांनी यावेळी केली.
****
महसूल आणि वन विभागाच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्यात लोणी
इथं आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय महसूल परिषदेचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या उपस्थितीत काल झाला. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत महसुली कामकाज जलद आणि पारदर्शी
करण्यात यावं, जलयुक्त शिवार, घरकुल आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनांच्या अंमलबजावणींना
प्राधान्य देत, त्या अभियान म्हणून राबवाव्यात, अशी अपेक्षा, त्यांनी यावेळी व्यक्त
केली. राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांत राबवण्यात येत असलेल्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांची
दखल घेत, ते प्रकल्प राज्यपातळीवर पथदर्शी प्रकल्प स्वरुपात राबवावेत, असं फडणवीस यांनी
यावेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले.
या परिषदेच्या समारोपानंतर वार्ताहरांशी बोलताना महसूल
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी, जमिनींच्या मोजणीसाठी रोव्हर पध्दतीला मिळत
असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन आणखी ५०० रोव्हर उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची
माहिती दिली. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करुन, ई-चावडी, ई-मोजणी, ई-पीकपाहाणी, डॅशबोर्डच्या
माध्यमातून महसूल विभागाची पारदर्शकता ठळकपणे दिसून येईल, असा आशावाद व्यक्त करतानाच,
ग्रामीण भागात पाणंद रस्ते, शिवरस्ते, शिवाररस्ते खुले करण्यासाठी सहा महिन्यांचा
कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं.
****
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करुन हजर
करण्याचा आदेश, राष्ट्रीय आदिवासी आयोगानं दिला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातल्या
कुसुंबी गावातल्या आदिवासींच्या जमीन प्रकरणात हा आदेश देण्यात आला आहे. एका सिमेंट
कंपनीनं ही जमीन बेकायदेशीररित्या संपादित केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. राष्ट्रीय
अनुसूचित जाती-जमाती आयोगानं समन्स जारी करुनही त्याचं पालन न केल्याप्रकरणी आयोगानं
हा आदेश दिला आहे.
****
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना आज नांदेडच्या
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात मानद डी लिट पदवी
प्रदान करण्यात येणार आहे. राज्याचे माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनाही या दीक्षांत
समारंभात मानद डी. लिट पदवी प्रदान करण्यात येणार आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेशकुमार
बैस या समारंभास उपस्थित राहणार आहेत. १८ हजार ९२६ विद्यार्थ्यांना या दीक्षांत समारंभात
पदवी प्रदान करण्यात येईल.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आज नांदेडच्या अभिनव भारत
शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमालाही उपस्थित राहणार आहेत, त्यानंतर गुरुद्वारा
बोर्ड मैदान इथं राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचा कोनशिला समारंभ त्यांच्या उपस्थितीत
होणार आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिकेनं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सुमारे
३९ हजार घरांचा सविस्तर प्रकल्प अहवाल- डीपीआर तयार करुन निविदा प्रक्रिया पूर्ण केली.
मात्र या प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर आला असून, तीन कंपन्यांच्या संचालकासह १९ भागीदारांविरुद्ध
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन उपसमित्यांनी आणि महानगरपालिकेच्या समितीने या प्रकरणात
सविस्तर चौकशी करुन अहवाल सादर केला होता. त्यानंतर या निविदा रद्द करण्याचे आदेश शासनाने
काढलेहोते.
****
आंतरराष्ट्रीय पौष्टीक भरडधान्य वर्ष २०२३ अंतर्गत कृषि
विभागाच्या वतीनं उस्मानाबाद इथं भरडधान्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्वारी,
बाजरी, नाचणी या भरडधान्याचा रोजच्या आहारात वापर वाढावा तसंच शेतकऱ्यांनी या पिकाचं जास्तीत जास्त उत्पादन घ्यावं,
हा या जनजागृती फेरी मागचा प्रमुख हेतू असल्याचं, जिल्हा कृषी अधीक्षक अभिमन्यू काशीद
यांनी सांगितलं. ते म्हणाले...
यामध्ये आपण रॅलीच्या मार्फत पौष्टिक
तृणधान्याचं महत्व, ज्वारीचं महत्व
आणि त्यापासून काय काय पदार्थ बनवू शकतो, या सर्व गोष्टींची माहिती आपण शेतकऱ्यांपर्यंत,
नागरीकांपर्यंत पोहोचवणार आहोत. यामध्ये आपण वेगवेगळे कार्यक्रम जसं की पाककला स्पर्धा
असेल, मिलेट रन असेल, यानंतर वेगवेगळ्या
स्पर्धेच्या माध्यमातून या पूर्ण वर्षभरामध्ये आपण प्रचार, प्रसिद्धीचं काम करणार आहोत.
या रॅलीत विद्यार्थ्यांनी आणि कृषी कर्मचाऱ्यांनी भरडधान्याचं
महत्त्व सांगणारे फलक घेऊन जनजागृती केली. तसंच कृषी कर्मचाऱ्यांनी यावेळी ज्वारी,
बाजरी, नाचणी या भरडधान्याचे पोशाख परिधान केले होते.
****
विविध नोकऱ्यांचं आमिष दाखवून ४५ जणांना पाच कोटी रुपयांचा
गंडा घातल्याप्रकरणी राज्य परिक्षा परिषदेच्या उपायुक्त शैलजा दराडे यांच्याविरुद्ध
गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात सांगली जिल्ह्यातल्या शिक्षकाने फिर्याद दिली होती.
शैलजा यांचे भाऊ दादासाहेब दराडे यांनी, शैलजा ता शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी
असल्याचं सांगून, फिर्यादीच्या दोन वहिनींना शिक्षक म्हणून नोकरी लावण्याचं आमिष दाखवलं
आणि त्यांच्याकडून २७ लाख रुपये घेतले. अशाच प्रकारे त्यांनी आणखी ४४ जणांची फसवणूक
केल्याचं समोर आल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात
आला.
****
पारदर्शकता हे न्याय व्यवस्थेचं आत्मकेंद्र झालं पाहिजे,
अशी अपेक्षा, विधिज्ञ उज्जवल निकम यांनी व्यक्त केली आहे. औरंगाबाद शहरात देवगिरी महाविद्यालयात
आयोजित फुले- शाहू- आंबेडकर व्याख्यानमालेत काल ते बोलत होते. भारतीय न्यायव्यवस्था
ही पारदर्शक आहे, हे जगानं मान्य केल्याचं सांगतांना त्यांनी लोकांच्या मनातील शंकेचा
किंतू दूर करणं हे न्यायव्यवस्थेनं जपलं, तर जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील असं मत व्यक्त
केलं.
****
औरंगाबाद इथं होणाऱ्या जी २० शिखर परिषदेच्या अनुषंगानं
शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या सौंदर्यीकरण सुशोभीकरणाच्या कामाची, पालकमंत्री संदिपान
भुमरे आज पाहाणी करणार आहेत. विमानतळ परिसरापासून या पाहणीचा प्रारंभ होईल. जिल्हाधिकारी
आस्तिककुमार पांडेय आणि पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता तसंच विविध शासकीय विभागाचे
प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित असतील. दरम्यान, औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तसंच
प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी काल शहरातल्या दिल्ली गेटपासून विमानतळापर्यंतच्या
कामाची पाहणी केली.
****
जी 20 परिषदेच्या अनुषंगाने काल वेरुळ लेणी परिसरात स्वच्छता
मोहिम राबवण्यात आली. खुलताबाद तालुक्यातल्या गुरूदेव समंत भद्र विद्या मंदिर, जनार्दन
स्वामी विद्यालय, खुलताबाद नगर परिषद, पोलिस, पंचायत समिती आणि महसूल कर्मचारी, वनविभाग
आणि पुरातत्व विभागाचे कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.
****
ऑस्ट्रेलियाचा संघ महिला टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक
स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेत केपटाऊन इथं काल झालेल्या पहिल्या
उपान्त्य सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा पाच धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत
ऑस्ट्रेलियाच्या संघानं दिलेलं १७३ धावांचं लक्ष पार करताना भारतीय संघ निर्धारित षटकात
१६७ धावा करु शकला. कर्णधार हरमनप्रीत कौरनं ५२ धावा केल्या. स्पर्धेचा दुसरा उपान्त्य
सामना आज इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणार आहे.
****
भारतीय जनता पक्ष औरंगाबाद इथं उद्या पंडित दिनदयाल उपाध्याय
महारोजगार मेळावा तसंच कौशल्य विकास रोजगार, स्वयंरोजगार आणि समृद्धी मेळावा घेणार
आहे. सहकारमंत्री अतुल सावे यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या रोजगार मेळाव्यात ४० हून जास्त कंपन्या, शासनाची विविध महामंडळं सहभागी होणार आहेत.
जॉब फेअर डॉट माय एस बी ए डॉट ग्लोबल सॅपीओ डॉट कॉम या लिंकवर यासाठी नाव नोंदवावं,
असं आवाहन सावे यांनी केलं आहे.
****
जालना स्थानिक निधी लेखा विभागातल्या सहायक लेखापरीक्षकास
कार्यालयातच ३५ हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. मारुती हुलाजी
पपुलवार, असं त्याचं नाव असून, वार्षिक लेखा परीक्षणाचा अहवाल चांगला देण्यासाठी त्यानं
तक्रारदाराकडे या लाचेची मागणी केली होती.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या
वतीनं सुरु असलेल्या इयत्ता बारावीच्या परिक्षेत काल औरंगाबाद विभागात २२ विद्यार्थ्यांना
कॉपी करताना पकडण्यात आलं. त्यांच्यावर कारवाई केल्याचं मंडळाकडून सांगण्यात आलं.
****
नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव घसरले असून, शेतकरी आक्रमक
झाले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने बाजार हस्तक्षेप योजनेच्या माध्यमातून नाफेड मार्फत
कांदा खरेदी करावी, अशी मागणी करणारं पत्र केंद्र सरकारला पाठवणार असल्याचं नाशिकचे
पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. ते काल नाशिक इथं वार्ताहारंशी बोलत होते. हवामानातील
बदल, रोगांचा प्रादुर्भाव यामुळे उपलब्ध कांदा साठवता येणार नाही, ही अडचण असल्याचं
ते म्हणाले.
****
भारतीय रंगमंचाची अनादिकाळापासून परंपरा असलेल्या भरतमुनींच्या
नाट्य शास्त्राचा पुनराविष्कार होणं गरजेचं असल्याचं, दिल्ली इथल्या राष्ट्रीय संस्कृत
संस्थानचे सेवानिवृत्त कुलगुरु, राधावल्लभ त्रिपाठी यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथल्या
सरस्वती भुवन कला - वाणिज्य महाविद्यालय, दिल्ली इथली प्रतिभा सांस्कृतिक संस्था, तसंच
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं कालपासून तीन दिवसीय, `महाकवी भासभूमी रंग
उत्सव`, या नाट्य महोत्सवाला प्रारंभ झाला. त्यावेळी `नाट्यशास्त्राची प्रासंगिकता`
या विषयावर बीज भाषण करताना त्रिपाठी बोलत होते.
****
No comments:
Post a Comment