Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date : 25 February 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २५ फेब्रुवारी
२०२३ दुपारी १.०० वा.
****
यंदाच्या अर्थसंकल्पात तरुणांना आणि त्यांच्या भवितव्याला
सर्वाधिक महत्त्व देण्यात आल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
युवाशक्तीचा सदुपयोग - कौशल्य आणि शिक्षण या
विषयावरील अर्थसंकल्प पश्चात वेबिनारला, पंतप्रधान आज
संबोधित करत होते. हा अर्थसंकल्प व्यावहारिक आणि उद्योगाभिमुख
शिक्षण प्रणालीवर लक्ष केंद्रीत करतो,
आणि त्याचा पाया तयार करतो, असं ते म्हणाले. विद्यापीठांना
बळकट करण्यासाठी भारतात अनेक डिजिटल आणि तांत्रिक उपक्रम सुरू आहेत, अशा भविष्यकालीन उपाययोजनांमुळे, ज्ञान, कौशल्ये, संशोधन आणि विकासामध्ये परिवर्तन होईल,
असं पंतप्रधान म्हणाले. इंटर्नशिप संस्कृती वाढवायला हवी, असं
त्यांनी नमूद केलं. या अर्थसंकल्पात सरकारने कौशल्यनिर्मितीवर भर
दिला असून, प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या चौथ्या
टप्प्यात येत्या काही वर्षात लाखो तरुणांमध्ये कौशल्य विकास होण्यास
मदत होईल, असं पंतप्रधान म्हणाले.
***
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या
कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ९८वा भाग असेल.
आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित
होईल.
***
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार, जीवनकार्य जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी देशातलं पहिलं ‘वीर सावरकर पर्यटन सर्कीट’ राज्यात सुरु करण्यात
येणार आहे. तसंच नाशिकजवळील भगूर या स्वातंत्र्यवीर सावरकर
यांच्या जन्मस्थानी भव्य सावरकर थीम पार्क आणि संग्रहालयदेखील उभारण्यात येणार आहे,
अशी घोषणा, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा
यांनी काल मुंबईत केली. उद्या स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त
भगूर इथं भव्य अभिवादन पदयात्रा आणि सावरकर वाडा इथ मान्यवरांचे सत्कार, सावरकर लिखित गीतांचं गायन, योगेश सोमण
लिखित-दिग्दर्शित अभिवाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहितीही लोढा यांनी
यावेळी दिली.
***
देशात तीस नविन आंतरराष्ट्रीय कौशल्य आधारित केंद्र सुरु होणार असून, औरंगाबाद मध्ये त्यातील एक केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही,
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी
दिली आहे. ते आज औरंगाबाद इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं घेण्यात येत असलेल्या पंडित दिनदयाल
उपाध्याय महारोजगार मेळावा तसंच कौशल्य विकास रोजगार, स्वयंरोजगार
आणि समृद्धी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यंदाच्या
अर्थसंकल्पात १० लाख कोटी निधी हा उद्योग आणि नव उद्योगांसाठी मंजूर करण्यात आला असून,
युवकांनी नोकरी देणारे होण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ
घेऊन व्यवसाय सुरु करण्याचं आवाहन कराड यांनी केलं. या रोजगार मेळाव्यात ४० हून जास्त कंपन्या आणि शासनाचे विविध
महामंडळ सहभागी झाले आहेत. शहरातल्या सिडको एन पाच इथल्या राजीव गांधी क्रीडा संकुलाच्या
मैदानावर हा रोजगार मेळावा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत होणार आहे.
***
राज्यातल्या जनतेशी संवाद साधण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक
आणि नेते, उपनेते आजपासून
शिवगर्जना अभियान सुरु करणार असून हे अभियान तीन मार्च
पर्यंत चालणार आहे. यासाठी राज्यातल्या विविध भागांची जबाबदारी विविध नेते, उपनेते आणि लोकप्रतिनिधींवर सोपवली असल्याचं पक्षानं
प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख
मागणीसह मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत शासन स्तरावर निर्णय होत नसल्याच्या
निषेधार्थ राज्यभरातल्या जिल्हा परिषद अभियंता संघटनेने १४
मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संघटनेत राज्यातल्या ३४ जिल्हा परिषदेच्या बांधकाम, जलसंधारण आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यरत
सर्व कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आणि आरेखक संवर्गातल्या तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश
आहे.
***
जालना
शहर पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या वतीने काल बालविवाह प्रतिबंध
कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली होती. या
रॅलीत सहभागी चित्ररथामध्ये बालविवाहमुक्त
जालना जिल्हा अभियान फलकासह, श्राव्य संदेशाचाही समावेश
करण्यात आला होता.
***
औरंगाबाद
इथं आजपासून वेरुळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाला सुरुवात होत आहे. सोनेरी महलात
होणाऱ्या या महोत्सवात आज मयुर वैद्य आणि मृण्मयी देशपांडे यांच्या कथ्थक नृत्यानं
कार्यक्रमाची सुरुवात होईल. प्रार्थना बेहरेचं भरतनाट्यम आणि भार्गवी चिरमुले यांचं
लावणी सादरीकरण होणार आहे. पद्मभूषण पंडित राशिद खान, महेश काळे यांचं गायन आणि पद्मश्री
विजय घाटे, पंडित राकेश चौरसिया यांच्या तबला आणि बासरीची जुगलबंदी देखील रसिकांना
अनुभवायला मिळणार आहे.
//***********//
No comments:
Post a Comment