Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 24 February 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २४ फेब्रुवारी
२०२३ दुपारी १.०० वा.
****
कृषी
क्षेत्रातल्या आव्हानांचा सामना केला तरच देशाचा सर्वांगीण विकास होईल, असं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कृषी आणि सहकार क्षेत्रावरील
अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला ते आज संबोधित करत होते. देशाच्या अमृतकाळात सादर
झालेल्या अर्थसंकल्पाचा उद्देश कृषी आणि सहकारी क्षेत्रांना बळकटी देणं, हा
असल्याचं त्यांनी नमूद केलं. आपल्या शेतकऱ्यांनी देशाला फक्त अन्नधान्यामध्ये
स्वयंपूर्ण बनवलं नाही, तर अन्नधान्याची निर्यात करण्यातही सक्षम केलं असल्याचं ते
म्हणाले. तेलबिया आणि डाळींच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली असून,
कृषी-व्यवसाय स्टार्टअप्ससाठी वेगवान निधीची तरतूद अर्थसंकल्पात केल्याचं
पंतप्रधानांनी सांगितलं. अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणांच्या अंमलबजावणीबाबत
विविध सूचना जाणून घेण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारच्या वतीनं १२ वेबिनार आयोजित
करण्यात आले आहेत.
****
जी 20
देशांच्या अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांची बैठक आज बंगळुरू इथं
होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल
अमेरिकेचे अर्थमंत्री जेनेट येलें आणि इटलीचे अर्थमंत्री जियानकार्लो जिओर जेटी
यांची भेट घेतली. इटली, अमेरिका स्पेन, इंडोनेशिया आणि ब्रिटनसह १० देशांच्या
प्रतिनिधींशी बैठकीदरम्यान अर्थमंत्री द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
****
औरंगाबाद
इथंही जी 20 देशांच्या महिला प्रतिनिधींची बैठक परवा २६ आणि २७ तारखला होणार असून,
या प्रतिनिधींचं उद्या शहरात आगमन होणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमहीवर
जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी शहरात झालेल्या सौंदर्यीकरण कामाचा
प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.
****
माजी
आमदार देविसिंह शेखावत यांचं आज पुण्यात निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते. १९८५ ते
९० या काळात अमरावतीचे आमदार असलेले शेखावत यांनी अमरावतीचं महापौर पदही भूषवलं
होतं. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे ते पती होत. त्यांच्या निधनान राजकीय,
शैक्षणिक तसंच सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. शेखावत यांच्या पार्थिव
देहावर आज पुण्यातच अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
नांदेडच्या
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा कुलपती
रमेश बैस यांच्या ऑनलाईन उपस्थितीत सध्या सुरू आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल
काकोडकरही या समारंभाला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित आहेत. या
समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री कमलकिशोर कदम यांना मानद डी
लिट पदवी प्रदान करण्यात आली.
नांदेड
इथं अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला गडकरी उपस्थित
राहणार असून, गुरुद्वारा बोर्ड मैदान इथं राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचा कोनशिला
समारंभ गडकरी त्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
****
पुण्यातील
कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा
दिवस आहे. त्यामुळे युती आणि आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दिवसभर दुचाकी
फेरी, रोड शो, सभा, बैठका होत आहेत. या निवडणुकीसाठी परवा २६ तारखेला मतदान होणार
असून, दोन मार्चला मतमोजणी होणार आहे.
दरम्यान,
या दोन्ही मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
त्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येत असून विविध ठिकाणी भेट देऊन नागरिकांना
मतदान करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. यावेळी प्रथमच ८० वर्षांपुढील आणि दिव्यांग
मतदारांसाठी टपाली मतदानाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या देवजना इथं जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी
विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम बाल संरक्षण समितीची बैठक काल झाली.
या बैठकीत गावातील काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकांविषयी तसंच ग्राम बाल
संरक्षण समितीमध्ये नव्या २० ते ३० वयोगटातल्या युवक-युवतींची बाल मित्र म्हणून
निवड करण्यात यावी याविषयी चर्चा करण्यात आली. आणि बाल कायद्यांविषयी मार्गदर्शन
करण्यात आलं.
****
भारत
आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघादरम्यान सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी
क्रिकेट मालिकेच्या तिसऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाचं नेतृत्व स्टीव्ह स्मिथ
करणार आहे. आईच्या आजारपणामुळे मायदेशी परतलेला कर्णधार पॅट कमीन्स तिसऱ्या
सामन्यात खेळू शकणारर नाही, त्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. तिसरा कसोटी सामना
येत्या बुधवारी एक मार्चला इंदूर इथं खेळवला जाणार आहे.
****
इजिप्त
मध्ये कैरो इथं सुरु असलेल्या आयएसएसएफ जागतिक नेमबाजी स्पर्धेत २५ मीटर रॅपिड
फायर पिस्टल प्रकारात भारताच्या अनिश भानवालानं कांस्यपदक जिंकलं. या स्पर्धेत
भारत चार सुवर्ण पदकांसह पदक तालिकेत पहिल्या स्थानावर आहे.
****
No comments:
Post a Comment