Tuesday, 28 February 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.02.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 28 February 2023

Time : 07.10 AM to 07.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २८ फेब्रुवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणानं सुरुवात, पहिल्या दिवशी सहा हजार ३८४ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर 

·      मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीसंदर्भात राज्याचं शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार

·      छत्रपती संभाजीनगर मधील W-20च्या बैठकीत महिलांच्या सक्षमीकरणासह लिंग समानता वाढवणाऱ्या आणि महिला विकासाबाबत विषयपत्रिका तयार करणाऱ्या धोरणांसाठीच्या वचनबद्धतेवर चर्चा.

·      छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत सेल्फी विथ लाभार्थी उपक्रमाची सुरुवात

·      नाफेडमार्फत कांदा खरेदीला केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची मंजुरी

·      औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर तसंच उस्मानाबादचं धाराशिव नामकरण करण्याबाबतची महसूल आणि वन विभागाची अधिसूचना जारी

आणि

·      पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांना धाराशिव जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा अडीच हजार रुपये दंड

 

सविस्तर बातम्या

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं सुरुवात झाली. २०२६-२७ पर्यंत पाच लाख कोटी रुपये राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट गाठण्यात महाराष्ट्र एक लाख कोटीचं योगदान देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं, राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितलं. कोरोनानंतरच्या काळात अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करणं आणि युवकांना रोजगार द्यायला राज्य सरकारचं प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. न्यायालयीन लढाई पूर्ण करुन मराठा समाजातल्या नागरिकांना आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मराठा समाजासाठी सरकारनं केलेल्या विविध उपाययोजनांचा राज्यपालांनी यावेळी आढावा घेतला.

या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण सात विधेयकं मांडली जाणार आहेत. याशिवाय विधान परिषदेत प्रलंबित असलेली तीन विधेयकं मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. येत्या आठ मार्चला आर्थिक सर्वेक्षण आणि नऊ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.

****

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सहा हजार ३८४ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. त्यानंतर राज्यातल्या महापालिका आणि मुंबई महापालिका अधिनियमात सुधारणा करणारी विधेयकं सादर करण्यात आली. यात मुंबई महापालिकेतल्या स्वीकृत सदस्यांची संख्या पाच वरुन १० करण्याचा आणि इतर महानगरपालिकांमधल्या स्वीकृत सदस्यांची संख्या एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के, किंवा कमाल १० करण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करणारं विधेयकही यावेळी मांडण्यात आलं.

****

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी करण्याबाबतचं निवेदन सादर करण्यासाठी, राज्याचं शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत सांगितलं. विधानसभा सदस्य छगन भुजबळ यांनी मराठी राजभाषा गौरव दिना निमित्त मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. या मागणीला आशिष शेलार यांनीही अनुमोदन दिलं.

विधीमंडळ सभागृहाचं कामकाज हे प्रथा, परंपरा आणि नियमांना डावलून केलं जात असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. विविध आयुधांचा वापर करुन सदस्यांनी केलेल्या सूचना मान्य झाल्या अथवा नाही माहिती सदस्यांना मिळत नाही, कपात सूचनांची यादी सर्व सदस्यांना दिली जात नाही, दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाची माहिती रात्री बारा वाजेनंतर संकेतस्थळावर अपलोड होते, याकडे पवार यांनी लक्ष वेधलं. यावर योग्य ती सुधारणा करण्याचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं.

****

मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना देशद्रोही म्हटल्याचं सांगत विरोधकांनी काल विधानपरिषदेत हौद्यात उतरून निषेध करत घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य लोकशाहीला घातक असल्याचं  सांगितलं. हे सरकार महाराष्ट्रद्रोही असल्याचं सांगत विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला, मात्र यासाठी विरोधकांना देशद्रोही संबोधलं यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी विरोधकांनी यावेळी केली.

****

शिवसेनेच्या शिंदे गटानं आमदार विप्लव बजोरिया यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्याबाबत विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोर्हे यांना पत्र दिलं आहे. तर उद्धव ठाकरे गटानेही मुख्य प्रतोदपदी आमदार विलास पोतनीस यांची निवड करण्याचं पत्र दिलं आहे.

****

राज्यपालांच्या अभिभाषणात काही माहिती चुकीची असल्याचं सांगत राज्यपालांची दिशाभूल कोणी केली, असा प्रश्न आमदार आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. ते काल विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांच्या अटक प्रकरणावरुन बोलताना, विरोधकांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावणं हा सत्ताधाऱ्यांचा खेळ असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

****

राज्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला सभागृहात जाब विचारुन त्यांना शेतकऱ्यांना मदत द्यायला भाग पाडणार असल्याचा इशारा, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. ते विधान भवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. राज्यातलं सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असल्याची टीका त्यांनी केली. देशात विरोधी पक्षांची मुस्कटदाबी केली जात असून याबाबत जनतेत प्रचंड संताप आहे, याचा उद्रेक लवकरच दिसणार असल्याचं पटोले म्हणाले.

****

राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीला आज पुन्हा सुरुवात होत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वकीलांनी युक्तीवाद केला होता.

****

छत्रपती संभाजीनगर इथं G-20 परिषदेच्या W-20 प्रारंभिक बैठकीत काल अतिसुक्ष्म, सुक्ष्म आणि स्टार्ट अप उद्योगातील महिलांचं सक्षमीकरण, पर्यावरण बदलात महिला आणि मुलींची भूमिका, तळागाळातल्या महिला नेत्यांसाठी सक्षण प्रणाली विकसित करणं, लिंग गुणोत्तरातली दरी कमी करणं, शिक्षण आणि कौशल्य विकासातून महिला विकासाची दिशा, आणि महिलांच्या नेतृत्वात भारताचा विकास, या विषयांवर गटचर्चा झाली. G -20 नेत्यांचं घोषणापत्र आणि G20 संप्रेषणावर प्रभाव टाकणं, तसंच महिला उद्योजकांसोबत सक्रिय सहभाग सहमती निर्माण करण्यासाठी पावलं उचलणं, लिंग समानता वाढवणाऱ्या आणि महिला विकासाबाबत विषयपत्रिका तयार करणाऱ्या धोरणांसाठीच्या वचनबद्धतेवर W-20 मध्ये भर देण्यात आला.

दरम्यान, W20 बैठकीचं काल सकाळी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. G20 चे शेर्पा अमिताभ कांत, W20 च्या अध्यक्ष डॉ संध्या पुरेचा, केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ भागवत कराड, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्यासह G20 चे माजी अध्यक्ष या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते.

आज W20 प्रतिनिधी औरंगाबाद शहरातल्या ऐतिहासिक स्थळांना भेट देत आहेत. त्यानंतर चाकोरीबाहेरच्या महिलांच्या कथा या विषयावर सकाळी विशेष सत्र होणार आहे. महिला नेतृत्वात विकास: धोरण आणि कायदेशीर चौकट या विषयावर परिचर्चा होणार आहे. त्यानंतर कृती दल तसंच प्रतिनिधींच्या बैठका झाल्यावर सर्व प्रतिनिधी दुपारी वेरुळ लेण्यांना भेट देणार आहेत. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाने या दोन दिवसीय बैठकीची सांगता होणार आहे.

****

दरम्यान, W20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातल्या स्वयंसहायता गटातल्या महिलांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलला, केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी काल भेट दिली. महिलांनी तयार केलेल्या अन्न प्रक्रिया पदार्थ, हॅडलूम, शोभेच्या वस्तूची पाहणी करून इराणी यांनी या महिलांचं कौतुक केलं. केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ भागवत कराड, W20 च्या अध्यक्ष डॉ संध्या पुरेचा, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

केंद्र सरकारच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं सेल्फी विथ लाभार्थी या उपक्रमाची सुरुवात केली. हा उपक्रम देशातल्या एक कोटी महिलांपर्यंत राबवण्यात येणार आहे. यावेळी केलेल्या भाषणात इराणी यांनी केंद्र सरकारने महिलांसाठी केलेल्या योजनांची माहिती दिली.

****

नाशिक जिल्ह्यात कांद्याचे घसरलेले भाव आणि गावोगावच्या शेतकऱ्यांकडून होत असलेली आंदोलनं पाहता, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं भारतीय राष्ट्रीय कृषी विपणन महासंघ- नाफेडमार्फत कांदा खरेदीला मंजुरी दिली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रात यंदा कांद्याचे मोठ्या प्रमाणात पीक आल्याने याचा परिणामभावावर झाले आहे, कांद्याचे दर घसरले आहेत. भारती पवार यांनी ही बाब केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर लाल कांदा खरेदीला परवानगी मिळाल्याचं त्यांनी सांगितल.

दरम्यान, कांद्याचे भाव घसरत असल्याने काल लासलगाव इथं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सुरु केलेलं आंदोलन पालकमंत्री दादा भुसे यांच्या मध्यस्थीनंतर तब्बल ९ तासांनी मागे घेतलं. कांद्याला जोपर्यंत किमान ३० रुपये प्रति किलो भाव मिळणार नाही, तोपर्यंत उत्पादक आपला कांदा विकणार नाही, अशी रोखठोक भूमिका घेत काल सकाळी लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले होते.

****

वैद्यकीय प्रवेशासाठी येत्या पां मार्च ला होणाऱ्या नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्याला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी आंतरवासिता प्रशिक्षणामुळे, परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचं कारण देत, परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती याचिकेच्या माध्यमातून केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. रवींद्र भट आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या पीठानं, याबाबत दाखल सर्व याचिका फेटाळून लावत, परीक्षा पुढे  ढकलण्याची मागणी फेटाळून लावली आहे.

 ****

कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन “मराठी भाषा गौरव दिन काल विविध कार्यक्रमातून साजरा झाला. यानिमित्त मुंबईत विधानभवनात साहित्याची ज्ञानयात्रा हा कार्यक्रम घेण्यात आला. दैनंदिन कामकाजात मराठीचा जास्तीत जास्त वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं. भाषा ही प्रवाही राहिली पाहिजे, भाषेत शब्दांची देवाण घेवाण होत राहिली पाहिजे, असं त्यांनी नमूद केलं. दोन हजार वर्षांचा इतिहास असलेली मराठी भाषा दिवसेंदिवस प्रगल्भ होत जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान इथं कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. शहरातून ग्रंथ दिंडी काढण्यात आली, यात ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

छत्रपती संभाजीनगर इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा आणि वाङमय विभागात काल विशेष कार्यक्रम घेण्यात आला. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी यावेळी बोलताना, दहा कोटीहून अधिक लोकांची मातृभाषा असलेल्या मराठीचा व्यावहारिक भाषा, ज्ञानभाषा म्हणून अधिकाधिक वापर होण्याची गरज व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदेड आगारात आगार व्यवस्थापक आशिष मेश्राम यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचं पूजन करुन पुष्पमाला अर्पण करण्यात आली. आगारातल्या कर्मचाऱ्यांनी कुसुमाग्रज यांना अभिवादन केलं.

****

औरंगाबाद शहराचं छत्रपती संभाजीनगर तसंच उस्मानाबादचं धाराशिव नामकरण करण्याबाबतची अधिसूचना काल महसूल आणि वन विभागानं राजपत्रात बदल जाहीर करून जारी केली. यामध्ये औरंगाबाद शहर आता छत्रपती संभाजीनगर शहर म्हणून ओळखलं जाईल, औरंगाबाद तालुका हा छत्रपती संभाजीनगर तालुका, औरंगाबाद जिल्हा हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा, औरंगाबाद उपविभाग हा छत्रपती संभाजीनगर उपविभाग तर औरंगाबाद विभाग यापुढे छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणून ओळखला जाईल. तर उस्मानाबाद शहर हे आता धाराशिव शहर म्हणून ओळखलं जाईल, उस्मानाबाद तालुका हा धाराशिव तालुका, उस्मानाबाद जिल्हा हा धाराशिव जिल्हा, उस्मानाबाद उपविभाग हा धाराशिव उपविभाग म्हणून ओळखला जाईल, असं राजपत्रात नमूद करण्यात आलं आहे. 

****

धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये आंदोलनादरम्यान पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांना जिल्हा आणि सत्र न्यायालयानं अडीच हजार रुपये दंड ठोठावला आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये नोव्हेंबर २०१५ ला हे आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता, कडू यांनी पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना शिविगाळ केल्याचा आरोप आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं गेले तीन दिवस सुरू असलेल्या वेरुळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा काल पद्मश्री शंकर महादेवन यांच्या गायनानं समारोप झाला. काल शेवटच्या दिवशी या महोत्सवात संगीता मुजुमदार यांच्या एम स्टेप ग्रुपचं कथ्थक सादरीकरण, नील रंजन मुखर्जी यांचं गिटार वादन सादर झालं.

****

लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी काल देवणी, तोगरी इथल्या बारावीच्या परीक्षा केंद्रांना अचानक भेट देऊन पाहणी केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यावेळी उपस्थित होते. परीक्षा केंद्रांवर परीक्षेआधी एक तासापासून परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका ताब्यात घेईपर्यंत महसूल विभागाचे बैठे पथक तैनात ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यात केंद्रनिहाय सुरक्षा व्यवस्था, भरारी पथके तैनात करण्यात आली आहे.

****

नवीन पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी धाराशिव इथं येत्या १४ मार्च पासून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं बेमुदत संपाची घोषणा करण्यात आली आहे. या संबंधीचं निवेदन काल राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, नगरपालिका कर्मचारी यांच्या समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं.

****

नांदेड इथं कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ येत्या एक ते तीन मार्च दरम्यान कुसुम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, अभिनेते वैभव मांगले, आदींचा सहभाग असेल. शहरातल्या यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात हा महोत्सव होणार असून यावेळी १०० स्टॅाल्स उभारले जाणार आहेत.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...