Monday, 27 February 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.02.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 27 February 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २७ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

भारतात दोन कोटी ३० लाख महिला मुद्रा योजनेच्या लाभार्थी असून, इतक्या मोठ्या प्रमाणात महिला उद्योजक असलेल्या देशात W20 प्रतिनिधींचं स्वागत असल्याचं, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं G-20 जागतिक परिषदेच्या W-20 बैठकीचं उद्घाटन आज इराणी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या.

G20 चे शेर्पा अमिताभ कांत, W- 20 च्या अध्यक्ष डॉ संध्या पुरेचा, केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ भागवत कराड, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यासह G-20 चे माजी अध्यक्ष या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते.

महिला सक्षमीकरणासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, यावर W20 च्या गटानं मार्गदर्शन करावं, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व्यवसाय, आरोग्य, शिक्षण यासारख्या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यावर भर दिला पाहिजे, असं इराणी यावेळी म्हणाल्या.

आज या बैठकीत अतिसुक्ष्म, सुक्ष्म आणि स्टार्ट अप उद्योगातील महिलांचं सक्षमीकरण, या विषयावर चर्चासत्र झालं. दुपारच्या सत्रात पर्यावरण बदलात महिला आणि मुलींची भूमिका, तळागाळातल्या महिला नेत्यांसाठी सक्षम प्रणाली विकसित करणं, लिंग गुणोत्तरातली दरी कमी करणं, शिक्षण आणि कौशल्य विकासातून महिला विकासाची दिशा, आणि महिलांच्या नेतृत्वात भारताचा विकास, या विषयांवर गटचर्चा होणार आहे. उद्या सकाळी W20 प्रतिनिधी औरंगाबाद शहरातल्या ऐतिहासिक स्थळांना भेट देणार आहेत.

***

२०२६-२७ पर्यंत पाच लाख कोटी रुपये राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट गाठण्यात महाराष्ट्र एक लाख कोटीचं योगदान देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं,राज्यपाल रमेश बैस यांनी म्हटलं आहे.राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज राज्यपालांच्या अभिभाषणानं सुरुवात झालं, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न,सीमाभागात राहणाऱ्या नागरीकांसाठी विविध योजना, राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती, स्वतंत्र दिव्यांग विभाग, स्वातंत्र्याचा तसंच मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवाअंतर्गत विविध कार्यक्रम आदी मुद्यावर राज्यपालांनी भाष्य केलं.

अभिभाषणानंतर विधानसभेचं कामकाज सुरू होताच, ज्येष्ठ सदस्य छगन भुजबळ यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी उपस्थित केली. भुजबळांच्या या मागणीला आशिष शेलार यांनीही अनुमोदन दिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी लवकरात लवकर उपमुख्यमंत्र्यांसह एक शिष्टमंडळ नवी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट घेईल, असं सांगितलं.

दरम्यान, या अधिवेशनात उपमुख्यमंत्री तसंच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस नऊ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. 

***

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १६ हजार ८०० कोटी रुपयांचा तेरावा हप्ता वितरित करणार आहेत. कर्नाटकमध्ये बेळगावी इथं होणाऱ्या कार्यक्रमात थेट निधी हस्तांतर प्रणालीद्वारे हा हप्ता वितरित केला जाणार आहे. दरम्यान, शिवमोगा विमानतळासह विविध प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण तसंच भूमिपूजन करण्यात आलं.

***

कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आज राज्यभरात “मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्तानं आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विधानमंडळातल्या मराठी भाषा समितीतर्फे ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यावर आधारित “मराठी साहित्याची ज्ञानयात्रा हा कार्यक्रम आज दुपारी होणार आहे. वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यकृतींचं अभिवाचन यामध्ये करण्यात येईल.

***

छत्रपती संभाजीनगर इथं सुरु असलेल्या वेरुळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा आज पद्मश्री शंकर महादेवन यांच्या गायनानं समारोप होत आहे. या महोत्सवात काल तबला वादक अमित चौबे आणि मुकेश जाधव यांच्या साथीत उस्ताद सुजात हुसेन यांचं सतार वादन, पद्मश्री शिवमणी यांचं ड्रम वादन, रवी चारी यांच सतार वादन, संगीत हल्दीपूर यांचं पियानो, सेल्वा गणेश यांचं खंजीर वादन, सेल्डॉन डिसिल्वा बास गिटार तर अदिती भागवत यांचं कथ्थक नृत्य सादरीकरण झालं. आज शेवटच्या दिवशी या महोत्सवात संगीता मुजुमदार यांच्या एम स्टेप ग्रुपचं कथ्थक सादरीकरण, नील रंजन मुखर्जी यांचं गिटार वादन होणार आहे.

***

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त हिंगोली इथं उद्या प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी आदी पौष्टिक भरडधान्य पिकाच्या उत्पादन वाढीबरोबरच या पिकांच्या आरोग्यविषयक फायद्याबाबत जनजागृती करुन लोकांच्या आहारात त्यांचे प्रमाण वाढवणं, हा या फेरीमागचा मुख्य उद्देश आहे.

//**********//

 

No comments: