Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date : 26 February 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २६ फेब्रुवारी
२०२३ दुपारी १.०० वा.
****
कला,
संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
ते आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेच्या ९८ व्या भागातून देशवासियांना
संबोधित करत होते. देशपातळीवर घेण्यात आलेल्या अंगाई लेखन स्पर्धा, रांगोळी स्पर्धेत
सहभागी कलाकारांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी त्यांच्या रचनांचाही आजच्या मन की बात
मध्ये समावेश केला. उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या तरुण कलाकारांच्या
सांगितिक क्षेत्रातल्या योगदानाचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. यामध्ये महाराष्ट्रातले
वारकरी कीर्तनकार संग्रामसिंह सुहास भंडारे यांचाही समावेश आहे. डिजिटल इंडिया तसंच
ई संजिवनी ॲपने गाठलेल्या टप्प्याकडेही त्यांनी देशाचं लक्ष वेधलं. ई संजिवनीद्वारे
उपचार करणारे डॉक्टर तसंच रुग्णांशी त्यांनी संवाद साधला. स्वच्छता, टाकाऊतून टिकाऊ
यासह अनेक मुद्यांवर पंतप्रधानांनी भाष्य करत, देशभरात यासंदर्भात राबवल्या जात असलेल्या
उपक्रमांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. आगामी होळी तसंच धुळवडीच्या शुभेच्छा देत, हे सण
व्होकल फॉर लोकल पद्धतीनं साजरे करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
****
जी ट्वेंटी अंतर्गत महिलांच्या
डब्ल्यू ट्वेंटी या दोन दिवसीय बैठकीला
उद्यापासून छत्रपती संभाजीनगर इथं प्रारंभ होत आहे. या बैठकीसाठी शहर सज्ज
झालं आहे. या पार्श्वभूमीवर शहराच्या सौंदर्यीकरणाचं काम पूर्ण झालं असून,
सायंकाळनंतर आकर्षक विद्युत रोषणाईत न्हाऊन निघणारा शहर परिसर आणि ऐतिहासिक वास्तू
पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.
दरम्यान,
डब्ल्यू ट्वेंटी बैठकीला दीडशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार असून,
कालपासून हे प्रतिनिधी शहरात दाखल होण्यास सुरुवात
झाली आहे.
****
सुमारे
सात वर्षांच्या खंडानंतर छत्रपती संभाजीनगर इथं वेरुळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय
महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. आज या महोत्सवात तबला
वादक अमित चौबे आणि मुकेश जाधव यांच्या साथीत उस्ताद सुजात हुसैन यांचं सतार वादन,
पद्मश्री शिवमणी यांचं ड्रम वादन, रवी चारी यांच सतार वादन, संगीत हल्दीपूर यांचं पियानो,
सेल्वा गणेश यांचं खंजीर वादन, सेल्डॉन डिसिल्वा बास गिटार तर अदिती भागवत यांचं कथ्थक
नृत्य सादरीकरण होणार आहे.
****
पुण्यातल्या कसबा पेठ आणि पिंपरी
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठीची
मतदानप्रक्रिया सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात
आली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत या दोन्ही ठिकाणी सरासरी साडे आठ टक्के मतदान
झालं आहे.
****
समाजातले
बहुविध प्रश्न आणि समस्यांच्या सोडवणुकीसाठी सामान्य जनतेला विवेक आणि तर्काचं अस्त्र
पुरवणारे संत तुकाराम, संत गाडगेमहाराज, संत तुकडोजी महाराजांसारखे संत हेच खऱ्या
अर्थानं आपले सुपरहिरो आहेत असं यशवंतराव चव्हाण विभागीय केंद्राचे समन्वयक नीलेश राऊत
यांनी म्हटलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना
पदव्युत्तर विभागानं आयोजित केलेल्या ७ दिवसाच्या विशेष शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी
आज ते बोलत होते.
नैसर्गिक
आणि मानवी साधन संपत्तीनं समृद्ध अशा भारतात अनेक महत्वपूर्ण योजना राबवण्यात येतात,
मात्र माहितीअभावी त्या सामान्यांपर्यंत पोहचत नाहीत. या पार्श्वभूमीवर गावं आणि शहराच्या
विकासाशी तरुणांची नाळ जोडणारं राष्ट्रीय सेवा योजना हे महत्त्वपूर्ण माध्यम असल्याचं
राऊत यांनी म्हटलं आहे.
****
परभणी
जिल्ह्यात गंगाखेड इथे नांदेड मार्गावरील मालेवाडी पाटी परिसरात राज्यपरिवहन मंडळाची
बस आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणासह वृद्धाचा मृत्यू
झाला. ७० वर्षीय शिवाजी शिंदे आणि त्यांचा २२ वर्षीय नातू श्रीनिवास शिंदे अशी या दोघांची
नावं असून, ते पालम तालुक्यातले रहिवासी आहेत.
****
धाराशिव
शहराचे माजी उपनगराध्यक्ष यशपाल प्रल्हादराव सरवदे यांचं आज पहाटे दोन वाजता पुणे इथं
निधन झालं. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यात एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु
होते. दलित पॅंथर चे महाराष्ट्राचे सरचिटणीस तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले
गटाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस म्हणून काही काळ ते कार्यरत होते. धाराशिव इथल्या नागबोधिनी
रिसर्च सेंटरचे ते संस्थापक अध्यक्ष होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते
तसंच धाराशिवच्या विकासात्मक चळवळीतील अग्रणी म्हणूनही त्यांची ओळख आहे.
//***********//
No comments:
Post a Comment