Wednesday, 22 February 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 22.02.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 February 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ फेब्रुवारी २०२ सायंकाळी ६.१०

****

·      शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार.

·      राष्ट्रपती राजवट उठली हाच पहाटेच्या शपथविधीचा फायदा - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार.

·      गुढीपाडवा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १०० रुपयांत आनंदाचा शिधा.

·      ज्येष्ठ शास्त्रीय नृत्यांगना आणि नृत्य दिग्दर्शक डॉ.कनक रेळे यांचं निधन.

आणि

·      हिंगोली इथं मोक्कांगतर्गत आरोपीला पकडण्यासाठी गेलेला पोलिस फौजदार गोळी लागून जखमी.

****

शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. ठाकरे गटानं दाखल केलेल्या या याचिकेसंदर्भात न्यायालयाने ठाकरे गट, शिंदे गट तसंच निवडणूक आयोगालाही आपलं म्हणणं मांडण्याची सूचना केली असून, यावर दोन आठवड्यांनी सुनावणी घेणार असल्याचं सांगितलं. दरम्यानच्या काळात शिंदे गटानं व्हीप जारी करून ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवू नये, असे स्पष्ट निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.

दरम्यान, राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज सलग दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी झाली. शिवसेना नेता निवड प्रक्रिया, एकनाथ शिंदे यांची गटनेते म्हणून निवड, प्रतोद नियुक्ती आदी मुद्यांवर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. ठाकरे गटाच्या युक्तिवादानंतर शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करतील. उद्या देखील ही सुनावणी सुरू राहणार आहे.

****

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, राऊत यांनी काल केलेल्या आरोपानंतर ठाणे पोलिसांच्या विशेष पथकानं आज नाशिक इथं राऊत यांचा जबाब नोंदवून घेतला. राऊत यांनी मंगळवारी आपल्याला जीवे मारण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप करणारं पत्र काल मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तांना पाठवलं होतं. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

****

राष्ट्रपती राजवट उठली हाच पहाटेच्या शपथविधीचा फायदा आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यात चिंचवड तसंच कसबा पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. कट्टर शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रचारासाठी नेत्यांच्या गर्दीने निवडणूक जिंकता येत नाही. गर्दी जनमानसात किती प्रभावी आहे, हे महत्त्वाचं असतं, असंही पवार यांनी नमूद केलं.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात बोलताना, पवार यांनी पहाटेच्या शपथविधीपाठोपाठ आणखीही खुलासे करावेत, असं आवाहन केलं.

****

उत्तम संसदीय कामगिरीबद्दल देशातल्या १३ खासदारांना ‘संसद रत्न पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील डॉ. अमोल कोल्हे, हिना गावित, फौजिया खान आणि गोपाळ शेट्टी यांचा समावेश आहे. येत्या २५ मार्च रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार विजेत्या खासदारांचं अभिनंदन केलं आहे.

****

गुढीपाडवा तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली. याचा लाभ एक कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता.

अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसंच औरंगाबाद आणि अमरावती विभागातल्या सर्व आणि नागपूर विभागातल्या वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातल्या दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना, एक किलो रवा, एक किलो चना डाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल.

अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातल्या उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी पाच हजार १७७ कोटी रुपये खर्चास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे ६८ हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ होणार आहे.

****

देशात आयुष्यमान भारत डिजीटल मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ३३ कोटी १८ लाखांहून अधिक नागरिकांनी आपलं खातं उघडलं आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आपल्या ट्वीट संदेशातून ही माहिती दिली आहे. आतापर्यंत २३ कोटी ५६ लाख नागरिकांचा आरोग्य तपशील डिजीटल पद्धतीनं जोडण्यात आले असून या मोहिमेचा लाभ अनेकांना झाला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

ज्येष्ठ शास्त्रीय नृत्यांगना आणि नृत्य दिग्दर्शक डॉ. कनक रेळे यांचं आज मुंबईत निधन झालं. त्या ८५ वर्षांच्या होत्या. मोहिनीअट्टम तसंच कथकली नृत्य प्रकारात त्या विशेष पारंगत होत्या. त्यांना पद्म भूषण, पद्मश्री, संगीत नाटक कला अकादमी पुरस्कार, कालीदास सन्मान आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. देशात शास्त्रीय नृत्यामध्ये पीएचडी करणाऱ्या त्या पहिल्या महिल्या होत्या. राज्यपाल रमेश बैस यांनी रेळे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील एका महान नृत्य तपस्विनीला गमावलं असल्याचं राज्यपाल बैस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली शोकभावना व्यक्त करताना, शास्त्रीय नृत्याला जीवन समर्पित करणाऱ्या ज्येष्ठ नृत्य गुरूला आपण मुकलो, असं म्हटलं आहे.

****

श्री गोंदवलेकर संप्रदायाचे ज्येष्ठ नामसाधक, लेखक, प्रवचनकार डॉ. अरुण वाडेकर यांचं आज सकाळी पुणे इथं निधन झालं, ते ७६ वर्षांचे होते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज संप्रदायातील एक ज्येष्ठ, उपासक आणि प्रचारक अशा अनेक माध्यमातून त्यांनी नावलौकीक मिळवला होता. एक जाणकार भागवत कथाकार म्हणून त्यांची ख्याती होती.

****

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं आरोपीस पकडण्यासाठी गेलेले पोलिस फौजदार गोळी लागून जखमी झाल्याची घटना आज घडली. बबलू हत्यारसिंग टाक यावर मोक्कांतर्गत गुन्हा दाखल आहे. फौजदार माजिद खान हे त्याला अटक करण्यासाठी फौजफाट्यासह गेले असता, आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झटापट होऊन माजिद यांना एक गोळी लागली. ही गोळी पोलिसांच्या पिस्तुलातून सुटलेली असल्याचं पोलिस विभागाकडून जारी पत्रकात म्हटलं आहे. फौजदार माजिद यांच्यावर कळमनुरी इथं प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड इथं पाठवण्यात आलं आहे.

****

परीक्षा केंद्रीत शिक्षण पद्धत बदलण्याची गरज असल्याचं मत विद्यापीठ महासंघाच्या महासचिव डॉ.पंकज मित्तल यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं भारतीय विद्यापीठ महासंघाच्या पश्चिम विभागीय परिषदेचा आज समारोप करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होते. २०२५ हे विद्यापीठ महासंघाचे शतक महोत्सवी वर्ष असून यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने ही परिषद घेण्यात आली. दोन दिवसांच्या सहा सत्रातील विचार दिशादर्शक ठरतील, असा विश्वास मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केला. या परिषदेला महाराष्ट्रासह, राजस्थान, गुजरात आणि गोवा या राज्यातील कुलगुरु उपस्थित होते. या परिषदेत उपस्थित कुलगुरुंनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला भेट दिली, यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

****

लातूर जिल्ह्यात ६८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूकीसाठी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी येत्या २४ फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात येईल. २४ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. त्यानंतर प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी ९ मार्चला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी दिली आहे.

****

सातवा वेतन आयोग लागू न झालेल्या एक हजार ४१० शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप आज मागे घेण्यात आला.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...