Saturday, 25 February 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.02.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 25 February 2023

Time : 07.10 AM to 07.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २५ फेब्रुवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      औरंगाबाद शहराचं छत्रपती संभाजीनगर नामकरण करण्याला केंद्र सरकारची मंजुरी

·      औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण झाल्याची अधिसूचना राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून जारी;अन्य विभागांच्या अधिसूचनेनंतर जिल्ह्याच्या नावात बदल-उपमुख्यमंत्र्यांचा खुलासा

·      जी 20 देशांच्या डब्ल्यू 20 समूहाची येत्या सोमवारी आणि मंगळवारी औरंगाबाद इथं बैठक;शहर सौंदर्यीकरणाचं काम अंतिम टप्प्यात

·      माजी आमदार देविसिंह शेखावत यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात अंत्यसंस्कार

·      क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार काल समारंभपूर्वक प्रदान

·      औरंगाबाद इथं आजपासून वेरुळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाला सुरुवात

आणि

·      स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मानद डी लिट पदवी प्रदान

 

सविस्तर बातम्या

औरंगाबाद शहराचं छत्रपती संभाजीनगर नामकरण करण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून काल राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाला या मंजुरीचं पत्र पाठवण्यात आलं. औरंगाबाद शहराचं नामकरण छत्रपती संभाजीनगर असं करण्याची मागणी करणारं पत्र राज्य सरकारने २० ऑक्टोबर २०२२ रोजी केंद्र सरकारला पाठवलं होतं, ही मागणी मंजूर केल्याचं गृहमंत्रालयानं या पत्रात म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा औरंगाबाद असं नामकरण करण्यास, काहीही हरकत नसल्याचं, या पत्रात म्हटलं आहे.

केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर राज्य सरकारने राजपत्रात औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण झाल्याचं जाहीर केलं. यासंदर्भातली अधिसूचना काल राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. शहराचं नाव बदलल्यानंतर नंतर महसूल विभाग, वन विभाग तसेच नगरविकास विभाग अधिसूचना जारी करेल, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे नाव बदलेल, दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली असल्याचं, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एका ट्विट संदेशातून स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर असं नामांतर झाल्याचा निर्णय येताच, शहरासह औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र या नामकरणाचा निषेध केला आहे. या निर्णयाविरोधात महामोर्चा काढणार असल्याचं जलील यांनी एका ट्विट संदेशात म्हटलं आहे.

****

जी 20 देशांच्या महिला आणि बालविकासाशी संबंधित डब्ल्यू 20 समूहाची येत्या सोमवारी आणि मंगळवारी औरंगाबाद इथं बैठक होत आहे. या बैठकीला दीडशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, हे सर्व प्रतिनिधी उद्यापासून शहरात दाखल होण्यास सुरवात होण्याची शक्यता आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते या बैठकीचं उद्घाटन होणार आहे. डब्ल्यू 20 च्या अध्यक्ष आणि संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष डॉ संध्या पुरेचा यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीच्या उद्घाटन सोहळ्याला, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. डब्ल्यू 20 समूहाच्या या दोन दिवसीय बैठकीत, ग्रामीण भागातील महिला नेतृत्व, महिला उद्योजकता, लिंग गुणोत्तरातली दरी कमी करणं, पर्यावरण बदलात महिला आणि मुलींची भूमिका, शिक्षण आणि कौशल्य विकासातून महिला विकासाची दिशा, या पाच मुख्य विषयांवर विविध सहा सत्रांत चर्चा होणार आहे. बैठकीच्या दुसऱ्या दिवशीची चर्चासत्रं संपल्यावर सर्व प्रतिनिधी वेरुळ लेण्यांसह औरंगाबाद परिसरातल्या वारसा स्थळांना भेट देणार आहेत.

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या सौंदर्यीकरणाचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी शहरात झालेल्या सौंदर्यीकरण कामाची काल प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.

****

भारतीय लष्करी सेवेतल्या कनिष्ठ अधिकारी पदाच्या भर्ती प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार या पदासाठी पहिल्या टप्प्यात, ‘जॉईन इंडियन आर्मी या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या आणि अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना सामायिक प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. ही परीक्षा देशात १७६ केंद्रांवर ऑनलाईन माध्यमातून घेतली जाईल. ऑनलाइन सीईई ची तयारी करण्यासाठी सर्व विषयांच्या सराव चाचण्या विकसित करण्यात आल्या आहेत, जॉईन इंडियन आर्मी या संकेतस्थळावर त्याची एक लिंक देण्यात आली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

पुण्यातल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसनं जातीयवाद आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते काल एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत सभांच्या व्यासपीठावरून धर्माच्या आधारावर मतदानाचं आवाहन करण्यात आलं, लांगूलचालन करून निवडणूक जिंकण्याची ही मानसिकता बदलली पाहिजे, असं फडणवीस यांनी नमूद केलं. विरोधकांनी पसरवलेला संभ्रम दूर करण्यासाठी खासदार गिरीश बापट प्रचार सभेला आल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, या पोटनिवडणुकीचा प्रचार काल संपला. उद्या २६ तारखेला मतदान होणार असून, दोन मार्चला मतमोजणी होणार आहे.

****

२०४७ या वर्षापर्यंत तांत्रिक वस्त्रोद्योगाची उलाढाल १२५ दशलक्ष डॉलर वर जाईल, असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत तीन दिवसीय टेक्नोटेक्स २०२३ च्या समारोप समारंभात ते बोलत होते. पुढील काळात हवाई आणि जहाजमार्गात तांत्रिक वस्त्रोद्योगाचा अधिकाधिक उपयोग करु शकणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. पारंपारिक वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या सहकारी संस्था, आस्थापना आणि उद्योजकांनी या क्षेत्रात कार्यरत होण्याचं आवाहन गोयल यांनी यावेळी केलं.

****

माजी आमदार देविसिंह शेखावत यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. शेखावत यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं, ते ८९ वर्षांचे होते. १९८५ ते ९० या काळात अमरावतीचे आमदार असलेले शेखावत यांनी अमरावतीचं महापौर पदही भूषवलं होतं. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे ते पती होत.

शेखावत यांच्या निधनानं राजकीय, शैक्षणिक तसंच सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी शेखावत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. शेखावत यांच्या निधनाने काँग्रेसने एक निष्ठावान कार्यकर्ता गमावला आहे, अशी भावना प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.

****

विविध क्षेत्रांतील गुणवत्तेत महाराष्ट्र हा देशात अग्रस्थानी असून, यात शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. याच गुणवत्तेच्या आधारे आपला देश भविष्यात जगाचं नेतृत्व करेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. शालेय शिक्षण विभागाच्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार काल मुंबईत कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्यावेळी दूरदृश्य प्रणालीचा माध्यमातून केसरकर बोलत होते.

मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी बोलताना, राज्याच्या महिला धोरणांतर्गत सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर दोन आदर्श महिलांचा सन्मान करण्यात येणार असून, त्यातील किमान एक महिला शिक्षक असेल, असं सांगितलं. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून राज्यात अधिक गुणवान पिढी तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

औरंगाबाद इथं आजपासून वेरुळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाला सुरुवात होत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातल्या सोनेरी महलात होणाऱ्या या तीन दिवसीय महोत्सवात आज मयूर वैद्य आणि मृण्मयी देशपांडे यांच्या कथ्थक नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात होईल. प्रार्थना बेहरेचं भरतनाट्यम आणि भार्गवी चिरमुले यांचं लावणी सादरीकरण होणार आहे. पद्मभूषण पंडित राशिद खान, महेश काळे यांचं गायन आणि पद्मश्री विजय घाटे, पंडित राकेश चौरसिया यांच्या तबला आणि बासरीची जुगलबंदी देखील रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

****

तंत्रशिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणासोबत परीक्षा तसंच मूल्यमापन पद्धतीमध्ये बदल होण्याची अपेक्षा, राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ काल राज्यपालांच्या ऑनलाईन उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. स्नातकांनी आपल्या देशातली भाषा, संस्कृती आणि परंपरांसोबतच, इतर देशांच्या भाषा आणि संस्कृतीचाही अभ्यास करावा, असं आवाहन राज्यपालांनी केलं.

या समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री कमलकिशोर कदम यांना मानद डी लिट पदवी प्रदान करण्यात आली. या सत्काराला उत्तर देताना गडकरी यांनी, उत्तम समाज निर्मितीसाठी नीतिमूल्यांची गरज व्यक्त करत, स्नातकांनी प्रतिकूल विचारांचा सन्मान करण्यास शिकलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं. गरजेनुसार संशोधन झाल्यास सामाजिक परिवर्तन घडेल असा विश्वास व्यक्त करत, युवकांनी रोजगारामागे न धावता, संपदा निर्माण करणारे उद्योजक होण्याचं आवाहन गडकरी यांनी केलं.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकरही या समारंभाला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. देशाची गणना पुढारलेल्या देशांमध्ये व्हावी यासाठी दरडोई उत्पन्न वाढवावं लागेल, त्यासाठी उद्योजकतेला चालना द्यावी लागेल, तसंच ग्रामीण भागात शेतीबरोबर नवीन संधी निर्माण कराव्या लागतील असं काकोडकर यांनी सांगितलं.

****

कोल्हापूर जिल्ह्यात कणेरी मठावर पंचमहाभूत सुमंगलम या लोकोत्सवात घेण्यात आलेल्या चेतक पुरस्कार २०२३ या स्पर्धेत, अंबाजोगाई इथले माजी नगरसेवक अमोल लोमटे यांच्या पवन या घोड्याने प्रथम क्रमांक पटकवला. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, आणि एक लाख रुपये बक्षीस देऊन पवन आणि त्याचे मालक यांचा सन्मान करण्यात आला.

दरम्यान, या लोकोत्सवाच्या ठिकाणी ५२ गायी दगावल्या असून ३० गायी अत्यवस्थ असल्याचं वृत्त आहे. या गायी कशामुळे दगावल्या, याची माहिती न्यायवैद्यक विभागाकडून तपासणी नंतर समजेल, असं पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर पठाण यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद शहरात काल किर्लोस्कर वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अंतर्गत वसुंधरा मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते पोपटराव रसाळ, रामेश्वर दुसाने, प्रशांत गिऱ्हे, रोहित ठाकूर यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. 'टिंबक्टू' हा लघुपट दाखवून महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. आज या महोत्सवात हिमायत बागेत निसर्ग फेरी होत असून, त्यानंतर फळ संशोधन केंद्राचे कृषी अधिकारी अविनाश देवळे आणि मानद वन्यजीव संरक्षक डॉ. किशोर पाठक, हे जैविविधतेबद्दल माहिती सांगणार आहेत.

****

सेवा हक्क कायद्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची सूचना, राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त दिलीप शिंदे यांनी केली आहे. काल औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. प्रलंबित प्रकरणं लचवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

****

नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यात टेंभुर्णी या डासमुक्त गाव या उपक्रमाची पुणे इथल्या आयटीसी संस्था तसंच शिरुर इथल्या ग्रामस्थांनी पाहणी केली. टेंभूर्णी ग्रामपंचायतीमध्ये सांडपाणी व्यवस्थापनासाठीचा शोषखड्डयाचा यशस्वी उपक्रम राबवण्यात आला होता. त्यानंतर हा उपक्रम जिल्ह्यातल्या अनेक गावात राबवण्यात आला. पुणे जिल्ह्यातल्या अनेक गावातील सरपंच, उपसरपंच तसंच सामाजि‍क कार्यकर्त्यांनी या उपक्रमाची पाहणी करुन समाधान व्यक्त केलं.

****

भारतीय कृषी संशाोधन परिषेदेकडून २०२३ या वर्षासाठीचा राष्ट्रीय नाविन्यपूर्ण कृषी पुरस्कार सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा इथले ऑरगॅनिक ॲन्ड रेश्युड्युफ्री फार्मर्स असोशिएशन चे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे यांना जाहीर झाला आहे. गटशेती, सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सतत मार्गदर्शन आणि सहकार्य तसंच शेतकऱ्यांचे प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीनं केंद्र आणि राज्य सरकार कडे मांडणं या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

****

परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यातल्या डिग्रस उच्च पातळीच्या बंधाऱ्यातून परवा सोमवारी सायंकाळी अंतेश्वर बंधाऱ्यामार्गे नांदेड जिल्ह्यातील विष्णूपुरी प्रकल्पासाठी पाणी सोडलं जाणार आहे. या दरम्यान, शेतकऱ्यांनी नदीपात्रात जावू नये, शेतीचं साहित्य, विद्युत मोटार, पशुधन तसंच इतर महत्त्वाचे साहित्य नदीपात्रातून बाहेर काढण्याचं आवाहन करण्यात आला आहे. जलाशयातून पाणी उपसणाऱ्या ५९ गावातील शेतकऱ्यांनाना सर्व बीट प्रमुखांनी सतर्क करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत.

****

बीड इथं येत्या एक मार्च या दिवशी महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत, जनसुनावणी होणार आहे. महाराष्ट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत ही जनसुनावणी आहे. जिल्हा नियोजन सभागृहात घेण्यात येणाऱ्या या जनसुनावणीत अधिकाधिक महिलांना पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असं आवाहन चाकणकर यांनी केलं आहे.

जालना इथं दोन मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर सुनावणी घेणार आहेत. या सुनावणीनंतर त्याजालना जिल्ह्याची आढावा बैठकही घेणार आहेत.

****

औरंगाबाद इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा तसंच कौशल्य विकास रोजगार, स्वयंरोजगार आणि समृद्धी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या रोजगार मेळाव्यात ४० हून जास्त कंपन्या, शासनाची विविध महामंडळं सहभागी होणार आहेत.

****

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी नवीन अर्ज सादर करण्यासाठी येत्या १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात विद्यार्थ्यांनी शासनाच्या महासमाजकल्याण या संकेतस्थळावर अर्ज भरुन त्याची प्रत येत्या १६ मार्चपर्यंत नांदेडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, समाज कल्याण कार्यालयात समक्ष सादर करण्याचं आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी केलं आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या विद्यार्थ्यांसाठी काल W20 अंतर्गत “जिज्ञासा प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. शहरातल्या १८ शाळांच्या सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. केंद्रीय विद्यालय संघाने प्रथम, SBOA पब्लिक स्कूलने द्वितीय, तर अणि MGM संस्कार विद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.

****

No comments: