Sunday, 26 February 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 26.02.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 February 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ फेब्रुवारी २०२ सायंकाळी ६.१०

****

·      कला, संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बातमधून आवाहन.

·      राज्य विधीमंडळाचं उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन;सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.

·      W-20 बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगरात दाखल होणाऱ्या महिला प्रतिनिधींचं पारंपरिक पद्धतीनं वाद्यांच्या गजरात स्वागत.

आणि

·      स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आज ५६ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.

****

कला, संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रम मालिकेच्या ९८ व्या भागातून देशवासियांना संबोधित करत होते. देशपातळीवर घेण्यात आलेल्या अंगाई लेखन स्पर्धा, रांगोळी स्पर्धेत सहभागी कलाकारांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी त्यांच्या रचनांचाही आजच्या मन की बात मध्ये समावेश केला. सांगली इथले कलाकार सचिन अवसारी यांनी रांगोळी स्पर्धेत काढलेल्या जालियनवाला बाग हत्याकांड आणि शहीद उधमसिंग यांचा पराक्रम दर्शवणाऱ्या रांगोळीचा पंतप्रधानांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या तरुण कलाकारांच्या सांगितिक क्षेत्रातल्या योगदानाचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. यामध्ये महाराष्ट्रातले वारकरी कीर्तनकार संग्रामसिंह सुहास भंडारे यांचाही समावेश आहे. डिजिटल इंडिया तसंच ई संजिवनी ॲपने गाठलेल्या टप्प्याकडे त्यांनी देशाचं लक्ष वेधतांना, ई संजीवनी अॅपच्या माध्यमातून १० कोटींहून अधिक रुग्णांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपचार मिळाल्याबद्दल डॉक्टर आणि रुग्णांचं त्यांनी यावेळी कौतुक केलं. प्लास्टिकच्या पिशव्यांच्या ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर वाढवण्याचं आवाहन करतांना त्यांनी यावेळी देशभरात स्वच्छते संदर्भात राबवल्या जात असलेल्या उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला. आगामी होळी तसंच धुळवडीच्या या सणाच्या शुभेच्छा देत, हे सण व्होकल फॉर लोकल पद्धतीनं साजरे करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

****

राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरु होत आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं सकाळी ११ वाजता या अधिवेशनाला सुरुवात होईल. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस ९ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारनं आज सायंकाळी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत.

 

दरम्यान, सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज मुंबईत विधान भवन परिसरात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शेतकऱ्यांचे प्रश्न, कायदा आणि सुव्यवस्था, जिल्हा वार्षिक योजनेकडे सरकारचं दुर्लक्ष, जाहिरातींवर करदात्यांच्या पैशातून उधळपट्टी, आदी मुद्यांवरून पवार यांनी सरकारवर कडाडून टीका केली. विधानसभेत विविध आयुधांचा वापर करून हे प्रश्न सरकारला विचारणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यपाल रमेश बैस यांची आज विरोधी पक्षनेत्यांनी राजभवनात सदिच्छा भेट घेतली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतलेल्या शिष्टमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, धनंजय मुंडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

****

छत्रपती संभाजीनगरात उद्यापासून G-20 जागतिक परिषदेच्या W-20 बैठकीला प्रारंभ होत आहे. युरोपीय संघ आणि १९ देशांच्या सुमारे दीडशे महिला प्रतिनिधी या बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगरात दाखल होत आहेत. या सर्व प्रतिनिधींचं पारंपरिक पद्धतीनं वाद्यांच्या गजरात, लेझीमच्या तालावर स्वागत करण्यात येत आहे.

या बैठकीसाठी येणाऱ्या प्रतिनिधींची पाच गटात विभागणी केली असून, हा प्रत्येक गट दोन दिवसांत एकेका प्राधान्यक्षेत्रावर चर्चा करणार आहे. चर्चेच्या विषयांमध्ये उद्योजक महिला, तळागाळातील महिला नेतृत्व, डिजिटल लैंगिक समानता, शिक्षण आणि कौशल्य विकास आणि हवामान बदलावरच्या उपाययोजनेवर कृती समूहात महिला आणि मुलींचा परिवर्तनकर्त्या म्हणून सहभाग, यांचा समावेश आहे. बैठकीच्या अध्यक्ष डॉ संध्या पुरेचा यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या बैठकीनंतर W20 समूहाच्या राजस्थानात जयपूर इथं १३ आणि १४ एप्रिलला तसंच तमिळनाडूत महाबलिपुरम् इथं १५ आणि १६ जूनला बैठक होणार असल्याचं डॉ पुरेचा यांनी सांगितलं.

****

पुण्यातल्या कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठीची मतदानप्रक्रियेत दुपारी तीन वाजेपर्यंत कसबा इथं ३० पूर्णांक ५ टक्के आणि चिंचवड इथं ३० पूर्णांक ५५ शतांश टक्के झालं आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

****

जगातल्या सर्वांत लांबवरच्या नदी प्रवासाला निघालेलं ‘एमव्ही गंगा विलास’ हे जहाज परवा २८ फेब्रुवारीला आसाममध्ये दिब्रुगढ इथं पोहोचणार आहे. १३ जानेवारीला वाराणसी इथून हे जहाज नदी प्रवासाला निघालं आहे. दिब्रुगढ इथं केंद्र सरकारच्या अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाकडून या जहाजाचं स्वागत केलं जाणार आहे. गंगा आणि सिंधू नदीसह अनेक उपनद्यांमधून झालेल्या या भारतीय उपखंडातील पर्यटन आणि मालवाहतुकीसाठी एक नवं अवकाश खुलं झाल्याचं मत केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केलं आहे.

****

थोर स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज ५६ वी पुण्यतिथी. यानिमित्त राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना अभिवादन केलं. सावरकर हे महान देशभक्त, क्रांतिकारक, उत्तम वक्ते, कुशल लेखक आणि समाज सुधारक होते असं मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी, सावरकर हे हिंदुत्वाचे एक विश्वविद्यालय आणि खरे देशभक्त तसंच स्वातंत्र्याचे सच्चे पुजारी होते असं आपल्या संदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जन्मस्थळ असलेल्या नाशिक जिल्ह्यात भगूर इथं सावरकरांच्या जीवनावर थीम पार्क आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय उभारणार असल्याची घोषणा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. जिल्ह्यात भगूर इथं ते आज बोलत होते. सावरकरांचे विचार, जीवनकार्य जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील असून राज्यात वीर सावरकर पर्यटन सर्कीट सुरु करण्यात येणार असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं. भगूर इथं पर्यटन विभागाच्या वतीनं आज अभिवादनपर पदयात्रा काढण्यात आली.

औरंगाबाद इथं समर्थनगर परिसरातल्या सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आज सावरकर प्रेमी नागरिकांच्या वतींन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथं वेरुळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. या महोत्सवात आज तबला वादक अमित चौबे आणि मुकेश जाधव यांच्या साथीत उस्ताद सुजात हुसेन यांचं सतार वादन, पद्मश्री शिवमणी यांचं ड्रम वादन, रवी चारी यांच सतार वादन, संगीत हल्दीपूर यांचं पियानो, सेल्वा गणेश यांचं खंजीर वादन, सेल्डॉन डिसिल्वा बास गिटार तर अदिती भागवत यांचं कथ्थक नृत्य सादरीकरण होणार आहे.

****

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला कविता दिनानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर इथं दोन विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. यंदाचा ‘कविवर्य कुसुमाग्रज विशेष काव्य पुरस्कार’ कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ.रणधीर शिंदे यांना जाहीर झाला आहे. ते तरुण पिढीतील अग्रगण्य काव्यसमीक्षक आहेत. तर दुसरा ‘कवयित्री लीला धनपलवार काव्य पुरस्कार’ हा हिंगोली इथले प्रसिद्ध कवी प्राध्यापक विलास वैद्य यांना जाहीर झालेला आहे. त्यांचे ‘गलफ’, ‘आलाप’, ‘माझ्या प्रयोगशील देशात’ आणि ‘लढा’ कवितासंग्रह प्रकाशित आहेत. वाचक चळवळीत त्यांचं विशेष योगदान आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या ना.गो नांदापूरकर सभागृहात संध्याकाळी हे पुरस्कार प्रदान केले जाणात आहेत.

****

परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथे नांदेड मार्गावरील मालेवाडी पाटी परिसरात राज्यपरिवहन मंडळाची बस आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणासह वृद्धाचा मृत्यू झाला. ७० वर्षीय शिवाजी शिंदे आणि त्यांचा २२ वर्षीय नातू श्रीनिवास शिंदे अशी या दोघांची नावं असून, ते पालम तालुक्यातले रहिवासी होत.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...