Friday, 24 February 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 24.02.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 February 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ फेब्रुवारी २०२ सायंकाळी ६.१०

****

·      जगातील सर्वात दुर्बल घटकातल्या नागरिकांवर चर्चा केंद्रीत करावी - जी-20 देशांच्या अर्थमंत्र्यांना पंतप्रधानाचं आवाहन.

·      भारतीय लष्करी सेवेतल्या कनिष्ठ अधिकारी पदाच्या भर्ती प्रक्रियेत बदल.

·      माजी आमदार देविसिंह शेखावत यांचं आज पुण्यात वृद्धापकाळानं निधन.

आणि

·      स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मानद डी लिट पदवी प्रदान.

****

जगातील सर्वात दुर्बल घटकातल्या नागरिकांवर आपली चर्चा केंद्रीत करावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. जी-20 अंतर्गत विविध देशांचे अर्थमंत्री आणि सेंट्रल बँकेचे गव्हर्नर यांच्या बैठकीला दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान संबोधित करत होते. हवामान बदल आणि उच्च कर्ज पातळी यांसारख्या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांनी बहुपक्षीय विकास बँकांना बळकट करण्याच्या गरजेवर भर दिला. आमच्या जी-20 अध्यक्षपदाची संकल्पना “एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य”, या सर्वसमावेशक दृष्टीला प्रोत्साहन देत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

दरम्यान, कृषी क्षेत्रातल्या आव्हानांचा सामना केला तरच देशाचा सर्वांगीण विकास होईल, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. कृषी आणि सहकार क्षेत्रावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला ते आज संबोधित करत होते. देशाच्या अमृतकाळात सादर झालेल्या अर्थसंकल्पाचा उद्देश कृषी आणि सहकारी क्षेत्रांना बळकटी देणं, हा असल्याचं त्यांनी नमूद केलं. आपल्या शेतकऱ्यांनी देशाला फक्त अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण बनवलं नाही, तर अन्नधान्याची निर्यात करण्यातही सक्षम केलं असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

****

भारतीय लष्करी सेवेतल्या कनिष्ठ अधिकारी पदाच्या भर्ती प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार या पदासाठी पहिल्या टप्प्यात, ‘जॉईन इंडियन आर्मी’ या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या आणि अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना सामायिक प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. ही परीक्षा देशात १७६ केंद्रांवर ऑनलाईन माध्यमातून घेतली जाईल. ऑनलाइन सीईई ची तयारी करण्यासाठी सर्व विषयांच्या सराव चाचण्या विकसित करण्यात आल्या आहेत. जॉईन इंडियन आर्मी या संकेतस्थळावर त्याची एक लिंक देण्यात आली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

पुण्यातल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने जातीयवाद आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते आज एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत सभांच्या व्यासपीठावरून धर्माच्या आधारावर मतदानाचं आवाहन करण्यात आलं, लांगूलचालन करून निवडणूक जिंकण्याची ही मानसिकता बदलली पाहिजे, असं फडणवीस यांनी नमूद केलं. विरोधकांनी पसरवलेला संभ्रम दूर करण्यासाठी खासदार गिरीश बापट प्रचार सभेला आल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं.

दरम्यान, या पोटनिवडणुकीचा प्रचार आज संपला. परवा २६ तारखेला मतदान होणार असून, दोन मार्चला मतमोजणी होणार आहे.

****

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या राज कपूर तसंच व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कारासह विशेष योगदान पुरस्काराची रक्कम दुप्पट करण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंबंधी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत ही घोषणा केली. यापुढे राज कपूर तसंच व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कारांचं स्वरुप १० लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं तर विशेष योगदान पुरस्काराचं स्वरुप ६ लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं असेल. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत लवकरच २०२० ते २०२२ अश्या तीन वर्षांचे पुरस्कार वितरीत करण्यात येतील, अशी माहितीही मंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

****

२०४७ या वर्षापर्यंत तांत्रिक वस्त्रोद्योगाची उलाढाल १२५ दशलक्ष डॉलर वर जाईल असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत आयोजित तीन दिवसीय टेक्नोटेक्स २०२३ च्या समारोप समारंभात आज बोलत होते. पुढील काळात हवाई आणि जहाजमार्गात तांत्रिक वस्त्रोद्योगाचा अधिकाधिक उपयोग करु शकणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. पारंपारिक वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या सहकारी संस्था, आस्थापना आणि उद्योजकांनी या क्षेत्रात कार्यरत होण्याचं आवाहन गोयल यांनी यावेळी केलं.

****

माजी आमदार देविसिंह शेखावत यांचं आज पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं, ते ८९ वर्षांचे होते. १९८५ ते ९० या काळात अमरावतीचे आमदार असलेले शेखावत यांनी अमरावतीचं महापौर पदही भूषवलं होतं. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे ते पती होत. त्यांच्या निधनाबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी शोक व्यक्त केला आहे. शेखावत यांच्या निधानानं राजकीय, शैक्षणिक तसंच सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. शेखावत यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी पुण्यात अंत्यसंस्कार होत आहेत.

****

कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठावर पंचमहाभूत सुमंगलम या लोकोत्सवात घेण्यात आलेल्या चेतक पुरस्कार २०२३ या स्पर्धेत अंबाजोगाई इथले माजी नगरसेवक अमोल लोमटे यांच्या पवन या घोड्यानं प्रथम क्रमांक पटकवला. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, आणि एक लाख रुपये बक्षीस देऊन पवन आणि त्याचे मालक यांचा सन्मान करण्यात आला.

दरम्यान, या लोकोत्सवाच्या ठिकाणी ५२ गायी दगावल्या असून ३० गायी अत्यवस्थ असल्याचं वृत्त आहे. या गायी कशामुळे दगावल्या, याची माहिती न्यायवैद्यक विभागाकडून तपासणी नंतर समजेल, असं पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर पठाण यांनी सांगितलं.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या ऑनलाईन उपस्थितीत आज झाला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकरही या समारंभाला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. या समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री कमलकिशोर कदम यांना मानद डी लिट पदवी प्रदान करण्यात आली.

****

औरंगाबाद इथंही जी २० देशांच्या महिला प्रतिनिधींची बैठक परवा २७ आणि २८ तारखेला होणार असून, या प्रतिनिधींचं उद्या शहरात आगमन होणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमहीवर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी शहरात झालेल्या सौंदर्यीकरण कामाचा प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.

****

नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यात टेंभुर्णी या डासमुक्त गाव या उपक्रमाची पुणे येथील आयटीसी संस्था तसंच शिरुर इथल्या ग्रामस्थांनी पाहणी केली. टेंभूर्णी ग्रामपंचायतीमध्ये सांडपाणी व्यवस्थापनासाठीचा शोषखड्डयाचा यशस्वी उपक्रम राबवण्यात आला होता. त्यानंतर हा उपक्रम जिल्ह्यातील अनेक गावात राबवण्यात आला. पुणे जिल्ह्यातल्या अनेक गावातील सरपंच, उपसरपंच तसंच सामाजि‍क कार्यकर्त्यांनी या उपक्रमाची पाहणी करुन समाधान व्यक्त केलं.

****

भारतीय कृषी संशोधन परिषेदेकडून २०२३ या वर्षासाठीचा राष्ट्रीय नाविन्यपूर्ण कृषी पुरस्कार सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा इथले ऑरगॅनिक ॲन्ड रेश्युड्युफ्री फार्मर्स असोशिएशन चे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे यांना जाहीर झाला आहे. गटशेती, सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सतत मार्गदर्शन आणि सहकार्य तसंच शेतकऱ्यांचे प्रश्न अभ्यासपुर्ण पद्धतीन केंद्र आणि राज्य सरकार कडे मांडणं या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

****

बीड इथं येत्या १ मार्च या दिवशी महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत, जनसुनावणी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत ही जनसुनावणी होणार असून यावेळी पोलीस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक उपस्थित असतील. या उपक्रमाअंतर्गत विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येतं. ही जनसुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात घेण्यात येणार असून यात अधिकाधिक महिलांना पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असं आवाहन चाकणकर यांनी केलं आहे.

****

औरंगाबाद इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उद्या पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा तसंच कौशल्य विकास रोजगार, स्वयंरोजगार आणि समृद्धी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. सहकारमंत्री अतुल सावे यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत या संबंधी माहिती दिली. या रोजगार मेळाव्यात ४० हून जास्त कंपन्या, शासनाची विविध महामंडळं सहभागी होणार आहेत.

****

No comments: