Thursday, 23 February 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.02.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२३ फेब्रुवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत ४१ वी प्रगती बैठक पार पडली. पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या नियोजनासाठी प्रधानमंत्री गतीशक्ती पोर्टलचा वापर करावा, असा सल्ला पंतप्रधानांनी मंत्रालयांना आणि राज्य सरकारांना यावेळी दिला. प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी भूसंपादन, आवश्यक गोष्टींची वाहतूक इत्यादी कामं युद्धपातळीवर हाती घेण्यावर त्यांनी भर दिला. तसंच केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये योग्य समन्वय राहील याची काळजी घ्यावी अशीही सूचनाही पंतप्रधानांनी यावेळी केली.

****

केंद्रीय मंत्रिमंडळानं २०२२-२३ या वर्षासाठी तागाच्या गोण्यांमध्ये अन्नधान्यांचं पॅकिंग करण्यास मान्यता दिली आहे. नियमांनुसार १०० टक्के अन्नधान्य आणि २० टक्के साखर तागाच्या गोण्यांमध्ये पॅक करणं बंधनकारक आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळानं २२ व्या कायदा आयोगाचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवण्यास देखीळ मान्यता दिली आहे.

****

देशातल्या कापड क्षेत्राचा भविष्य काळातला विकास, तांत्रिक कापड उद्योगाच्या वाढीशी निगडित असल्याचं मत, केंद्रीय वस्त्र राज्‍यमंत्री दर्शना जर्दोश यांनी व्यक्त केलं आहे. त्या मुंबई इथं काल टेक्नो टेक्स २०२३ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. भारत हा कापड आणि तयार कपडे निर्यात करणारा जागतिक स्तरावरचा तिसरा सर्वाधिक मोठा देश असल्याची माहिती जर्दोश यांनी यावेळी दिली.

****

वरीष्ठ गटाची ८४ वी राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा काल पुण्यातल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू झाली. महाराष्ट्राच्या शुभंकर डे आणि मालविका बनसोड यांनी आपापल्या सामन्यांमध्ये विजय मिळवला. मात्र कर्नाटक संघाकडून महाराष्ट्राला तीन - दोन असा पराभव पत्करावा लागल्यामुळे यजमान संघाचं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं.

****

धुळे इथल्या गरुड मैदानावर राज्यस्तरीय खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेचं काल उद्घाटन झालं. फ्री स्टाईल, ग्रीको रोमन, महिला संघ या तीन प्रकारात दहा वजनी गटांमध्ये या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी राज्यभरातून ३० संघ आणि ६५० पेक्षा अधिक कुस्तीपटू, प्रशिक्षक सहभागी झाले आहेत.

****

No comments: