Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 February 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ फेब्रुवारी २०२३ सायंकाळी
६.१०
****
·
एमपीएससीचा
नवा अभ्यासक्रम २०२५ पासून - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.
·
राज्यातल्या
सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयातली पुढील सुनावणी येत्या मंगळवारी.
·
राज्यात
वन औद्योगिक विकास महामंडळ सुरू करणार - सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा.
आणि
·
राजकीय
नाट्याला हळूहळू बाहेर आणू - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
****
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग-एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम
२०२५ पासून लागू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारांशी बोलताना
केली. विद्यार्थ्यांनी या संदर्भात केलेल्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचं
त्यांनी सांगितलं. आपण तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात आयोगाशी
चर्चा करुन हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या हिताच्या
या निर्णयाचं आपण स्वागत करतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. विद्यार्थ्यांच्या या संदर्भातल्या
आंदोलनाला काही जणांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे
यांनी यावेळी केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानंही आज सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे
या संदर्भातली माहिती दिली आहे.
****
राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च
न्यायालयात सुनावणी झाली. कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी आज ठाकरे गटाची
बाजू पुढे मांडताना अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. एकनाथ शिंदे यांची बंडखोरी,
त्यांचा बहुमताचा दावा, त्यांचा शपथविधी या घटनाक्रमाचा उल्लेख करून त्यावर भूमिका
मांडली. सिब्बल यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतले. त्यावर सरन्यायाधीश
धनंजय चंद्रचूड यांनी राज्यपाल बहुमताचा निर्णय घेऊ शकतात का, असा प्रश्न विचारला.
सिंघवी यांनी बहुमत चाचणी आणि आमदारांची अपात्रता या मुद्द्यावर भूमिका मांडली. त्यावेळी
बहुमत चाचणीला उद्धव ठाकरे सामोरे गेले असते, तर परिस्थिती वेगळी असू शकली असती अशा
आशयाचं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी आता येत्या
मंगळवारी २८ तारखेला होणार आहे.
****
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या धर्तीवर आता वन
औद्योगिक विकास महामंडळ (एफआयडीसी) सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वनमंत्री
सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. त्यांच्या हस्ते वन विकास महामंडळाच्या नागपूर इथं
झालेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेचं पुरस्कार वितरण करण्यात आलं, त्यावेळी मुनगंटीवार
बोलत होते. या माध्यमातून वन आधारित उद्योगांना चालना देण्यात येणार असल्याचं त्यांनी
नमूद केलं. लवकरच वन विभागाच्या आणि वन विभाग विरुद्ध वन विकास महामंडळ अशा विभागीय
क्रीडा स्पर्धा घेण्यात येतील, असं ते म्हणाले. वन विकास महामंडळाने सांस्कृतिक महोत्सव
देखील घ्यावे, असं आवाहन त्यांनी केलं. नुकत्याच आलेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार
दोन हजार ५५० वर्ग किलोमीटरचं वनक्षेत्र महाराष्ट्रात वाढलं आहे. कांदळवनांमध्येही
१०२ वर्ग किलोमीटरची वाढ झाली आहे. त्यामुळेच केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी कांदळवन संवर्धनाची संकल्पना देशभरात राबविण्याची
घोषणा केली, असं मुनगंटीवार म्हणाले.
****
संत गाडगेबाबा यांची जयंती आज राज्यभरात विविध उपक्रमांनी
साजरी होत आहे. संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवनात
संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. राजभवनातील अधिकारी,
कर्मचारी तसंच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. संत गाडगेबाबा महाराज
यांना जयंतीनिमित्त आज मंत्रालयातही अभिवादन करण्यात आलं. बीड इथल्या स्वातंत्र्यवीर
सावरकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत संत गाडगेबाबा यांच्या
जयंती निमित्त शहरातल्या कंकालेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं.
स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्याच्यापूर्वी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन
करण्यात आलं.
****
‘जी २०’ देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरची
दोन दिवसीय बैठक उद्या कर्नाटकात बेंगळुरू इथं सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळच्या
सत्रात जी २० देशांच्या केंद्रीय बँकांच्या उपप्रमुखांनी ‘क्रिप्टो’ मालमत्ता तसंच
‘नीती दृष्टिकोन’ या विषयांवर विचारविनिमय केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
आणि अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट एल येलेन तसंच सीतारामन आणि इटलीचे अर्थमंत्री जियानकार्लो
जियोरजेटी यांच्यातही आज बैठक झाली.
****
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करून त्यांना
हजर करण्याचा आदेश राष्ट्रीय जनजाती आयोगानं दिला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या जिवती
तालुक्यातल्या कुसुंबी गावातल्या आदिवासींच्या जमीन प्रकरणात हा आदेश देण्यात आला असून
एका सिमेंट कंपनीनं ही जमीन बेकायदेशीररीत्या संपादित केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात
आली आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगानं समन्स जारी करुनही त्याचं पालन न केल्याप्रकरणी
आयोगानं हा आदेश दिला आहे.
****
राज्यात घडलेल्या नाट्यपूर्ण राजकीय घडामोडींना आपण हळूहळू
बाहेर आणू, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहमदनगर इथं पत्रकारांशी बोलताना
सांगितलं. ते म्हणाले –
मी
काही बोललो की समोरून दुसरी गोष्ट बोलली जाते आणि त्यामुळे गोष्टी बाहेर येतात. असंच
हळूहळू मी सगळ्या गोष्टी बाहेर आणेन, तुम्ही काळजी करू नका. आम्ही वैचारिक विरोधक आहोत.
शत्रु बिलकुल नाही आणि महाराष्ट्रामध्ये मी असं म्हणेन की एक कल्चर आहे की ज्या कल्चरमध्ये
आपण वैचारिक विरोधक असतो. अलिकडच्या काळामध्ये थोडं शत्रुत्व आपल्याला पाहायला मिळतंय,
पण ते योग्य नाहीये. कधीतरी ते आपल्याला संपवावं लागेल. आणि म्हणून मला ज्या ज्या वेळी
मुलाखतीत विचारलं आहे त्या त्या वेळी मी हे सांगितलं आहे, की उद्धवजी असतील किंवा आदित्य
असतील हे काही माझे शत्रु नाहीत. वैचारिक विरोधक झालो कारण आता त्यांनी दुसरा विचार
पकडला मी वेगळा विचार पकडला.
****
भारतीय रंगमंचाची अनादिकाळापासून परंपरा असलेल्या भरतमुनींच्या
नाट्य शास्त्राचा पुनराविष्कार होणं गरजेचं असल्याचं दिल्ली इथल्या राष्ट्रीय संस्कृत
संस्थानचे सेवानिवृत्त कुलगुरु राधावल्लभ त्रिपाठी यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथल्या
सरस्वती भुवन कला - वाणिज्य महाविद्यालय, दिल्ली इथली प्रतिभा सांस्कृतिक संस्था, तसंच
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं आजपासून २५ फेब्रुवारी पर्यंत महाकवी भासभूमी
रंग उत्सव या नाट्य महोत्सवाला प्रारंभ झाला. त्यावेळी ‘नाट्यशास्त्राची प्रासंगिकता’
या विषयावर बीज भाषण करताना त्रिपाठी बोलत होते. भरतमुनींचं हे नाट्य शास्त्र मागील
एक हजार वर्षांपासून विस्मरणात गेलं आहे. या नाट्य शास्त्राचं एक छोटं रुप केरळमध्ये
उडीयाट्टमच्या रुपात आजही सादर केलं जातं. वैदिक काळापासून चालत आलेल्या या नाट्यशास्त्राचा
पुर्ण विकास आवश्यक असल्याचं त्रिपाठी यांनी यावेळी सांगितलं.
****
स्वयंअध्ययन साहित्य ही कोणत्याही मुक्त विद्यापीठाची
खरी ताकद आणि कणा आहे असं प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू
प्राध्यापक डॉ. इंद्रमणी यांनी केलं आहे. त्यांच्या उपस्थितीत नाशिक इथं यशवंतराव चव्हाण
महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २८ व्या दीक्षांत समारंभात आज ते बोलत होते. समारंभाच्या
अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत पाटील होते. नवं शैक्षणिक धोरण
एन ई पी २०२० ची बीजं खुल्या आणि दूरस्थ शिक्षण प्रणालीत दडलेली आहेत, असं डॉक्टर इंद्रमणी
म्हणाले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
२०२० ने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठातील विद्यमान सर्व शैक्षणिक शिक्षणक्रमांमध्ये
बदल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून येत्या शैक्षणिक वर्षापासून बहुतांश शिक्षणक्रम
नव्या स्वरूपात दिले जाणार आहेत अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर पाटील यांनी
यावेळी दिली.
****
नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा
पंचविसावा दीक्षान्त समारंभ आणि विशेष दीक्षान्त समारंभ उद्या २४ तारखेला पार पडणार
आहे. या विशेष दीक्षान्त समारंभामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे माजी
शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम यांना डि. लीट. ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार
आहे. या दीक्षान्त समारंभाला राज्यपाल तसंच कुलपती रमेश बैस उपस्थित असतील.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत
असलेल्या गावतांडा इथं अफूच्या शेतीवर पोलिसांनी आज छापा टाकून तीन लाख रुपये किमतीची
झाडं असलेला मुद्देमाल जप्त केला. या संदर्भात गुन्हा नोंदवण्याची कारवाई सुरू असल्याचं
पोलिसांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment