Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 23 February
2023
Time : 07.10
AM to 07.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २३ फेब्रुवारी २०२३ सकाळी ७.१०
मि.
****
ठळक
बातम्या
· गुढीपाडवा
तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा
देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
· केंद्रीय
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्धच्या ठाकरे गटाच्या याचिकेवर आता दोन आठवड्यांनी सुनावणी,
ठाकरे गटाला पक्षाचं नाव आणि मशाल चिन्ह कायम ठेवायला परवानगी
· राष्ट्रपती
राजवट उठण्यास पहाटेच्या शपथविधीचा फायदा झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
शरद पवार यांचं मत
· इयत्ता
पहिलीत बालकांच्या प्रवेशाचं वय किमान साडेसहा वर्षे करण्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे
निर्देश
· भारतीय
विद्यापीठ महासंघाच्या पश्चिम विभागीय परिषदेचा समारोप, परीक्षा केंद्रीत शिक्षण पद्धत
बदलण्याची गरज असल्याचं महासंघाच्या महासचिव डॉ.पंकज मित्तल यांचं मत
· ज्येष्ठ
शास्त्रीय नृत्यांगना डॉ. कनक रेळे यांचं निधन
· शेतीमालाच्या
प्रश्नावर आणि वीज दरवाढ विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्यभरात चक्का जाम आंदोलन
आणि
· महिला
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा ऑस्ट्रेलियासोबत उपान्त्य फेरीचा
सामना
सविस्तर
बातम्या
गुढीपाडवा तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना
१०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. याचा लाभ एक कोटी ६३ लाख शिधा
पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता.
अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसंच औरंगाबाद आणि
अमरावती विभागातल्या सर्व आणि नागपूर विभागातल्या वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त
जिल्ह्यातल्या दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना, एक किलो रवा,
एक किलो चना डाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून
पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात
दिला जाईल. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल.
अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातल्या उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या
कामास गती देण्यासाठी पाच हजार १७७ कोटी रुपये खर्चास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय
देखील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे ६८ हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट
लाभ होणार आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना
म्हणून मान्यता देण्याच्या, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरे
गटानं दाखल केलेल्या याचिकेवर, सर्वोच्च न्यायालयानं काल प्रतिपक्षाला नोटीस बजावली
आहे, मात्र आयोगाच्या निर्णयाला स्थगिती द्यायला नकार दिला. त्याचवेळी, हे प्रकरण न्यायालयात
प्रलंबित आहे तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नाव आणि मशाल हे निवडणूक
चिन्ह कायम ठेवायला न्यायालयानं परवानगी दिली आहे.
शिंदे गटाला अधिकृत शिवसेना ठरवल्यामुळे ते पक्षाची मालमत्ता
आणि बँक खात्यांवर कब्जा करण्याची शक्यता असल्याचं सांगत, जैसे थे आदेश देण्याची विनंती,
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली. मात्र, निवडणूक आयोगानं निवडणूक चिन्ह कायद्याच्या
संदर्भात निर्णय दिला आहे. पक्ष निधी किंवा मालमत्ता यांचा उल्लेख आयोगाच्या आदेशात
नाही, त्यामुळे न्यायालय याबाबत आदेश देऊ शकत नाही, असं न्यायालयानं सांगितलं. ठाकरे
गटाची याचिका आम्ही विचारात घेतली आहे मात्र, या टप्प्यावर त्या आदेशाला स्थगिती देता
येणार नाही, असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सांगितलं. आता या याचिकेवर पुढची
सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे. तोपर्यंत व्हीप बजावून ठाकरे गटाच्या आमदारांविरूद्ध
अपात्रतेची प्रक्रिया सुरू करणार नसल्याचं आश्वासन शिंदे गटानं न्यायालयानं विचारणा
केल्यानंतर दिलं.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाबद्दल उच्च न्यायालयात न जाता
ठाकरे गटानं थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे, असं सांगत शिंदे गटाचे वकील नीरज
किशन कौल यांनी, या याचिकेला आक्षेप घेतला. त्यावर, या याचिकेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापुढे
प्रलंबित असलेल्या प्रकरणाशीच थेट संबंधित असताना उच्च न्यायालयात जाऊन काय करायचं,
असा सवाल सिब्बल यांनी केला.
****
दरम्यान, राज्यातल्या सत्तासंघर्षावर काल सलग दुसऱ्या दिवशी
सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय
घटनापीठासमोर सुनावणी झाली. शिवसेना नेता निवड प्रक्रिया, एकनाथ शिंदे यांची गटनेते
म्हणून निवड, प्रतोद नियुक्ती आदी मुद्यांवर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद
केला. ठाकरे गटाच्या युक्तिवादानंतर शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करतील. आज देखील ही
सुनावणी सुरू राहणार आहे.
****
ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ
करण्यात आली आहे त्यांच्या सुरक्षेसाठी एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन पोलीस कर्मचारी
यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राऊत यांनी मंगळवारी आपल्याला जीवे मारण्याचा कट असल्याचा
गंभीर आरोप करणारं पत्र मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तांना पाठवलं होत, त्यासंदर्भात
ठाणे पोलिसांच्या विशेष पथकानं काल नाशिक इथं जाऊन राऊत यांचा जबाब नोंदवून घेतला.
****
राष्ट्रपती राजवट उठली हाच पहाटेच्या शपथविधीचा फायदा आहे,
त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद
पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यात चिंचवड तसंच कसबा पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं ते काल
पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रपती राजवट उठली नसती, तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री
झाले असते का, असा प्रश्न त्यांनी विचारला. कट्टर शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत
आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रचारासाठी नेत्यांच्या गर्दीने निवडणूक
जिंकता येत नाही. गर्दी जनमानसात किती प्रभावी आहे, हे महत्त्वाचं असतं, असंही पवार
यांनी नमूद केलं.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात
बोलताना, पवार यांनी पहाटेच्या शपथविधीपाठोपाठ आणखीही खुलासे करावेत, राष्ट्रपती राजवट
कोणाच्या सांगण्यावरून लागली, हे देखील सांगावं, असं आवाहन दिलं.
****
इयत्ता पहिलीत बालकांच्या प्रवेशाचं वय किमान साडेसहा वर्षे
करण्यात यावं, असे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिले आहेत. मुलांसाठी तीन वर्षे
ते आठ वर्ष वयापर्यंतचा पाच वर्षांचा काळ अनेक गोष्टी शिकण्याचा असतो, ज्यामध्ये पूर्व-प्राथमिक
शिक्षण आणि दोन वर्षांचं बालवाडी शिक्षण यांचा समावेश होतो. यासाठी राज्यांना त्यांच्या
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात दोन वर्षांचा डिप्लोमा इन प्रीस्कूल एज्युकेशन - डी
पी एस ई अभ्यासक्रम तयार करण्याची आणि चालवण्याची प्रक्रिया सुरू करण्याची सूचनाही
शिक्षण मंत्रालयाने केली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद -एस सी ई
आर टी द्वारे हा अभ्यासक्रम तयार केला जाणं, तसंच एस सी ई आर टी ची देखरेख आणि नियंत्रणाखाली,
जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थाद्वारे त्याची अंमलबजावणी होणं अपेक्षित आहे. बालवाडी
केंद्रांमध्ये शिकणाऱ्या सर्व मुलांसाठी तीन वर्षांच्या दर्जेदार प्री-स्कूल शिक्षणाची
उपलब्धता सुनिश्चित करण्याची आवश्यकता असल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे.
****
महसूल विभागाच्या बळकटीकरणासाठी शासन सदैव सकारात्मक राहिल,
अशी ग्वाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. राज्य शासनाच्या महसूल आणि वन
विभागाच्या वतीनं, अहमदनगर जिल्ह्यातल्या राहता तालुक्यात लोणी इथं, राज्यस्तरीय महसूल
परिषदेचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सरकारनं
आतापर्यंत २२ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असल्याचं, राज्यातलं साडेपाच
लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नागरिकांची
कामं पारदर्शकपणे आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करणं, तसंच सर्वसमावेशक शासकीय धोरण निश्चित
करण्यासाठी ही महसूल परिषद महत्त्वाची ठरणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. आज या परिषदेचा
आज समारोप होणार आहे.
****
परीक्षा केंद्रीत शिक्षण पद्धत बदलण्याची गरज असल्याचं
मत, विद्यापीठ महासंघाच्या महासचिव डॉ.पंकज मित्तल यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद
इथं भारतीय विद्यापीठ महासंघाच्या पश्चिम विभागीय परिषदेचा काल समारोप झाला, त्यावेळी
त्या बोलत होते. २०२५ हे विद्यापीठ महासंघाचं शतक महोत्सवी वर्ष असून, यासाठी विविध
उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाच्या वतीने ही परिषद घेण्यात आली. या परिषदेच्या सहा सत्रातील विचार दिशादर्शक
ठरतील, असा विश्वास कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी यावेळी व्यक्त केला. या परिषदेत
उपस्थित कुलगुरुंनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला भेट दिली, यावेळी विविध
सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
****
सत्तेनं, संपत्तीनं आणि बुद्धीनं समाजातल्या ज्या घटकाला
वरती खेचायचं आहे, त्यांच्यासाठी समाजातल्या प्रत्येक वरच्या घटकानं साखळी करुन त्यांना
वर खेचल्यास समाजाचं जगणं सुंदर होणार असल्याचं मत, शिव व्याख्याते प्रशांत देशमुख
यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं देवगिरी महाविद्यालयाच्या फुले, शाहू आंबेडकर
व्याख्यानमालेत जगणं सुंदर आहे, या विषयावर ते काल बोलत होते. सर्व महापुरुषांनी खुप
हाल उपेक्षा सोसून समाजाचं जगणं सुंदर केलं, त्या मानाने आपण थोडं काही तरी करण्याचं
आवाहन त्यांनी यावेळी केलं. आज या व्याख्यानमालेत विधिज्ञ उज्ज्वल निकम हे न्यायव्यवस्था
आणि जनतेच्या अपेक्षा, या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.
****
ज्येष्ठ शास्त्रीय नृत्यांगना आणि नृत्य दिग्दर्शक डॉ.
कनक रेळे यांचं काल मुंबईत निधन झालं, त्या ८५ वर्षांच्या होत्या. मोहिनीअट्टम तसंच
कथकली नृत्य प्रकारात त्या विशेष पारंगत होत्या. त्यांना पद्म भूषण, पद्मश्री, संगीत
नाटक कला अकादमी पुरस्कार, कालीदास सन्मान आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.
देशात शास्त्रीय नृत्यामध्ये पीएचडी करणाऱ्या त्या पहिल्या महिल्या होत्या. राज्यपाल
रमेश बैस यांनी रेळे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. शास्त्रीय नृत्य क्षेत्रातल्या
एका महान नृत्य तपस्विनीला गमावलं असल्याचं राज्यपाल बैस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं
आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली शोकभावना व्यक्त
करताना, शास्त्रीय नृत्याला जीवन समर्पित करणाऱ्या ज्येष्ठ नृत्य गुरूला आपण मुकलो,
असं म्हटलं आहे.
****
वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार उत्तम पटवारी
यांचं काल पुणे निधन झालं, ते ८९ वर्षांचे होते. १९७० ते १९८० या काळात ते आमदार होते.
१९७४ साली त्यांनी वैजापूर नगर परिषदेची निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला
होता. वैजापूरच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं
होतं. पटवारी यांच्या पार्थिवावर काल पुणे इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं आरोपीस पकडण्यासाठी गेलेले
पोलिस फौजदार गोळी लागून जखमी झाल्याची घटना काल घडली. बबलू हत्यारसिंग टाक यावर मोक्कांतर्गत
गुन्हा दाखल आहे. फौजदार माजिद खान हे त्याला अटक करण्यासाठी फौजफाट्यासह गेले असता,
आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झटापट होऊन माजिद यांना एक गोळी लागली.
ही गोळी पोलिसांच्या पिस्तुलातून सुटलेली असल्याचं पोलिस विभागाकडून जारी पत्रकात म्हटलं
आहे. फौजदार माजिद यांच्यावर कळमनुरी इथं प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी
नांदेड इथं पाठवण्यात आलं आहे.
****
राज्यभरात काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं शेतीमालाच्या
प्रश्नावर आणि वीज दरवाढ विरोधात चक्का जाम आंदोलन करण्यात आलं.
लातूर जिल्ह्यात लातूर - बार्शी रस्त्यावरील बोरगाव काळे
इथं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलन कर्त्यांच्या मागण्यांचं निवेदन तहसीलदारांमार्फत
मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं.
नाशिक जिल्ह्यात वणी -नाशिक रस्त्यावर शेतकऱ्यांनी चक्काजाम
आंदोलन केलं तसंच यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे आणि द्राक्षं फेकत प्रशासनाचं
लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळं रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली
होती.
मालेगाव इथं जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानावर
मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी कांदे तसंच द्राक्षांच्या माळा गळ्यात धारण
करून रास्ता रोको आंदोलन केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, सोलापूर शहरात एका शेतकऱ्याला काल अवघ्या ४ रुपये
किलो दरानं कांदे विकावे लागल्यानं शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.
****
सातवा वेतन आयोग लागू न झालेल्या एक हजार ४१० शिक्षकेत्तर
कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे विद्यापीठातल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुकारलेला
बेमुदत संप मागे घेण्यात आला. कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ.कैलास पाथ्रीकर
यांनी ही माहिती दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या सर्व कर्मचाऱ्यांनी
काल सकाळी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर द्वारसभा घेतली. यावेळी संप स्थगित करण्यात आल्याबद्दल
तसंच मान्य झालेल्या मागण्याबद्दल कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आल्याचं पाथ्रीकर यांनी
सांगितलं.
****
उस्मानाबाद इथं आज मिलेट दौड रॅलीचं आयोजन करण्यात आलं
आहे. पौष्टीक तृणधान्याचं महत्व लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कृषि विभागामार्फत जनजागृतीच्या
उद्देशानं काढण्यात येणार्या या रॅलीची सुरुवात मध्यवर्ती प्रशासकीय इमारती पासून सुरु
होणार आहे. या रॅलीत शासकीय कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी अभिमन्यु काशिद यांनी केलं आहे.
****
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिला टी - ट्वेंटी क्रिकेट
विश्वचषक स्पर्धेत भारताचा उपान्त्य फेरीचा सामना आज ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. भारतीय
वेळेनुसार संध्याकाळी साडे सहा वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर स्पर्धेतला दुसरा
उपान्त्य सामना उद्या तारखेला इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणार आहे.
****
लातूर तालुक्यातल्या बोरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत
सहा आरोग्य उपकेंद्रापैकी कव्हा इथल्या आरोग्य उपकेंद्राला, आर.आर.पाटील, सुंदर ग्राम
पुरस्कार योजनेच्या माध्यमातून, २०१२-२२ या वर्षासाठी, दहा लाखांचं पहिलं आणि आरोग्य
क्षेत्रातील कार्याबद्दल २५ हजारांचं पारितोषिक जाहीर झालं आहे. त्यासंदर्भात दिल्लीच्या
केंद्रीय पथकानं या उपकेंद्राला भेट देत, आयुष्यमान भारत आणि एचडब्ल्यूसी अंतर्गत मिळणाऱ्या
योजनांची पाहणी केली.
****
नांदेड इथं एक ते पाच मार्च दरम्यान जिल्हा कृषि महोत्सवाचं
आयोजन करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचं औचित्य साधून,
कृषि विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं
असून, याचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक
रविशंकर चलवदे यांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment