Friday, 24 February 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.02.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२४ फेब्रुवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

जी 20 देशांच्या अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांची बैठक आज बंगळुरू इथं सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अमेरिकेचे अर्थमंत्री जेनेट येलें आणि इटलीचे अर्थमंत्री जियानकार्लो जिओर जेटी यांची भेट घेतली.

****

मध्य प्रदेशात खजुराहो इथं जी 20 सांस्कृतिक कार्यकारी समुहाच्या पहिल्या बैठकीचं उद्घाटन केंद्रीय मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते काल झालं. परस्पर संबंध टिकवून ठेवण्यासाठी संस्कृती महत्त्वाची असून, जी 20 चं हे व्यासपीठ संस्कृतीला बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

****

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती आणि अमरावतीचे माजी आमदार देवीसिंग शेखावत यांचं आज पुणे इथं वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर पुणे इथंच अंतिम संस्कार होणार असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.

****

खुल्या बाजारात विक्री योजनेंतर्गत गव्हाच्या लिलावासाठी प्रस्तावित ११ लाख ७९ हजार मेट्रिक टन गव्हापैकी सुमारे पाच लाख मेट्रिक टन गव्हाचा लिलाव झाल्याचं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं. देशांतर्गत खुल्या बाजारात विक्री योजनेंतर्गत गव्हाच्या विक्रीसाठी तिसरा ई-लिलाव काल झाला असून चौथा लिलाव एक मार्चला होणार आहे.

****

आयुष्मान भारत डिजिटल अभियानाअंतर्गत स्कॅन आणि शेअर सेवेचा लाभ पाच लाखांहून अधिक रुग्णांनी घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. गेल्या पाच महिन्यात या जलद ओपीडी नोंदणीमुळे रूग्णांचा वेळ वाचल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

****

राज्य शासनाचा महिला आणि बाल विकास विभाग, आणि मुंबईच्या स्वनाथ फाउंडेशन यांच्यात काल राज्यातल्या ५० बालकांचं प्रतिपालकत्व घेण्यासंदर्भात सामंजस्य करार झाला. बाल सुधारगृह अथवा महिला सुधारगृहामध्ये जी मुलं - मुली राहतात, त्यांची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या राहण्याचा प्रश्न उभा राहतो. अशा मुलांच्या पालकत्वासाठी सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या संस्थांनी पुढे यावं, असं आवाहन महिला आणि बाल विकास मंत्री मंगलप्रसाद लोढा यांनी यावेळी केलं.

****

No comments: