Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 27 February
2023
Time : 07.10
AM to 07.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ फेब्रुवारी २०२३ सकाळी ७.१०
मि.
****
ठळक
बातम्या
· राज्य
विधीमंडळाचं आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, नऊ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प
· सोलापूरच्या
कांदा उत्पादक शेतकऱ्याला ५१२ किलो कांद्याचे दोन रुपये देणाऱ्या व्यापाऱ्याचा परवाना
१५ दिवसांसाठी निलंबित,
· छत्रपती
संभाजीनगर आणि धाराशिव शहरांच्या नामांतरापाठोपाठ आता जिल्ह्यांच्या नामांतराची प्रक्रिया
सुरू - देवेंद्र फडणवीस
· सरकारच्या
चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार
· अधिवेशनास
उपस्थित राहण्यासंदर्भात शिवसेनेचा सर्व ५५ आमदारांना पक्षादेश
· राज्य
आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकष आणि दरांमध्ये सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा
निर्णय
· छत्रपती
संभाजीनगर शहरात आजपासून दोन दिवसीय G-20 जागतिक परिषदेच्या W-20 ची प्रारंभिक बैठक,
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते उद्घाटन
· पुण्यातल्या
कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत ५० टक्के मतदान
· वेरुळ
- अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा शंकर महादेवन यांच्या गायनानं आज समारोप
आणि
· महिला
टी 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा विजेतेपद
राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत
सुरु होत आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं सकाळी ११ वाजता या अधिवेशनाला
सुरुवात होईल. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस नऊ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प
सादर करतील.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार धोरणात्मक निर्णय
घेणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला
चहापानानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार
कायम उभं राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्य सरकारने गेल्या काही महिन्यात
शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. विरोधी पक्षाकडून
होणाऱ्या आरोपांबाबत बोलताना, विरोधकांची भूमिका दुटप्पीपणाची असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी
यावेळी केली. ते म्हणाले..
Byte…
घटनाबाह्य
सरकार घटनाबाह्य सरकार अरे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्वय, घटना आहे. नियम आहे, कायदे
आहेत. आणि निवडणूक आयोगाने शिवसेना अधिकृत पक्ष, धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह आम्हाला
दिलं. सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली नाही. याचा अर्थ तुमच्या बाजुने निकाल
दिला की ते चांगल, तुमच्या विरोधात निकाल दिला की ते वाईट. असं कसं काय दुटप्पी भूमिका
तुम्ही घेऊ शकता? त्यामुळे वैफल्यग्रस्त ते झालेत सत्तेच्या बाहेर पडल्यामुळे. कसंय
आरोप करतांना त्याला थोडे पुरावे पाहिजेत, काहीतरी तथ्य पाहिजे त्याच्यामध्ये. आणि
हो आपल्याला आरोप करायला काय कुणीही आरोप करू शकतो त्याला काही अक्कल लागत नाही.
सोलापूरच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला ५१२ किलो कांद्याचे
दोन रुपये देणाऱ्या व्यापाऱ्याचा परवाना १५ दिवसांसाठी निलंबित केल्याची माहिती उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव शहरांच्या नामांतरापाठोपाठ
जिल्ह्यांच्या नामांतराची प्रक्रिया सुरू असून, महसूल विभागाला त्याबाबत अधिसूचना काढण्याचे
निर्देश दिले असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले..
Byte…
छत्रपती
संभाजीनगर आणि धाराशिव हे जे दोन नावं आहेत याप्रमाणे केंद्र सरकारने त्याला बदलण्याची
मान्यता दिली आहे. ती मान्यता दिल्यानंतर महसूलचा आपला कायदा आहे, त्या कायद्यानुसार,
आपल्याला नोटीफिकेशन काढावं लागतं. ते नोटीफिकेशन आज किंवा उद्या निघेल. आणि मग ज्याला
आपण औरंगाबाद जिल्हा म्हणायचं तो छत्रपती संभाजीनगर जिल्हा होईल. तसंच धाराशिवचं देखील
आहे. तालुका जिल्हा आणि नगरपालिका या तिन्हीची अधिसूचना निघून त्याठिकाणी तो बदल होईल.
हे झाल्यानंतर आम्ही एअरपोर्ट ॲथॉरिटीला कळवू. रेल्वे ॲथॉरिटीला कळवू. मग ते त्यांच्या
सिस्टीममध्ये बदल करतील.
दरम्यान, सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल मुंबईत विधान भवन परिसरात पत्रकार परिषदेत ही
माहिती दिली. शेतकऱ्यांचे प्रश्न, कायदा आणि सुव्यवस्था, जिल्हा वार्षिक योजनेकडे सरकारचं
दुर्लक्ष, जाहिरातींवर करदात्यांच्या पैशातून उधळपट्टी, आदी मुद्यांवरून पवार यांनी
सरकारवर कडाडून टीका केली. विधीमंडळात विविध आयुधांचा वापर करून हे प्रश्न सरकारला
विचारणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यपाल रमेश बैस यांची काल विरोधी पक्षनेत्यांनी
राजभवनात सदिच्छा भेट घेतली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतलेल्या
शिष्टमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, धनंजय मुंडे, आदी मान्यवर
उपस्थित होते.
****
दरम्यान, आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनासाठी उपस्थित राहण्यासंदर्भात
शिवसेनेनं सर्व ५५ आमदारांना पक्षादेश- व्हिप बजावला आहे. अधिवेशनाला उपस्थित राहण्यासंदर्भात
हा व्हिप असून, उद्धव ठाकरे गटातल्या आमदारांनाही हा व्हिप बजावण्यात आला आहे. सर्वोच्च
न्यायालयाच्या घटनापीठाच्या सूचनेनुसार व्हीपचं उल्लंघन करणाऱ्या आमदारांविरुद्ध पुढील
दोन आठवडे कोणतीही कारवाई करणार नसल्याचं शिवसेनेचे
प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितलं.
****
राज्य आपत्ती प्रतिसाद निधी - एस डी आर एफ साठी केंद्र
सरकारनं निकष आणि दरांमध्ये सुधारणा केल्या असून, त्या सुधारणा स्वीकृत करण्याचा निर्णय
काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या सुधारणा २०२५-२६ पर्यंत
लागू असतील. तसंच या निर्णयांची अंमलबजावणी एक नोव्हेंबर २०२२ पासून होणार आहे. यामध्ये
४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास ७४ हजार रुपये, ६० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असल्यास
अडीच लाख रुपये आदींचा समावेश आहे.
जळगांव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालाच्या रुग्णालयाच्या
बांधकामासाठी ७११ कोटी १७ लाख ५६ हजार रुपयांच्या
सुधारित खर्चास काल या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या अंतर्गत ६५० खाटांचे
रुग्णालय आणि १५० विद्यार्थी क्षमतेचं वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात आजपासून G-20 जागतिक परिषदेच्या
W-20 बैठकीला प्रारंभ होत आहे. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मंत्री स्मृती
इराणी यांच्या हस्ते या बैठकीचं उद्घाटन होणार आहे. G20 चे शेर्पा अमिताभ कांत,
W20 च्या अध्यक्ष डॉ संध्या पुरेचा, केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ भागवत कराड, उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, यांच्यासह G20 चे माजी अध्यक्ष या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असतील.
छत्रपती संभाजीनगर इथं होत असलेली W20 प्रतिनिधींची ही
प्रारंभिक बैठक आहे. बैठकीच्या अध्यक्ष डॉ संध्या पुरेचा यांनी काल पत्रकार परिषदेत
ही माहिती दिली. या बैठकीनंतर W20 समूहाच्या राजस्थानात जयपूर इथं १३ आणि १४ एप्रिलला
तसंच तमिळनाडूत महाबलिपुरम् इथं १५ आणि १६ जूनला बैठक होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
आजपासून सुरू होत असलेल्या प्रारंभिक बैठकीत पाच प्राधान्य क्षेत्रावर चर्चा होणार
आहे. त्या पार्श्वभूमीवर बैठकीत सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींची पाच गटात विभागणी केली
असून, हा प्रत्येक गट दोन दिवसांत एकेका प्राधान्यक्षेत्रावर चर्चा करणार असल्याचं
पुरेचा यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या…
Byte…
भारताच्या
अध्यक्षतेखाली डब्ल्यू ट्वेंटी ने पाच प्रायोरिटी पॉईंटस् दिले आहेत. त्याच्यामध्ये
महिलांचे सक्षमीकरण, हवामानातील लवचिकता, आणि त्याच्यामधील जो काही बदल घडणार आहे,
त्याच्यात महत्वाची भूमिका स्त्रीया कशा निभावणार आहेत, तळागाळातील महिला नेत्यांसाठी
सक्षम परिस्थिती प्रणाली कशी तयार करता येईल त्याविषयी लक्ष केंद्रीत करण्यात येणार
आहे. पायाभूत सुविधा आणि कौशल्य विंग डिजीटल विभाजन कमी करण्यासाठी शिक्षण आणि कौशल्य,
याच्यासाठी महिलांसाठी मार्ग तयार करणे, आणि भारतातील महिलांद्वारे नेतृत्वाखाली महिलांच्या
नेतृत्वातून आपला विकास व्हावा, हे महत्वाचं ब्रीदवाक्य आपल्या प्रधानमंत्रीजींनी दिलंय,
त्याच्यावर आम्ही कॉन्स्नट्रेट करू.
आज या बैठकीत नॅनो, सुक्ष्म आणि स्टार्ट अप उद्योगातील
महिलांचं सक्षमीकरण, महिलांच्या नेतृत्वात भारताचा विकास, महिलांच्या यशोगाथा या विषयावर
परिसंवाद होणार आहेत. तर जागतिक पातळीवर महिलांशी संबंधित विषयांवर गटचर्चा होणार आहे.
दरम्यान, युरोपीय संघ आणि १९ देशांच्या सुमारे दीडशे महिला
प्रतिनिधी या बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले आहेत. या सर्व प्रतिनिधींचं
पारंपरिक पद्धतीनं वाद्यांच्या गजरात, लेझीमच्या तालावर स्वागत करण्यात आलं.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान
व्यवस्थापन कक्षाच्या वतीनं उभारण्यात आलेल्या स्टॉलला तुर्कस्तानातील महिला प्रतिनिधींनी
भेट दिली. यावेळी त्यांनी हातात बांगड्या भरल्या आणि मेंदी काढून घेतली. शहरात हॉटेल
रामा इंटरनॅशनल आणि वेरूळ लेणी परिसरात या स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठात
आयोजित जर्नी ऑफ एम्पॉवरमेंट - जनभागीदारी, औरंगाबादमधील महिला आणि मुलं, या विषयावरच्या
चर्चासत्रात जी20 चे प्रतिनिधी सहभागी झाले होते. महिला - पुरुष समानतेचा विषय आता
जुना झाला असून, त्या ही पुढे जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे, पुढच्या पिढीने वातावरणीय
बदलासाठी पुढे येण्याचं आवाहन महिला प्रतिनिधींनी यावेळी केलं.
****
पुण्यातल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या
पोटनिवडणुकीसाठी काल ५० पूर्णांक ४७ टक्के मतदान झालं. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन
ढोले यांनी ही माहिती दिली. कसबा पेठ मतदार
संघात ४५ पूर्णांक २५ शतांश टक्के आणि चिंचवड मतदारसंघात ४१ पूर्णांक १० दशांश टक्के
मतदान झालं आहे. मतमोजणी दोन मार्चला होणार आहे.
****
कला, संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचं आवाहन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेच्या
९८ व्या भागातून देशवासियांना संबोधित करत होते. देशपातळीवर घेण्यात आलेल्या अंगाई
लेखन स्पर्धा, रांगोळी स्पर्धेत सहभागी कलाकारांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी, त्यांच्या
रचनांचाही कालच्या मन की बात मध्ये समावेश केला. उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्कारानं
गौरवण्यात आलेल्या तरुण कलाकारांच्या सांगितिक क्षेत्रातल्या योगदानाचं पंतप्रधानांनी
कौतुक केलं. यामध्ये महाराष्ट्रातले वारकरी कीर्तनकार संग्रामसिंह सुहास भंडारे यांचाही
समावेश आहे.
ई संजीवनी अॅपच्या माध्यमातून १० कोटींहून अधिक रुग्णांना
दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपचार मिळाल्याबद्दल डॉक्टर आणि रुग्णांचं त्यांनी
यावेळी कौतुक केलं. डिजिटल इंडिया, स्वच्छता, टाकाऊतून टिकाऊ यासह अनेक मुद्यांवर पंतप्रधानांनी
भाष्य केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं सुरु असलेल्या वेरुळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय
महोत्सवाचा आज पद्मश्री शंकर महादेवन यांच्या गायनानं समारोप होत आहे. या महोत्सवात
काल तबला वादक अमित चौबे आणि मुकेश जाधव यांच्या साथीत उस्ताद सुजात हुसेन यांचं सतार
वादन, पद्मश्री शिवमणी यांचं ड्रम वादन, रवी चारी यांच सतार वादन, संगीत हल्दीपूर यांचं
पियानो, सेल्वा गणेश यांचं खंजीर वादन, सेल्डॉन डिसिल्वा बास गिटार तर अदिती भागवत
यांचं कथ्थक नृत्य सादरीकरण झालं. आज शेवटच्या दिवशी या महोत्सवात संगीता मुजुमदार
यांच्या एम स्टेप ग्रुपचं कथ्थक सादरीकरण तर नील रंजन मुखर्जी यांचं गिटार वादन होणार आहे.
****
माजी केंद्रीय गृहमंत्री, दिवंगत डॉ. शंकरराव चव्हाण आणि
कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नांदेड इथं आयोजित संगीत शंकर दरबार महोत्सवात
काल दुसऱ्या दिवशी कल्याण अपार यांचं शहनाई
वादन झालं. या कार्यक्रमात सीताभाभी राममोहनराव यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात
आला. पंडित नयन घोष यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. शंकर दरबारचे आयोजक माजी मुख्यमंत्री
अशोक चव्हाण यांनी यावेळी बोलताना, या सोहळ्यास
गर्दी नव्हे तर दर्दीं रसिकांची हजेरी असल्याचं नमूद केलं.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं कवी कुसुमाग्रज यांच्या
जयंतीच्या पूर्वसंध्येला कविता दिनानिमित्त काल छत्रपती संभाजीनगर इथं दोन विशेष पुरस्कार
प्रदान करण्यात आले. यंदाचा 'कविवर्य कुसुमाग्रज विशेष काव्यपुरस्कार' कोल्हापूरच्या
शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांना, प्रदान करण्यात आला.
तर हिंगोली इथले प्रसिद्ध कवी प्राध्यापक विलास वैद्य यांना जाहिर झालेला 'कवयित्री
लीला धनपलवार काव्यपुरस्कार' प्रकृती अस्वस्थामुळे घरपोच प्रदान करण्यात येणार असल्याचं
आयोजकांनी यावेळी सांगितलं.
****
धाराशिव शहराचे माजी उपनगराध्यक्ष यशपाल प्रल्हादराव सरवदे
यांचं काल पुणे इथं निधन झालं, ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यात एका खाजगी
रुग्णालयात उपचार सुरु होते. दलित पॅंथरचे महाराष्ट्राचे सरचिटणीस तसंच रिपब्लिकन पार्टी
ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस म्हणून काही काळ ते कार्यरत होते. धाराशिव
इथल्या नागबोधिनी रिसर्च सेंटरचे संस्थापक अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते तसंच धाराशिवच्या विकासात्मक
चळवळीतील अग्रणी म्हणूनही त्यांची ओळख आहे.
****
ऑस्ट्रेलियानं महिला टी20 विश्वचषक पटकावला आहे. दक्षिण
आफ्रिकेत केपटाऊन इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं दक्षिण आफ्रिकेचा
१९ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या संघानं दिलेलं १५७ धावांचं
लक्ष्य पार करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ निर्धारित षटकात १३७ धावाच करु शकला. ऑस्ट्रेलिया
महिला संघानं सहाव्यांदा विश्वचषक जिंकला आहे.
****
परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथं नांदेड मार्गावरील मालेवाडी
पाटी परिसरात काल राज्य परिवहन मंडळाची बस आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात
दुचाकीवरील तरुणासह वृद्धाचा मृत्यू झाला. ७० वर्षीय शिवाजी शिंदे आणि त्यांचा २२ वर्षीय
नातू श्रीनिवास शिंदे अशी या दोघांची नावं असून, ते पालम तालुक्यातले रहिवासी होत.
****
हिंगोली शहरात मुख्य बाजारपेठेतल्या हिंद प्रिंटीग प्रेस
आणि संगणकाच्या दुकानाला काल संध्याकाळी भीषण आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशामन
दलानं शर्थीचे प्रयत्न केले असून आगीच कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
****
No comments:
Post a Comment