Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 February 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ फेब्रुवारी २०२३ सायंकाळी
६.१०
****
·
W20
समूहाच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रारंभिक बैठकीचा आज समारोप.
·
शेतकऱ्यांसाठीची
प्रलंबित आर्थिक मदत येत्या ३१ मार्च पर्यंत देणार-मुख्यमंत्र्यांची घोषणा.
·
राज्याच्या
सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठात पुन्हा तीन दिवस सलग सुनावणी.
आणि
·
मसापचा
भगवंत देशमुख विशेष वाङमय पुरस्कार शाहू पाटोळे यांच्या ‘खिळगा’ या पुस्तकाला जाहीर.
****
G20 अंतर्गत W20 समूहाच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रारंभिक
बैठकीचा आज समारोप होत आहे. आज या बैठकीत चाकोरीबाहेरच्या महिलांच्या कथा या विषयावर
विशेष सत्र घेण्यात आलं. राज्यसभा खासदार डॉ.सोनल मानसिंग, भारतीय नौदलातील शाझिया
खान, दिशा अमृत, तविशी सिंग आणि स्वाती भंडारी, जम्मू आणि काश्मीर ग्रामीण उपजीविका
मिशनच्या सदस्य झुबेदा बीबी, यांनी आपले अनुभव कथन केले. ‘महिलांच्या नेतृत्वाखालील
विकास सुलभ करणारे: धोरण आणि कायदेशीर चौकट’ या विषयावरही आज चर्चासत्र घेण्यात आलं.
यूएन वुमन इंडियाच्या देश प्रतिनिधी सुसान जेन फर्ग्युसन, दक्षिण आफ्रिकेतील अधिवक्ता
प्राध्यापक नार्निया बोहलर, स्पेनमधील MLK लॉ फर्मच्या संस्थापक कॅथरीना मिलर, भारताच्या
सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता बन्सुरी स्वराज यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला.
छत्रपती संभाजी नगर या वारसा शहरासाठी महिलांनी दिलेलं
योगदान अधोरेखित करणाऱ्या ‘अवना’ या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं.
दरम्यान, W20 प्रतिनिधींनी आज सकाळी औरंगाबाद लेणी, बिबी
का मकबरा या ठिकाणी तर दुपारनंतर वेरुळ लेण्यांना भेट दिली. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाने
या दोन दिवसीय प्रारंभिक परिषदेची सांगता होत आहे.
या बैठकीनंतर W20 समूहाच्या राजस्थानात जयपूर इथं १३ आणि
१४ एप्रिलला तसंच तमिळनाडूत महाबलिपुरम् इथं १५ आणि १६ जूनला बैठक होणार आहे.
****
शेतकऱ्यांसाठीची प्रलंबित आर्थिक मदत येत्या ३१ मार्च
पर्यंत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते आज विधानसभेत
प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते.
बीड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे होणाऱ्या
नुकसान भरपाईचा मुद्दा प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी
राज्यभरात सहा हजार आठशे कोटी रुपये नियमित नुकसानापैकी सहा हजार कोटी रुपये तर सततच्या
पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी ७५५ कोटी रुपये वाटप झाल्याचं सांगितलं. तीन हजार ३००
कोटी रुपये अतिरिक्त नुकसा भरपाईची मागणी आली असून, त्याची वैधता तपासली जात असल्याचं
सांगितलं. कर्जाची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही अनुदान वाटप केलं जात असल्याची
माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत बोलताना, अजून
फार मोठा वर्ग या अनुदानापासून वंचित असल्याचं सांगितलं. हे अनुदान देण्यासाठी कालमर्यादा
जाहीर करावी, अशी मागणी पवार यांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही मदत ३१ मार्चपर्यंत
दिली जाईल, असं सांगितलं.
दरम्यान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी
आज दोन्ही सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. सरकारने या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट
करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभेत
केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार कांदा उत्पादकांच्या पाठिशी असून,
नाफेडद्वारे कांदा खरेदी सुरू झाल्याची माहिती दिली. दोन लाख अडोतीस हजार मेट्रिक टन
कांदा आत्तापर्यंत खरेदी झाला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कांदा निर्यातीवर
बंदी नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
विधानपरिषदेतही विरोधकांनी कांद्याचा मुद्दा उपस्थित करत
स्थगन प्रस्ताव मांडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलताना, २०१७-१८
मध्ये ज्या पद्धतीनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली तशीच मदत आता करणार असून,
शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करण्यासाठी कृषी विभागामार्फत बाजार हस्तक्षेप ही योजना सरकार
सुरू करत आहे, अशी माहिती दिली.
दरम्यान, आजचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते
अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी गळ्यात कांदा आणि कापसाच्या
माळा घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
****
पुण्यात भिडे वाड्याच्या स्मारकाचा प्रश्न छगन भुजबळ यांनी
प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी याबाबत बोलताना, येत्या १०
मार्चला न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी आहे, त्यापूर्वी या स्मारकाबाबतचे सर्व प्रश्न
सोडवण्याची सूचना प्रधान सचिवांना केल्याची माहिती दिली.
****
बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ५० लाखांवर उत्तरपत्रिका
तपासणीविना पडून असल्याचा मुद्दा आशिष शेलार यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी
याबाबत तातडीने बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली.
दोन लाख अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या
आंदोलनाकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लक्ष वेधलं. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात
बोलताना, अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलं.
सीमाभागातल्या नागरिकांनी मुंबईत येऊन पुकारलेल्या आंदोलनाकडे
छगन भुजबळ यांनी लक्ष वेधलं. सीमा भागातल्या नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभं असून त्यांच्यावर
कोणताही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत दिली. सीमावर्ती
भागातल्या तरुणांवर दाखल करण्यात आलेल्या केसेस मागे घ्यायला कर्नाटक सरकारला भाग पाडलं
असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनसाठी सरकार लवकरच धोरण निश्चित
करेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यांनी आज विधानसभेत दिली. यासाठी कुष्ठरोग पुनर्वसन
क्षेत्रात कार्य करणारे प्रकाश आमटे आणि विकास आमटे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश
असलेली समिती स्थापन करू, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जितेंद्र आव्हाड यांनी
या विषयावर लक्षवेधी उपस्थित केली होती.
****
शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी
आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी
त्यांचं पक्षात स्वागत केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक
नेत्यांनी पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
****
मिशन चांद्रयान-३ अंतर्गत भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोने
सीई-20 क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. पूर्वनिर्धारित २५ सेकंद कालावधीसाठी
ही चाचणी घेण्यात आली. चाचणी दरम्यान सर्व मानकं समाधानकारक आढळल्याचं इस्रोकडून सांगण्यात
आलं आहे. चांद्रयान-3 ही भारताची तिसरी चंद्र मोहीम जून महिन्यात सुरू करण्याचं नियोजन
आहे.
****
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांच्या याचिकांवर सर्वोच्च
न्यायालयात सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालच्या घटनापीठात आज पुन्हा सुनावणी सुरु झाली.
आता सलग तीन दिवस सुनावणी सुरु राहणार आहे. आज ठाकरे गटाच्या बाजूनं अभिषेक मनू सिंघवी
यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर तर, देवदत्त कामत यांनी पक्षप्रतोद निवडीच्या मुद्यावर
युक्तिवाद केला. देवदत्त कामत यांचा युक्तिवाद संपल्यानंतर शिंदे गटाच्या बाजूनं नीरज
किशन कौल यांनी युक्तिवाद सुरू केला. हे प्रकरण याच आठवड्यात पूर्ण करण्याची न्यायालयाची
इच्छा असल्याचे संकेत सरन्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान दिले.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचा यंदाचा भगवंत देशमुख विशेष
वाङमय पुरस्कार साहित्यिक शाहू पाटोळे यांच्या ‘खिळगा’ या पुस्तकाला जाहीर झाला आहे.
११ हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे. शाहू पाटोळे हे भारतीय
माहिती सेवेतून निवृत्त झाले आहेत. ‘भारत जोडो : उसवलेले दिवस’, ‘कुकनालिम’, ‘अन्न
हे अपूर्ण ब्रह्म’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. ‘मसाप’ चे अध्यक्ष कौतिकराव ठाले
पाटील यांनी या पुरस्काराची घोषणा केली. येत्या १९ मार्चला पाटोळे यांना हा पुरस्कार
समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
****
नांदेड इथं उद्यापासून बचत गटातल्या महिलांनी उत्पादित
केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री मेळावा आयोजित करण्यात आला आहे. महिला आर्थिक
विकास महामंडळामार्फत आयोजित हा मेळावा नांदेड शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
मैदानात होणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या मेळाव्यात पौष्टिक तृणधान्यांसह इतर खाद्यपदार्थ
आणि अनेक वस्तूंचे विविध प्रकार उपलब्ध असून, या महोत्सवाचा जास्तीत जास्त नागरिकांनी
लाभ घ्यावा, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment