Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 02 September - 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज तीन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आगमन झालं. आज कोल्हापूर जिल्ह्यात इथं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांचं स्वागत केलं. कोल्हापूर इथं वारणानगर इथं वारणा महिला सहकारी समूहाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभाला त्या उपस्थित राहतील. उद्या पुण्यात सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या २१ व्या दीक्षांत समारंभाला, तसंच मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाला त्या उपस्थित राहतील. तर चार तारखेला लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. उदगीरमध्ये महाराष्ट्र सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’च्या लाभार्थींच्या मेळाव्याला देखील त्या संबोधित करतील.
****
मराठवाड्याच्या बहुतांश भागात पावसाची संततधार आजही सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात आज पहाटे जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातलं जायकवाडी धरण ८७ टक्के भरलं असून, धरणातून गोदावरी नदीपात्रात कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठालगतच्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे.
जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्यानं, अनेक रस्त्यांवरचे पूल पाण्याखाली गेले आहेत, काही गावांमध्ये पुराचं पाणी वसाहतींमध्ये शिरल्याचं वृत्त आहे.
**
बीड जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मांजरा पाणीसाठा सुमारे पन्नास टक्के इतका झाल्याचं वृत्त आहे. बीड शहरातील बिंदुसरा नदीच्या काठावरील परिसराती नागरीकांनी सद्यस्थितीत सतर्कता बाळगण्याचं आवाहन आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलं आहे. क्षीरसागर यांनी आज अधिकाऱ्यांसोबत पूरस्थितीची पाहणी केली, तेव्हा ते बोलत होते, शहरातला चांदणी चौक ते जुना बाजारवेस पर्यंतचा जुना पुल रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे.
गेल्या २४ तासात बीड जिल्ह्यामध्ये ९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर दहा तालुक्यातल्या ६१ महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद प्रशासनाकडे झाली आहे. अतिवृष्टीने खरीप पिकांचे नुकसान झालं आहे.
**
जालना जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू असून, या पावसामुळे खरीप पिकांचं पंचेचाळीस पूर्णांक वीस टक्के नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.
**
परभणी जिल्ह्यात करापरा नदीला पूर आल्यामुळे जिंतूर तालुक्यातल्या अनेक गावांना पुराचा वेढा पडला असून, परभणी-जिंतूर महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. जिल्ह्यातल्या दिग्रस बंधाऱ्याचे चार दरवाजे उघडण्यात आले असून, सिद्धेश्वर धरणातूनही मोठया प्रमाणात पाणी सोडलं जात आहे. नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी सावध राहावं, पूर परिस्थितीत आवश्यक काळजी घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनांनी केलं आहे.
**
हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीने रौद्ररूप धारण केलं आहे. दहा ते पंधरा गावांतल्या शेतांमध्ये पुराचं पाणी शिरलं असून, त्यामुळे काही मजूर अडकले आहेत. डोंगरगाव पूल इथले सात जण पुराच्या विळख्यात अडकले होते, त्यातल्या पाच जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.
**
नांदेड इथल्या विष्णुपुरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. या धरणाच्या १२ दरवाजातून सध्या १ लाख ६९ हजार ८३ घनफूट प्रतिसेकंद वेगाने गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.
****
बैल पोळा आज साजरा होत आहे. आज ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बैलांना सजवून त्यांचं पूजन करून त्यांना कृतज्ञतापूर्वक पुरणपोळीचा घास भरवला जातो. सायंकाळी बैलांची मिरवणूक काढण्याचाही प्रघात आहे.
****
अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक पद्मश्री सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे. येत्या २१ सप्टेंबरला अंबाजोगाई इथं हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या रांजणी इथल्या नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड या खाजगी साखर कारखान्याला, पुण्याच्या वेस्ट इंडियन शुगर मीलस् असोसिएशनचा ‘‘संशोधन, विकास आणि नाविण्यपूर्ण उपक्रम’’ या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय नव आणि अपारंपारिक उर्जा विभागाच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संगिता कस्तुरे यांच्या हस्ते कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी.बी.ठोंबरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
****
पॅरिस पॅराऑलिंपिक स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू थुलासिमथी मुरुगेसन हिनं महिलांच्या एसयू पाच बॅडमिंटन प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरीत तिची लढत चीनच्या यँग क्युझियाशी होईल. दुसरीकडे, उपान्त्य फेरीतल्या पराभवानंतर मनिषा रामदास कांस्य पदकासाठी डेन्मार्कच्या कॅथरिन रोसेनग्रीनशी लढत देईल.
तीरंदाजीमध्ये राकेश कुमार याचं कांस्य पदक केवळ एका गुणानं हुकलं. कांस्य पदकासाठीच्या सामन्यात चीनच्या हे झिहाओनं त्याचा १४७-१४६ असा पराभव केला.
****
No comments:
Post a Comment