Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 07 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
ढोलताशाच्या गजरात आजपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर गणेशोत्सवाच्या चैतन्यमय पर्वास सुरवात झाली आहे. लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी राज्यभर सर्वत्र जय्यत तयारी सुरू असून धार्मिक रितीरिवाज, परंपरेला जपत मंगलमूर्तीचा उत्सव दरवर्षीप्रमाणं यंदाही साजरा करण्यासाठी गणेशभक्तांची लगबग पाहायला मिळत आहे. घरच्या बाप्पांसाठी आकर्षक सजावट ते अगदी पंचपक्वांनाच्या नैवेद्याचं नियोजनही महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक करत आहेत, राज्यात ठिकठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना होत असून गणेश मंदिरांवरही रोषणाई करण्यात आली आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशोत्सवानिमित्त आज देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा उत्सव देशाच्या अनेक भागांमध्ये सामूहिक आनंद आणि सामाजिक उर्जेचं एक सुंदर उदाहरण असल्याचं राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटलं आहे. “भारतीय परंपरेत गणेशाला शुभ आणि विघ्नहर्ता मानलं जातं. संकटांपासून सर्वांचं रक्षण व्हावं आणि समृद्धी यावी” यासाठी आपण प्रार्थना केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
गणरायांचं कृपाछत्र सर्व महाराष्ट्रातल्या जनतेवर राहावं आणि सर्वांचं जीवन सुखी, समृद्ध व्हावं अशी प्रार्थना गणरायांकडं केली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी आज श्री गणेशाची प्रतिष्ठापना केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार भक्कमपणे उभे राहील, राज्यातल्या सर्व नागरिकांसाठी सरकारनं दोन वर्षात विकासाचं पर्व आणलं असून शेतकरी आणि ज्येष्ठांच्या जीवनात बदल होत आहे याचं समाधान असल्याचं ते म्हणाले. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल असून आता महाराष्ट्र उद्योगपूरक बनला असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यात उद्योग येत असल्यानं रोजगारनिर्मितीही होत असून राज्याची भरभराट होत आहे. देशाला पुढं नेण्याचं काम महाराष्ट्र करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
****
नागपूर इथं श्री गणेश मंदिर टेकडी इथल्या आराध्य गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आज पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक पौराणिक श्रध्दास्थान अशी या गणेशाची ख्याती आहे. या ठिकाणी भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी ४० सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत तसंच चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
****
जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत दोनशे सत्तर उमेदवारी अर्ज वैध आढळले आहेत, तर ६२ अर्ज फेटाळण्यात आले आहेत. सहा जिल्ह्यांतल्या २६ विधानसभेच्या जागांसाठी एकूण ३२९ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. सोमवारपर्यंत नावं मागे घेता येतील. या टप्प्यासाठी २५ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाची तारीख जवळ आल्यानं जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्ष प्रचार आणि रॅलीवर भर देत आहेत.
****
मध्यप्रदेशातील जबलपूर इथं आज सकाळी सोमनाथ एक्स्प्रेस या रेल्वेगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले. सुदैवानं या अपघातात कुठल्याही जीवितहानीचं वृत्त नाही. या घटनेनंतर रेल्वेप्रशासन आवश्यक उपाययोजना करत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राष्टीय बाल पुरस्कारांसाठी नामांकनं पाठवण्याची मुदत या महिन्याच्या १५ तारखेपर्यंत असून भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी वीर बालदिनी म्हणजेच २६ डिसेंबर रोजी या पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार आहे. या संदर्भात पाच वर्षांपेक्षा जास्त आणि १८ वर्षांखालील अर्जदारांनी भारत सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करण्याचं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे.
****
अमरावती जिल्ह्यात होत असलेल्या सततचा पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे पिकांची पाहणी करून विमा भरपाई मिळण्यासाठी पीक विमा कंपनीकडे ४८ हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात बाधित पिकांचं सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या अंतर्गत कंपनीनं आतापर्यंत २६ हजार पूर्वसूचनांचं सर्व्हेक्षण पूर्ण केल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे.
****
गणेशोत्सव ते दिवाळी या कालावधीत नागरिकांनी मिठाई, प्रसाद आणि उघड्यावरील अन्नपदार्थ खरेदी करताना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन हिंगोली जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनानं केलं आहे. प्रसाद स्वतः तयार करून भाविकांना वितरीत करणाऱ्या गणेश मंडळांनी अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत नोंदणी करावी, तसंच जनतेनं अन्न पदार्थाची खरेदी करताना खबरदारी घ्यावी असंही जिल्हा अन्न प्रशासनानं आवाहन केलं आहे.
****
No comments:
Post a Comment