Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 September
2024
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
·
गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ-गणरायाच्या स्वागताची सर्वत्र
लगबग-बाजारपेठा फुलल्या
·
कल्याणकारी योजना जनतेपर्यंत
पोचवण्याचं काम माध्यमांनी करावं-मुख्यमंत्र्यांचं आवाहन
·
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या
तिमाहीत महाराष्ट्रात सर्वाधिक परकीय गुंतवणूक
·
धाराशिव जिल्ह्यातल्या
दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन
आणि
·
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत
उंचउडी प्रकारात भारताला सुवर्णपदक
****
गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. गेल्या आठवडाभरात ठिकठिकाणच्या सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये
वाजतगाजत आगमन झालेल्या भव्य गणेश मूर्तींची आज विधीवत प्रतिष्ठापना होईल. गणरायाचं स्वागत
करण्यासाठी घरोघरी देखील लगबग सुरू आहे. गणेश मखरांची सजावट आणि पूजा-नैवेद्यासाठी आवश्यक साहित्यानं
सर्वत्र बाजारपेठा फुलल्या असून, भाविकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. गणेशोत्सवानिमित्त राज्यात विविध ठिकाणी पर्यावरणपूरक, प्लास्टिकमुक्त स्पर्धेसारख्या
अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये बचत गटांमार्फत गणेश
मूर्ती आणि सजावटीच्या साहित्याची विक्री करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर इथं उमेद मार्फत १८३ बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या ९०
हजार मूर्ती भाविकांनी खरेदी केल्या असून, जवळपास एक कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल झाली आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या
आहेत. श्रीगणेश आपल्याला निसर्ग
पूजनाचा संदेश देतात, आपणही पर्यावरणाची काळजी घेऊया, निसर्ग संवर्धनाच्या उपक्रमांना पाठबळ देऊया, निसर्गाचं जतन-संवर्धन होईल, अशा प्रयत्नांत सहभागी
होऊया, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या
संदेशात म्हटलं आहे.
**
लोकांच्या हिताच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम माध्यमांनी करावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी
केलं आहे. मुंबईत काल सकाळ माध्यम
समूहाच्या सरकारनामा या राजकीय साप्ताहिकाचा शुभारंभ काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
झाला, त्यानंतर जाहीर मुलाखतीत ते
बोलत होते. बातम्या देताना
माध्यमांनी दोन्ही बाजू जाणून घेऊन वस्तुनिष्ठ माहिती लोकांपुढे मांडावी, असंही त्यांनी सांगितलं. शासनाच्या विविध योजनांची
माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ५२ पूर्णांक ४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या
महाराष्ट्रात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी समाजमाध्यमावरील संदेशात ही माहिती दिली. एप्रिल ते जून २०२४ च्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्रात एकूण सत्तर हजार सातशे पंच्याणव
कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य असून, तिथं १९ हजार ५९ कोटी तर दिल्ली राज्यात १० हजार ७७८ कोटी
इतकी गुंतवणूक झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुती सरकारचे प्रमुख असून, त्यांच्या नेतृत्वाखाली
विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते
काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत कसलाही
संभ्रम नसल्याचं, त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवण्याचा अधिकार आपल्याला नसून, याबाबतचा निर्णय भाजपाचं
संसदीय मंडळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्वजण मिळून घेतील, हा निर्णय निवडणुकीच्या आधी घ्यायचा की नंतर हे देखील
तेच ठरवतील, असं फडणवीस म्हणाले.
****
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आत्तापर्यंत राज्यातल्या १७२
मतदारसंघांचा आढावा घेतला असून, २५ सप्टेंबरपर्यंत सर्व मतदारसंघांचा
आढावा पूर्ण होईल, अशी माहिती काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली. ते काल मुंबईत
पत्रकार परिषदेत बोलत होते. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातल्या पुराची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री गेले, त्या राज्यांना मदत मिळावी
यासाठी कृषी मंत्री, अर्थमंत्री प्रयत्न करत आहेत. पण महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांकडे कोणाचंही
लक्ष नसल्याची टीका प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी केली.
****
आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी राज्य सरकारने १५ हजार ३६० कोटी रुपयांची तरतूद
केली असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
सांगितलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली
इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेत ते काल बोलत होते. सरकारने विविध समाजांसाठी
तसंच महिला आणि मुलांसाठी राबवलेल्या विविध योजनांची त्यांनी यावेळी माहिती दिली.
****
राज्याच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं
आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या राहाता पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या
लोकार्पण सोहळ्यात ते काल बोलत होते. आमदार पंकजा मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, यांच्यासह अनेक मान्यवर
यावेळी उपस्थित होते. विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात
नवी पहाट आणणं हे शासनाचं उद्दिष्ट आहे, असं विखे पाटील यांनी सांगितलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी
सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे. काल मुंबईतत पत्रकारांशी
बोलताना त्यांनी, ही योजना केवळ आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी सुरू केली असल्याचं मत व्यक्त केलं.
****
मुंबईतले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्येचा तपास मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय
अन्वेषण विभाग - सीबीआयकडे सोपवला आहे.
फेब्रुवारी महिन्यात फेसबुक लाइव्ह दरम्यान, गोळी झाडून
त्यांची हत्या झाली होती.
****
मॉर्गन स्टेनली कॅपिटल इंटरनॅशनलच्या इमर्जिंग मार्केट्स गुंतवणूक बाजार निर्देशांकात
भारताने चीनला मागे टाकलं आहे. या निर्देशांकात भरताचं वेटेज २२ पूर्णांक दोन सात टक्के, तर चीनचं वेटेज २१ पूर्णांक
पाच आठ टक्के इतकं आहे.
****
शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी
योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत राज्यात नऊ हजार २०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा
प्रकल्प उभारण्यात येत आहेत, त्यापैकी तीन मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या धोंदलगाव इथं कार्यान्वित झाला आहे. या
प्रकल्पामुळे एक हजार ७५३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पांतर्गत
संपूर्ण क्षमता डिसेंबर २०२५ पर्यंत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जाणार असल्याची
माहिती, महावितरणचे अध्यक्ष तथा
व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
****
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात एक हजार
७६७ युवकांना विविध आस्थापनामध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या इतर
आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी संकेतस्थळावर नोंदवून उमेदवारांना
नियुक्तीपत्र देण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता
आश्वासन मानांकन मिळालं आहे. एकाच वेळी अशा दहा आरोग्य संस्थांना मानांकन मिळवणारा धाराशिव हा राज्यातला
एकमेव जिल्हा ठरल्याचं, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश हरिदास यांनी सांगितलं. ते म्हणाले..
‘‘त्यातल्या दहाच्या दहा संस्था धाराशिव जिल्ह्याच्या ज्या
आहेत, त्या राष्ट्रीय मानांकन त्यांनी
प्राप्त केला. चांगल्या गुणांनी. याच्यामध्ये एक पीएचसी ज्यानी ९४% मार्क घेतले.
सगळ्यात कमी ज्यांनी मार्क घेतले ते सुद्धा ८८%. दहाच्या दहा संस्था एकाच वेळी
मानांकन प्राप्त करणारा हा आपला जो जिल्हा आहे, धाराशिव जिल्हा हा राज्यामध्ये सध्याला एवढ्या मोठ्या
संख्येने मानांकन मिळवणारा पहिला जिल्हा आहे.’’
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत काल उंच उडी प्रकारात प्रवीण कुमारनं सुवर्ण पदकाला
गवसणी घातली. या स्पर्धेतलं हे भारताचं
सहावं सुवर्ण पदक आहे. तर पुरुषांच्या शॉट पुट एफ 57 स्पर्धेत नागालँडचा होकाटो होतेजे सेमा यानं कांस्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारत सहा सुवर्ण, नऊ रौप्य आणि १२ कांस्र पदकांसह
एकूण २७ पदकं जिंकून पदकतालिकेत १७व्या स्थानावर आहे.
****
गुजरात इथं झालेल्या योनेक्स सनराइज् पश्चिम विभागीय अंतरराज्य बॅडमिंटन स्पर्धेत
छत्रपती संभाजीनगरच्या सोनाली मिरखेलकर हिनं महिला दुहेरी
गटात सुवर्णपद पटकावलं, तर मिश्र खुल्या गटात उपविजेतेपद पटकावण्याची कामगिरी केली आहे. चार ते सहा सप्टेंबर दरम्यान
या स्पर्धा झाल्या. सोनाली ही छत्रपती संभाजीनगर इथल्या पंडित जवाहरलाल नेहरू
महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.
****
नांदेड जिल्ह्यात पूर प्रभावित गावांमध्ये साथ रोग पसरणार नाही यासाठी जिल्हा
आरोग्य विभाग विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी संगीता
देशमुख यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या पूरप्रभावित २८ गावांमध्ये घरोघरी आरोग्य सेवकांमार्फत
सर्वेक्षण केलं जात असल्याचं, देशमुख यांनी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदार संघात एकूण २१ लाख ९७ हजार ८३० मतदार
आहेत. जिल्ह्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये ११ लाख ५८ हजार
९९८ पुरुष मतदार, दहा लाख ३८ हजार ८०९ महिला मतदार, तर २३ तृतीयपंथी मतदार आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांचा बिमोड करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन फ्लश
आउट अंतर्गत किनवट पोलिसांनी काल १३ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईत २० लाख ३८ हजारांचा
मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment