Monday, 28 October 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.10.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 28 October 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

गुजरातमधल्या वडोदरा इथं C-295 लष्करी विमानांच्या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या टाटा एअरक्राफ्ट संकुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्या हस्ते झालं. भारत आणि स्पेनमध्ये धोरणात्मक संरक्षण संबंध वाढवणारा टाटा एअरबस प्रकल्प हा मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत लष्करी विमानांसाठीचा भारतातील पहिला खाजगी क्षेत्रातला एरोस्पेस प्रकल्प आहे. या केंद्रात टाटा व्यतिरिक्त, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड या आस्थापना आणि खाजगी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचं देखील योगदान असेल. C-295 विमानांच्या प्रकल्पाअंतर्गत ५६ विमानं तयार करण्यात येणार असून, त्यापैकी १६ विमानं एअरबसच्या माध्यमातून थेट स्पेनमधून दिली जाणार आहेत. उर्वरित ४० विमानांची निर्मिती भारतात होणार आहे.

या प्रकल्पामुळे भारत आणि स्पेन यांच्यातल्या भागीदारीला नवी दिशा देत असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. C-295 वाहतूक विमानाच्या निर्मितीचा हा कारखाना भारत आणि स्पेनमधले संबंध मजबूत करण्यासोबतच, मेक इन इंडिया, मेड फॉर द वर्ल्ड या मिशनला बळकट करणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.

एअरबस आणि टाटा यांच्यातली ही भागीदारी भारतीय एरोस्पेस उद्योगाच्या प्रगतीला हातभार लावेल, असा विश्वास पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी यावेळी व्यक्त केला. भारताला एक औद्योगिक पॉवर हाऊस आणि गुंतवणूक आणि व्यापाराचं आकर्षण बनवण्याची पंतप्रधान मोदींची ही दूरदृष्टी असल्याचं ते म्हणाले.

या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती पेड्रो सांचेझ रोड शो मध्ये सहभागी झाले होते. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन त्यांचं वडोदरा मध्ये स्वागत करण्यात आलं.

दरम्यान, गुजरातमधल्या अमरेली इथं भुज-नलिया रेल्वेमार्गाच्या कामाचं राष्ट्रार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सुमारे एक हजार १०० कोटी रुपये खर्चून करण्यात आलेल्या या मार्गाची लांबी १०१ किलोमीटर आहे. या प्रकल्पामुळे गुजरातमधल्या कच्छ भागात स्वस्त वाहतूक आणि आर्थिक चलनवलन वाढण्यास मदत होणार असल्याचं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितलं. या विस्तृत प्रकल्पात २४ मोठे पूल, २५४ छोटे पूल, ३ उड्डाणपूल आणि ३० भूमिगत पूल बांधण्यात आले आहेत.

****

एन डी एम ए अर्थात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा २० वा स्थापना दिन आज साजरा होत आहे. वर्तनात्मक बदलांच्या जागरूकतेद्वारे आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी समुदायांचं सक्षमीकरण, ही यंदाची संकल्पना आहे. नवी दिल्ली इथं होणार्या स्थापना दिनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.

****

जम्मू-काश्मीरमध्ये अखनूर सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर आज गोळीबार केला. सुरक्षा दल सध्या जम्मू जिल्ह्यातल्या अखनूर सेक्टरमध्ये बत्तल भागात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवत आहे, खौरच्या बट्टल भागात सशस्त्र दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तसंच लष्कराच्या जवानांनी आजूबाजूच्या परिसराला वेढा घातला असल्याचं आमच्या प्रतिनिधीने कळवलं आहे. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी शोधून काढण्यासाठी मोहीम राबवली जात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्य विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. आज अनेक पक्षांचे दिग्गज नेते अर्ज दाखल करत आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्यातल्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरत आहेत. तत्पूर्वी निघालेल्या रॅलीत भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. तसंच ठाणे मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर यांनी अर्ज दाखल केला. कागल मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ हे देखील आज अर्ज भरणार आहेत.

बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अर्ज दाखल केला. याच मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी देखील आज उमेदवारी अर्ज भरला.

मुंबईतल्या माहिम मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अमित ठाकरे यांनी आज अर्ज दाखल केला. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी उपस्थित होते. वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई यांनी आज अर्ज दाखल केला.

****

काँग्रेससह वंचित बहुजन आघाडीने औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून दिलेला उमेदवार बदलला आहे. या मतदार संघात काँग्रेसकडून मधुकर देशमुख यांच्याऐवजी आता लहू शेवाळे निवडणूक लढवणार आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून आता विकास दांडगे ऐवजी अफसर खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

****

सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते.

****

आनंद आणि उत्साहाचं पर्व असलेल्या दीपोत्सवाला आज वसुबारसेच्या पूजनाने प्रारंभ झाला. सवत्स धेनु अर्थात गाय आणि वासराची पूजा करून दिवाळीला घरोघरी सुरुवात झाली.

****

No comments: