Tuesday, 29 October 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 29.10.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 29 October 2024

Time: 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २९ ऑक्टोबर २०२ सकाळी.०० वाजता.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज धन्वंतरी दिन आणि नवव्या आयुर्वेद दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आरोग्याशी संबंधित जवळपास १२ हजार ८५० कोटी रुपयांच्या योजनांचा प्रारंभ करणार आहेत. ७० वर्षं आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान पंतप्रधान भारत जन आरोग्य योजनेत सामावून घेण्याच्या योजनेचीही ते आज सुरुवात करणार आहेत.

देशातल्या पहिल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या दुसऱ्या टप्प्याचंही ते उद्घाटन करणार आहेत. या टप्प्यात एक पंचकर्म रुग्णालय, एक क्रीडा वैद्यक संस्था, एक केंद्रीय वाचनालय, एक आयटी आणि स्टार्टअप इन्क्यूबेशन सेंटर आणि ५०० खाटांच्या रुग्णालयाचा समावेश आहे.

तसंच आजच्या 9 व्या आयुर्वेद दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच एम्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमातही पंतप्रधान अनेक अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा दूरस्थ पद्धतीनं प्रारंभ करतील. यामध्ये दंतवैद्यक विज्ञान संशोधन आणि रेफरल संस्था, जनौषधी केंद्राचा समावेश आहे.

****

प्रकाश आणि आनंदाचं पर्व असलेल्या दीपोत्सवात धनत्रयोदशीचा सण आज साजरा होत आहे. पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनातून अमृतकलश घेऊन प्रकट झालेले भगवान धन्वंतरी यांचं आज पूजन करण्याचा प्रघात आहे. यमदीपदानही आज केलं जातं. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्यातल्या जनतेला धनत्रयोदशी तसंच दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दीपावलीचा सण सर्वांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि सुख-शांती घेवून येवो,  असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

****

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ३१ ऑक्टोबरला आयोजित केली जाणारी एकता दौड यावर्षी दिवळीमुळे दोन दिवस आधीच म्हणजे आज घेण्यात आली. नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी या एकता दौडला हिरवा झेंडा दाखवुन रवाना केलं. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. एकता दौड ही देशाच्या एकतेसाठीच नाही, तर विकसित भारताचा संकल्प देखील असल्याचं शहा यावेळी म्हणाले. 

****

केरळच्या कासारगोड जिल्ह्यात विरकावु अंजुत्तबलम या मंदिरात आयोजित आतषबाजीच्या कार्यक्रमावेळी झालेल्या भीषण स्फोटात १६० हून अधिक जण जखमी झाले. यापैकी दहा जणांची प्रकृती गंभीर आहे. एका उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात भाविक या मंदीरात आले असता, काल रात्री ही दुर्घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी मंदीर समितीचे अध्यक्ष आणि सविचांना ताब्यात घेतलं आहे.

****

राज्यात येत्या २० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. एकूण २८८ मतदारसंघांसाठी कालपर्यंत तीन हजार ३५९ उमेदवारांचे चार हजार ४२६ अर्ज दाखल झाले आहेत अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे.

****

परभणी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार डॉ राहुल पाटील यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला असला, तरी आज आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करून नामनिर्दशनपत्र दाखल करणार आहेत. पाथरी विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर आज अर्ज दाखल करणार आहेत .

****

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन उमेदवारांची चौथी यादी आज जाहीर केली. मोर्शी मतदारसंघातून देवेंद्र भुयार यांना, तर भोर मतदारसंघातून शंकर मांडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

****

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या टप्प्यात आठ विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

****

रिपब्लिकन पक्षाला शिवसेनेच्या कोट्यातून धारावी आणि भाजपाच्या कोट्यातून कालिना हे दोन मतदार संघ दिल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं आहे. मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत ते काल बोलत होते. महायुतीची सत्त्ता आल्यानंतर त्यांच्या पक्षाला एक विधानपरिषद सदस्यत्व, राज्यात एक कॅबिनेट मंत्री पद तसंच चार महामंडळांची अध्यक्ष पदे आणि महामंडळ संचालक याशिवाय इतर विविध पदं दिली जाणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आश्वासन दिल्याचं आठवले यावेळी म्हणाले. रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी महायुतीला विजयी करण्यासाठी प्रचाराला लागावं, असं आवाहन यांनी यावेळी केलं.

****

बँक घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने नागपूरच्या एका व्यावसायिकाची सुमारे ५०३ कोटी रुपये मूल्याच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. मेसर्स कॉर्पोरेट पॉवर लिमिटेड आणि त्यांच्या प्रवर्तकांच्या स्थावर आणि जंगम मालमत्ता, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि आंध्रप्रदेशातल्या विविध ठिकाणाहून जप्त केल्या आहेत. त्यात बँकेतली रोकड, म्युच्युअल फंड, समभाग, भूखंड आणि कंपनी यांचा समावेश आहे. विविध बँकांना मिळून सुमारे चार हजार सात कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. 

****

भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांची प्रमुख प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...