Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 29 October 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २९ ऑक्टोबर २०२४
सायंकाळी ६.१० वा.
****
· विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत संपली-उद्या छाननी
· आज अखेरच्या दिवशी सर्वच प्रमुख पक्षांच्या दिग्गजांसह अपक्ष उमेदवारांकडून अर्ज
दाखल
· शरियत कौन्सिलला घटस्फोटाचं प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही-मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाचा निकाल
आणि
· निरामय जीवनाचा संदेश देणारा धनत्रयोदशीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा
****
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची
मुदत आज संपली. आज अखरेच्या दिवशी मुदत संपेपर्यंत
अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उद्या या सर्व अर्जांची छाननी होणार असून, चार नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी
मतदारसंघातून, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
नाना पटोले यांनी साकोलीतून अर्ज दाखल केला.
छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी
आज एम आय एम या पक्षाच्या वतीने औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघातून उमेदवारी
अर्ज दाखल केला. यंदा सर्व लक्ष विधासभा निवडणुकीवर केंद्रीत करण्याचा निर्णय पक्षाने
घेतला असल्यानं, नांदेड लोकसभा पोटनिवडणूक
लढवणार नसल्याचं सय्यद इम्तियाज यांनी सांगितलं.
महायुतीचे संजय शिरसाट यांनी औरंगाबाद पश्चिम मतदार संघातून, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड सोयगाव मतदार
संघातून महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे
उमेदवार बाळासाहेब थोरात यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. आघाडीने या आधी उमेदवारी
जाहीर केलेले किशनचंद तणवाणी यांनी काल निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आघाडीने
थोरात यांच्या नावाची घोषणा केली होती
****
अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे हेमंत ओगले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याच मतदारसंघातून विद्यमान आमदार लहू कानडे यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटात प्रवेश करत महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. श्रीरामपूर मतदारसंघातून शिवसेनेचे
माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
****
धुळे शहर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल गोटे
यांनी, धुळ्याचे विद्यमान आमदार
फारुक शाह यांनी एमआयएम पक्षाकडून, तर
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सकल मराठा समाजाच्या वतीने राजेंद्र काळे आणि विनोद
जगताप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले.
****
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या
शेवटच्या दिवशी भाजपने दोन उमेदवारांची घोषणा केली. उमरेड मतदार संघातून सुभाष पारवे यांना तर मीरा भाईंदरमधून नरेंद्र मेहता यांना
उमेदवारी देण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरामध्ये
बंदोबस्त वाढविण्यात आला असून स्थिर आणि फिरत्या पथकांकडून ठिकठिकाणी तपासणी सुरू
आहे. तपासणी प्रक्रियेत प्रत्येकानं सहकार्य करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
श्रोते हो, विधानसभा
निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा
विधानसभा मतदारसंघांचा’ हा
कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत
आहे. या कार्यक्रमात आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा
आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
येत्या २० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान
करण्याचं आवाहन राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालक आर विमला यांनी केलं
आहे.
बाईट – आर.विमला
****
शरियत कौन्सिलला घटस्फोटाचं प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही, असा निकाल मद्रास उच्च न्यायालयानं दिला आहे. एका मुस्लिम जोडप्याने ट्रिपल तलाक संदर्भात मदुराई खंडपीठात
दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान, न्यायमूर्ती जी. आर. स्वामीनाथन यांनी हा निकाल दिल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. शरियत कौन्सिल ही एक खासगी संस्था आहे. या संस्थेला कौटुंबिक तसंच आर्थिक विषय हाताळता येऊ शकतात. परंतु, घटस्फोटाचे
प्रमाणपत्र देणं किंवा दंड ठोठावण्याचा अधिकार या संस्थेला नाही, असं मदुराई खंडपीठाने या निकालात स्पष्ट केलं आहे. हिंदू, ख्रिस्ती, पारसी किंवा ज्यू धर्मीय पतीने पहिला विवाह झालेला असतांना, दुसरा विवाह केला, तर हा प्रकार क्रौर्य ठरून हा घरगुती हिंसाचारात मोडतो, शिवाय द्विभार्या प्रतिबंधक कायदाचं उल्लंघन होतं असल्याने, पत्नीला कलम १२ नुसार भरपाई देण्यास पात्र ठरतो, कायद्याचं हे कलम मुस्लिम धर्मीयांनाही लागू होतं, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.
****
प्रकाश आणि आनंदाचं पर्व असलेल्या दीपोत्सवात धनत्रयोदशीचा सण
आज साजरा होत आहे. पौराणिक
कथेनुसार समुद्रमंथनातून अमृतकलश घेऊन प्रकट झालेले भगवान धन्वंतरी यांचं आज पूजन करण्याचा, धनाची आणि धानाची पूजा करण्याचा, धणे आणि गूळ यांचा नैवेद्य दाखवण्याचा तसंच यमदीपदान करण्याचा प्रघात आहे.
धन्वंतरी दिन आणि नवव्या आयुर्वेद दिनानिमित्त नवी दिल्ली
इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरोग्याशी संबंधित उपक्रमांना प्रारंभ करण्यात
आला.
नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात आज राष्ट्रीय आयुर्वेद
दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय
आयुर्वेद दिनानिमित्त विद्यापीठ प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ भगवान धन्वंतरीचं कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर
आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं.
****
देशांतर्गत सराफा बाजारात आज धनत्रयोदशीच्या दिवशी
सोन्याच्या दरात प्रतितोळा ५०० रुपयांची घट झाली. २४ कॅरेट सोन्याची किंमत आज ८०
हजारांवरून घसरून ७९ हजार ७९० रुपये झाली, तर २२ कॅरेट सोन्याचा दर ७३ हजार १४० रुपये झाला. चांदीचा दर मात्र ९७ हजार
९०० रुपये प्रतिकिलो इतका कायम आहे.
****
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या
जयंतीनिमित्त दरवर्षी ३१ ऑक्टोबरला आयोजित केली जाणारी एकता दौड यावर्षी दिवाळीमुळे दोन दिवस आधीच म्हणजे आज घेण्यात आली. नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी या एकता दौडला
हिरवा झेंडा दाखवला. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासह विविध मान्यवर
यावेळी उपस्थित होते. एकता दौड ही देशाच्या एकतेसाठीच नाही, तर विकसित भारताचा संकल्प देखील असल्याचं शहा यावेळी म्हणाले.
****
नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकादमीचा १२५वा दीक्षांत सोहळा, राज्याचे दहशतवादविरोधी
पथकाचे अपर पोलिस महासंचालक नवल बजाज यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी १०८ पुरुष आणि ३ महिला असे एकूण १११ पोलीस
उपनिरीक्षक पोलीस
पथकात दाखल झाले. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पारंपरिक कौशल्याला
आधुनिकतेची जोड देण्याच्या गरजेकडे बजाज यांनी लक्ष वेधलं.
****
भारत आणि स्पेन यांच्यात विविध क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन
आणि सशक्त भागीदारी आहे, केंद्रीय
मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. मुंबई इथं भारत-स्पेन सीईओ फोरमला ते आज
संबोधित करत होते, यावेळी
स्पेनचे राष्ट्राध्यक्ष एच ई पेद्रो सँचेज उपस्थित होते.
****
विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगानं भारत निवडणूक आयोगानं परभणी
जिल्ह्यात सामान्य निवडणुक निरीक्षक म्हणून जिंतूर आणि परभणी या दोन विधानसभा
मतदारसंघांसाठी के. हरीता यांची तर गंगाखेड आणि पाथरी या मतदारसंघांसाठी संचिता
बिश्नोई यांची नियुक्ती केली आहे. तर
सर्व मतदारसंघांसाठी राजेश दुग्गल यांची निवडणूक पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या सर्वांनी आज जिल्ह्यातल्या सर्व मतदारसंघांतल्या निवडणूक विषयक बाबी आणि कायदा सुव्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.
****
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं दिवाळीच्या सुटीत जास्तीतजास्त पर्यटक पर्यटनासाठी यावेत यासाठी विशेष
सवलती जाहीर केल्या आहेत. महामंडळाचे
प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी ही माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांसाठी २०
टक्के, शासकीय कर्मचाऱ्यांना आगाऊ नोंदणीसाठी दहा ते २० टक्के तर, शालेय सहलींसाठी विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.
****
परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्ह्यासाठी
वर्षातल्या तीन स्थानिक सुट्या
जाहीर केल्या आहेत. येत्या ३१ ऑक्टोबरला दीपावलीची सुटी जाहीर करण्यात आली होती, त्याऐवजी सात डिसेंबर, २०२४ रोजीची चंपाषष्ठीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ३१ ऑक्टोबरला
जिल्ह्यात सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयं नियमितपणे सुरु राहतील, असं जिल्हाधिकारी गावडे यांनी कळवलं आहे. सदर आदेश जिल्ह्यातील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयं, केंद्र
शासनाची कार्यालये आणि बँकांना लागू होणार नाहीत, असं प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवण्यात आलं आहे.
****
दिवाळी आणि छट पुजेमुळे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता
नांदेड-पाटणा-नांदेड विशेष गाडीच्या सहा फेऱ्या केल्या जाणार आहेत. हिंगोली, वाशीम, अकोला मार्गे जाणारी गाडी आज तसंच पाच आणि १२ नोव्हेंबरला मंगळवारी
हजूर साहिब नांदेड इथून दुपारी अडीच वाजता सुटेल तर पाटणा - नांदेड विशेष गाडी ३१ ऑक्टोबर
तसंच सात आणि १४ नोव्हेंबरला गुरुवारी पहाटे अडीच वाजता पाटण्याहून सुटेल.
****
महिला क्रिकेटमध्ये अहमदबाद इथं सुरू असलेल्या भारत आणि न्युझीलंडदरम्यान
तिसऱ्या आणि अंतिम एक दिवसीय क्रिकेट सामन्यात न्युझीलंडचा महिला संघ २३२ धावांवर सर्वबाद
झाला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा
भारतीय महिला संघाच्या सात षटकांत एक बाद २५ धावा झाल्या होत्या.
****
No comments:
Post a Comment