Wednesday, 30 October 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 30.10.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 30 October 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्य विधानसभा निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशन पत्रांची आज छाननी होत आहे. उमेदवारांना चार नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून, त्यानंतर एकूण उमेदवारांचं चित्र स्पष्ट होईल. 

दरम्यान, राज्यभरात २८८ मतदार संघांसाठी एकूण सात हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ अर्ज दाखल झाल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली.

मराठवाड्यातल्या ४६ मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे २०, शिवसेनेचे १६, राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ, तर रासपचा एक उमेदवार आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे १५, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे १६, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे १४ उमेदवार आहेत.

****

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातले उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत देखील काल संपली असून, अर्जांची छाननी आज होत आहे. शुक्रवारी एक नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येईल. या टप्प्यात ३८ मतदारसंघांमधे येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत ६२ अर्ज बाद झाले असून, ४३ मतदारसंघांमधे मिळून ७४३ अर्ज वैध ठरले आहेत. या टप्प्यासाठी उमेदवारी मागं घेण्याची मुदत आज संपणार आहे. या टप्प्यात येत्या १३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

****


श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज जालना आणि बीड जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा ऐकता येईल.

****

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज जागतिक एकता दिनानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात एकतेची शपथ दिली. राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह मंत्रालयातले अधिकारी यावेळी उपस्थित होते. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा ३१ ऑक्टोबर हा जन्मदिवस जागतिक एकता दिन म्हणून साजरा केला जातो.   

****

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल - एनडीआरएफनं, मागच्या वर्षभरात नऊशेहून जास्त बचाव अभियानं यशस्वीपणे राबवून तीन हजारहून जास्त नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी आज नवी दिल्लीत शहीद स्मृती समारंभात हुतात्म्यांना अभिवादन करताना ही माहिती दिली. नागरिकांसाठी एनडीआरएफ तारणहाराचं काम करत असून, नागरिकांचा त्यावर विश्वास बसला आहे, असंही केंद्रीय गृह सचिवांनी यावेळी नमूद केलं.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल परकीय चलन व्यवस्थापनासंदर्भातला एप्रिल ते सप्टेंबर २०२४ या कालावधीचा अर्धवार्षिक अहवाल जारी केला. या अहवालानुसार, १८ ऑक्टोबर २०२४ या दिवशी भारताचा परकीय चलन साठा सहाशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सत्तावीस अब्जे अमेरिकी डॉलर्स इतका आहे. परकीय चलन साठ्याचं व्यवस्थापन पारदर्शी व्हावं, यासाठी रिझर्व्ह बँकेनं २००४ पासून यासंबंधीचा अर्धवार्षिक अहवाल प्रकाशित करण्याला सुरुवात केली होती.

****

विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यभरात सी-व्हिजिल  ॲपवर एकूण एक हजार ६४८ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी एक हजार ६४६ तक्रारी निवडणूक आयोगाने निकाली काढल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ही माहिती दिली.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आज धाराशिव शहरात शालेय विद्यार्थ्यांनी सायकल रॅली काढली. या सायकल रॅलीत बोलका बाहुला हसमुख राय यांनी मतदारांना लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करण्याचं आवाहन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून सुरू झालेल्या या रॅलीत धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांच्यासह मतदार जनजागृती कक्षातले विविध अधिकारी, कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

धुळे ग्रामीण मतदार संघातले महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचाराची आज धुळे तालुक्यातल्या आर्वी गावाजवळच्या रोकडोबा हनुमान मंदिरापासून सुरुवात झाली. धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव तसंच महंत श्री वैष्णवदासजी गुरु महादेवदासजी महाराज यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ वाढवून ही सुरूवात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बीड जिल्ह्यात सध्या रक्ताचा तुटवडा भासत असून, जिल्हा रुग्णालयात रक्तदान करण्यासाठी रक्तदान भवन तयार करण्यात आलं आहे. त्याठिकाणी सेल्फी पॉईंट देखील उभारण्यात आला आहे. जिल्हाभरातल्या नागरीकांनी पुढे येऊन रक्तदान करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

No comments: