Tuesday, 29 October 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 29.10.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 29 October 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २९ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

***

राज्यात येत्या २० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. एकूण २८८ मतदारसंघांसाठी कालपर्यंत तीन हजार ३५९ उमेदवारांचे चार हजार ४२६ अर्ज दाखल झाले आहेत अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. दाखल अर्जांची उद्या छाननी होणार असून, उमेदवारांना येत्या चार तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येतील.

****

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या टप्प्यात आठ विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

****

भारतीय जनता पक्षाने दोन उमेदवारांची चौथी यादी आज जाहीर केली. उमरेडमधून सुधीर पारवे, तर मीरा भाईंदर मधून नरेंद्र मेहता यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारांची पाचवी यादी आज जाहीर केली. माढा मतदारसंघातून अभिजित पाटील, मुलुंड - संगीता वाजे, मोर्शी - गिरीष कराळे, पंढरपूर - अनिल सावंत, तर मोहोळ मतदारसंघातून राजु खरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

दरम्यान, ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार इस्माईल मोहम्मद युसुफ रंगरेज यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

****


प्रकाश आणि आनंदाचं पर्व असलेल्या दीपोत्सवात धनत्रयोदशीचा सण आज साजरा होत आहे. पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनातून अमृतकलश घेऊन प्रकट झालेले भगवान धन्वंतरी यांचं आज पूजन करण्याचा प्रघात आहे. यमदीपदानही आज केलं जातं. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्यातल्या जनतेला धनत्रयोदशी तसंच दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दीपावलीचा सण सर्वांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि सुख-शांती घेवून येवो, असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

****

धन्वंतरी दिन आणि नवव्या आयुर्वेद दिनानिमित्त नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरोग्याशी संबंधित जवळपास १२ हजार ८५० कोटी रुपयांच्या योजनांचा प्रारंभ होत आहे. ७० वर्षं आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेत सामावून घेण्याच्या योजनेचीही ते सुरुवात करणार आहेत. याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते आरोग्य सेवा आणखी सुधारण्यासाठी विविध आरोग्य संस्थांचं उद्घाटन आणि पायाभरणीही करण्यात येणार आहे. देशातल्या पहिल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या दुसऱ्या टप्प्याचंही ते उद्घाटन करणार आहेत.

****

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ३१ ऑक्टोबरला आयोजित केली जाणारी एकता दौड यावर्षी दिवळीमुळे दोन दिवस आधीच म्हणजे आज घेण्यात आली. नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी या एकता दौडला हिरवा झेंडा दाखवला. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. एकता दौड ही देशाच्या एकतेसाठीच नाही, तर विकसित भारताचा संकल्प देखील असल्याचं शहा यावेळी म्हणाले. 

****

दुसऱ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून, अवैधरित्या पैशांचं हस्तांतरण करणाऱ्या प्रणालींविरुद्ध भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर संघटित सायबर गुन्हेगार, हवाला व्यवहार आणि तत्सम अवैध आर्थिक व्यवहारांसाठी अशा बँक खात्यांचा वापर करतात. गुजरात आणि आंध्र प्रदेश पोलिसांनी अलीकडेच टाकलेल्या छाप्यांमध्ये असे गुन्हे उघड झाले आहेत, असं गृह मंत्रालयाने म्हंटलं आहे.

****

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळनं दिवाळीच्या सुटीत जास्तीतजास्त पर्यटक पर्यटनासाठी यावेत यासाठी विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी ही माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांसाठी २० टक्के, शासकीय कर्मचार्‍यांना आगाऊ नोंदणीसाठी दहा ते २० टक्के तर, शालेय सहलींसाठी विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.

****

परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्ह्यासाठी वर्षातल्या तीन स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत. येत्या ३१ ऑक्टोबरला दिपावलीची सुटी जाहीर करण्यात आली होती, त्याऐवजी सात डिसेंबर, २०२४ रोजीची चंपाषष्टीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ३१ ऑक्टोबरला जिल्ह्यात  सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयं नियमितपणे सुरु राहतील,  असे जिल्हाधिकारी गावडे यांनी कळवलं आहे.

****

दिवाळी आणि छट पुजेमुळे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता नांदेड-पटना-नांदेड विशेष गाडीच्या सहा फेऱ्या पूर्ण केल्या जाणार आहेत. हिंगोली, वाशीम, अकोला मार्गे जाणारी गाडी आज, तसंच पाच आणि १२ नोव्हेंबरला मंगळवारी हजूर साहिब नांदेड इथून दुपारी अडीच वाजता सुटेल तर पटना - नांदेड विशेष गाडी ३१  ऑक्टोंबर, सात आणि १४ नोव्हेंबरला गुरुवारी पहाटे अडीच वाजता पटना इथून सुटेल, या गाडीत सामान्य, शयनयान आणि वातानुकुलीत मिळून २२ डबे असतील असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.

****

No comments: