Thursday, 31 October 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.10.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 31 October 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१० वा.

****

·      आगामी २५ वर्षांत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय एकता अतिशय महत्त्वाची असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन-सरदार पटेल यांच्या शतकोत्तर सुवर्णजयंती वर्षाला प्रारंभ.

·      विधानसभा निवडणुकीत बंडखोरांना विश्वासात घेण्यासाठी महायुतीच्या तीनही प्रमुख पक्षांकडून प्रयत्न सुरू.

·      दिवाळीनिमित्त स्नेहमिलन कार्यक्रमांसह सांगितिक कार्यक्रमांची सर्वत्र रेलचेल.

आणि

·      डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नॅकचं 'ए-प्लस' मानांकन जाहीर.

****

आगामी २५ वर्षांत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय एकता अतिशय महत्त्वाची असून फुटीरतावादी शक्तीपासून सावध राहण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने गुजरातमधल्या केवडिया इथं राष्ट्रीय एकता दिवसाच्या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. सरदार पटेल यांचं दीडशेवं जयंती वर्ष आजपासून सुरु झालं असून, पुढचे दोन वर्ष देश हा जयंती उत्सव साजरा करेल, असं पंतप्रधानांनी सांगितलं.

तत्पूर्वी त्यांनी एकतानगर इथं असलेल्या पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला पुष्पांजली अर्पण करुन नागरीकांना एकतेची शपथ दिली.

आज आपण एकता दिवस आणि दिवाळी दोन्ही एकत्र साजरे करत असून, यामुळे भारत जगाशी जोडला जात असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसंच कच्छ इथं सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.

दरम्यान, या एकता दिनाच्या कार्यक्रमात रायगड जिल्ह्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती साकारण्यात आली होती. रायगडाची भूमी सामाजिक न्याय, देशभक्ती आणि राष्ट्र प्रथम या संस्कारांची भूमी असल्याचं सांगून, या कार्यक्रमात रायगडाला मानाचं स्थान दिल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पटेल चौक इथं सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं.

****

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नवी दिल्लीत इंदिरा गांधी यांच्या शक्ती स्थळ या समाधीस्थळावर अभिवादन केलं.

****

मुंबईत मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी राष्ट्रीय एकता दिवस आणि राष्ट्रीय संकल्प दिवसानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद इथं ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता आर. व्ही. पातारे यांनी इंदिरा गांधी तसंच सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.

छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार मनोज बारवाल यांनी इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आणि उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

****

नाशिक इथल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. तसंच विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यावेळी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेतली.

****

मध्य रेल्वेतर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त २८ ऑक्टोबरपासून ते ३ नोव्हेंबरपर्यंत दक्षता जागरूकता सप्ताह पाळण्यात येत आहे. "राष्ट्राच्या समृद्धीसाठी अखंडतेची संस्कृती" ही या सप्ताहाची संकल्पना आहे. या सप्ताहात चर्चासत्र, “मस्त कलंदर” हा लघुपट, ‘सुबोध’ या विशेष वृत्त बुलेटिनचे अनावरण, तसंच वादविवाद, निबंध, रेखाचित्रे, घोषवाक्य, स्किट्स आणि लघुपट यासारख्या स्पर्धा घेण्यात आल्या.

****

विविध राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशात कार्यरत असलेले केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, आणि केंद्रीय पोलीस संघटनांच्या ४६३ कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकं आज प्रदान करण्यात आली. तपास, विशेष मोहीम, फॉरेन्सिक सायन्स या क्षेत्रात सर्वोत्तम कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार दिले जातात.

****

महायुतीचे तिन्ही पक्षांकडून बंडखोरांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून अर्ज परत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते रवी राजा यांनी आज भाजपात प्रवेश केला, तेव्हा फडणवीस बोलत होते. रवी राजा हे शीव कोळीवाडा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, मात्र त्यांना डावलण्यात आल्यामुळे त्यांनी पक्ष सोडल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर भाजपाचे मुंबई उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

****

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून आज सकाळी पुण्यात एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आंबेडकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होईपर्यंत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ताई ठाकूर या पक्षाच्या प्रचाराचे नेतृत्व करणार असल्याचं पक्षाच्या वतीनं कळवण्यात आलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २७ हजार ९६४ दिव्यांग मतदार असून, ८५ वर्षां पेक्षा अधिक वय असलेले ४० हजार ५७७ मतदार आहेत. या मतदारांना फॉर्म १२ ड भरुन गृह मतदानाचा पर्याय निवडायाचा असतो, यापैकी ७१५ दिव्यांग तसंच तीन हजार ५३७ वयोवृद्ध मतदारांनी गृह मतदानाचा पर्याय दिला आहे. जिल्ह्यात दोन हजार ५०८ सर्व्हिस मतदार आहेत, त्यांना टपाली मतदानाची सुविधा दिली जाते.

****

येत्या २० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन महसूल आणि वनविभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी केलं आहे.

बाईट – राजेश कुमार

****

श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.

****

दिवाळीनिमित्त स्नेहमिलन कार्यक्रमांसह दिवाळी पहाट आणि दीपावली संध्या सारख्या सांगितिक कार्यक्रमांची सर्वत्र रेलचेल आहे. सर्वसामान्य रसिकांचा या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आज शास्त्रीनगर गृहनिर्माण संस्थेच्यावतीनं दिवाळी पहाट हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रसिद्ध गायिका आशा खाडीलकर आणि वेदश्री खाडीलकर ओक यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला. आशा खाडीलकर यांना ऐकण्यासाठी रसिक श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती.

महात्मा गांधी मिशन आणि मराठवाडा आर्ट, कल्चर अ‍ॅण्ड फिल्म फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आजही अभ्युदय दीपोत्सव कार्यक्रम घेण्यात आला

नांदेड इथं आज बंदाघाटावर दिवाळी पहाट कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे उपस्थित होते. लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी यावेळी केलं. सर्व उपस्थितांनी यावेळी मतदानाची शपथ घेतली.

****

बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या नाशिकच्या भगवान त्र्यंबकराजाची ऑनलाइन दर्शन सेवा दोन नोव्हेंबरला दिवाळी पाडव्यापासून सुरू होत आहे. रोज दिवसभरासाठी चार हजार भाविकांना याचा लाभ घेता येणार आहे. यात दोन हजार भाविक हे कुठल्याही ठिकाणाहून दूरध्वनीद्वारे नोंदणी करू शकतात, आणि दोन हजार भाविक प्रत्यक्ष श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर शहरातून नोंदणी करू शकतात.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला राष्ट्रीय अधिस्वीकृती आणि अधिमान्यता परिषद-नॅकच्यावतीनं आज तीन पूर्णांक अडतीस 'सीजीपीए' सह 'ए-प्लस' मानांकन जाहीर करण्यात आलं आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी मराठवाड्यात बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुले करून देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन विद्यापीठ पुढे जात असून, आगामी काळात देखील सर्वांना सोबत घेऊन विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा आणि नावलौकिक उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

****

मुंबई विद्यापीठातर्फे पी.एच.डी. प्रवेश पूर्व परीक्षा १७ नोव्हेंबर २०२४ ला विविध केंद्रावर घेतली जाणार आहे. चारही विद्याशाखेतल्या विविध ७६ विषयांसाठी ही परीक्षा ऑनलाइन सेंटर बेस्ड सीबीटी पद्धतीनं घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

****

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना उद्यापासून मुंबई इथल्या वानखेडे स्टेडीयमवर खेळवला जाणार आहे. न्यूझीलंडने या मालिकेत दोन सामने जिंकत दोन-शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.

****

No comments: