Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 30 October
2024
Time: 7.10
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· विधानसभा निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशन पत्रांची आज
छाननी-चार नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार
· राज्यभरात २८८ मतदार संघांसाठी सात हजार ९९५ उमेदवारांचे
१० हजार ९०५ अर्ज दाखल
· प्रसिद्ध साहित्यिक डॉ वीणा देव यांचं निधन-पुण्यात
काल अंत्यसंस्कार
· शरियत कौन्सिलला घटस्फोटाचं प्रमाणपत्र देण्याचा अधिकार
नाही-मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाचा निकाल
· निरामय जीवनाचा संदेश देणारा धनत्रयोदशीचा सण सर्वत्र
उत्साहात साजरा
आणि
· तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचा पराभव
करत भारतीय महिला संघाचा मालिका विजय
सविस्तर बातम्या
राज्य
विधानसभा निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशन पत्रांची आज छाननी होणार आहे. उमेदवारांना
चार नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
दरम्यान, काल अर्ज दाखल करण्याच्या
अखरेच्या दिवशी अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. राज्यभरात २८८ मतदार
संघांसाठी एकूण सात हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ अर्ज दाखल झाल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं
दिली.
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात काल ३६८ अर्ज दाखल झाले. माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी
औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यंदा सर्व लक्ष विधानसभा
निवडणुकीवर केंद्रीत करण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्यानं, एमआयएम पक्षाने नांदेड लोकसभा
पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचं सय्यद इम्तियाज यांनी सांगितलं.
महायुतीचे
संजय शिरसाट यांनी औरंगाबाद पश्चिम मतदार संघातून, महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद
मध्य मतदार संघातून तर महायुतीचे अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड सोयगाव मतदार संघातून
काल उमेदवारी अर्ज दाखल केला. औरंगाबाद पूर्वमधून महाविकास आघाडीचे पांडुरंग तांगडे, पैठणहून महायुतीचे विलास
भुमरे, तर
कन्नडहून महायुतीच्या संजना जाधव यांनी अर्ज दाखल केला. कन्नड मतदार संघातून माजी आमदार
हर्षवर्धन जाधव यांनीही अपक्ष म्हणून निवडणूक अर्ज दाखल केला आहे.
**
धाराशिव
जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघात काल १३० उमेदवारांनी १७९ अर्ज भरले. जिल्ह्यात
आतापर्यंत १८५ उमेदवारांचे २७१ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत.
**
लातूर
जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघात काल १२५ उमेदवारांनी १७३ नामनिर्देशन पत्रं
दाखल केले, तर
जिल्ह्यात आतापर्यंत २१३ उमेदवारांनी ३०१ अर्ज भरले आहेत.
**
नांदेड
लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काल २७ उमेदवारांनी ३४ अर्ज दाखल केले. आतापर्यंत ४१ जणांचे
५६ अर्ज दाखल झाले आहेत. तर जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदार संघात काल ३८८ अर्ज दाखल झाले.
आतापर्यंत ५१५ उमेदवारांनी एकूण ६६७ अर्ज भरले आहेत.
**
जालना
जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदारसंघात काल १४९ उमेदवारांनी २०८ अर्ज दाखल केले असून, आतापर्यंत एकूण २५८ उमेदवारांचे
३८२ अर्ज दाखल झाले आहेत.
बीड
जिल्ह्यातल्या सहा मतदारसंघात आतापर्यंत ४०९ उमेदवारांनी ५६६ अर्ज दाखल केले, परभणी जिल्ह्यात १८९ उमेदवारांनी
२४४ अर्ज भरले आहेत तर हिंगोली जिल्ह्यातल्या तिन्ही विधानसभा मतदार संघात काल १२४
नामनिर्देशनपत्रं दाखल झाली आहेत.
**
अहिल्यानगर
जिल्ह्यात संगमनेर मतदारसंघातून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, श्रीरामपूर मतदारसंघातून
काँग्रेसचे हेमंत ओगले यांनी अर्ज दाखल केला. याच मतदारसंघातून विद्यमान आमदार लहू
कानडे यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात
प्रवेश करत महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
श्रोते
हो, विधानसभा
निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी
सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज जालना आणि
बीड जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा ऐकता येईल.
****
येत्या
२० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन राज्य प्राथमिक
शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालक आर विमला यांनी केलं आहे.
Byte…
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून
देत आहोत
****
प्रसिद्ध
साहित्यिक डॉ वीणा देव यांचं काल पुण्यात निधन झालं, त्या ७५ वर्षांच्या होत्या. मान्यवरांच्या मुलाखती
आणि इतर कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या आकाशवाणीशी जोडलेल्या होत्या. त्यांच्या कार्याचा
संक्षिप्त आढावा घेणारा हा वृत्तांत..
हाडाच्या शिक्षक असलेल्या
वीणा देव यांनी, पुण्यात शाहू मंदिर महाविद्यालयात ३२ वर्ष अध्यापन
केलं. विविध पुस्तकांचं संपादन करणाऱ्या वीणा देव यांची, स्वान्सीतील दिवस, परतोनी पाहे, आठवणींचा झिम्मा, अशी अनेक पुस्तकं प्रसिद्ध
आहेत, आपले पिता गो नि दांडेकर यांच्यावर लिहिलेल्या आशक मस्त फकीर या व्यक्तिचित्राला
राज्य शासनातर्फे उत्कृष्ट ललित साहित्य निर्मितीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.
आपल्या मृण्मयी प्रकाशनाद्वारे त्यांनी गोनिदांच्या दुर्मीळ साहित्यकृती प्रकाशित केलेल्या
आहेत, शिवाय, गोनिदांच्या स्मरणार्थ मृण्मयी पुरस्कार, दुर्ग साहित्य संमेलन, आणि छायाचित्र प्रदर्शनही
त्या भरवत असत. गोनिदांच्या विविध कादंबऱ्यांच्या अभिवाचनाचे वीणा देव यांनी आपल्या
कुटुंबीयांच्या साथीने शेकडो कार्यक्रम केले आहेत.
वीणा
देव यांच्या पार्थिव देहावर काल रात्री पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या
निधनाबद्दल समाजातल्या सर्वच क्षेत्रातून दु:ख व्यक्त होत आहे.
****
शरियत
कौन्सिलला घटस्फोटाचं प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही, असा निकाल मद्रास उच्च न्यायालयानं दिला आहे. एका
मुस्लिम जोडप्याने ट्रिपल तलाक संदर्भात मदुराई खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी
दरम्यान, न्यायमूर्ती
जी.आर. स्वामीनाथन यांनी हा निकाल दिल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. शरियत कौन्सिल
ही एक खासगी संस्था आहे. या संस्थेला कौटुंबिक तसंच आर्थिक विषय हाताळता येऊ शकतात.
परंतू, घटस्फोटाचं
प्रमाणपत्र देणं किंवा दंड ठोठावण्याचा अधिकार या संस्थेला नाही, असं मदुराई खंडपीठाने या
निकालात स्पष्ट केलं आहे.
****
प्रकाश
आणि आनंदाचं पर्व असलेल्या दीपोत्सवात धनत्रयोदशीचा सण काल साजरा झाला. सायंकाळच्या
सुमारास घरोघरी भगवान धन्वंतरी यांचं पूजन करण्यात आलं. धन्वंतरी दिन आणि नवव्या आयुर्वेद
दिनानिमित्त नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरोग्याशी संबंधित
उपक्रमांना काल प्रारंभ करण्यात आला. नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात काल राष्ट्रीय
आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला. कुलगुरु लेफ्टनन्ट
जनरल माधुरी कानिटकर आणि मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आलं.
****
महिला
क्रिकेटमध्ये, न्यूझीलंडविरुद्धच्या
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने सहा खेळाडू राखून विजय मिळवत, तीन सामन्यांची मालिका दोन
- एकनं जिंकली आहे. काल अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने प्रथम
फलंदाजी करत २३२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय महिलांनी स्मृती मंधानाच्या
शतकी खेळीच्या बळावर ४५ व्या षटकात चार खेळाडू गमावत हे लक्ष्य साध्य केलं. स्मृती
मंधानाला प्लेयर ऑफ द मॅच, तर दीप्ती शर्माला प्लेयर ऑफ द सिरीज पुरस्कार देऊन गौरवण्यात
आलं.
****
महाराष्ट्र
पोलीस अकादमीचा १२५ वा दीक्षांत सोहळा, राज्याचे दहशतवादविरोधी पथकाचे अपर पोलिस महासंचालक नवल
बजाज यांच्या उपस्थितीत काल नाशिक इथं पार पडला.यावेळी १०८ पुरुष आणि ३ महिला असे एकूण
१११ पोलीस उपनिरीक्षक पोलीस सेवेत दाखल झाले.
****
परभणी
जिल्ह्यात सामान्य निवडणूक निरीक्षक म्हणून जिंतूर आणि परभणी या दोन विधानसभा मतदारसंघांसाठी
के. हरीता यांची तर गंगाखेड आणि पाथरी या मतदारसंघांसाठी संचिता बिश्नोई यांची नियुक्ती
केली आहे. तर सर्व मतदारसंघांसाठी राजेश दुग्गल यांची निवडणूक पोलिस निरीक्षक म्हणून
नियुक्ती केली आहे.
****
बीड
जिल्ह्यात आष्टी, केज आणि परळी विधानसभा निवडणुकीचे खर्च निरीक्षक म्हणून
के. रोहन राज यांची, तर गेवराई, माजलगाव आणि बीड विधानसभा निवडणुकीचे खर्च निरीक्षक
म्हणून कपील जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
नांदेड
जिल्ह्यात निवडणूक विभागाच्यावतीने सर्व उमेदवारांचे अभिलेखे व्यवस्थित ठेवण्याच्या
सूचना खर्च निरीक्षक ए. गोविंदराज यांनी दिल्या आहेत. देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात
उमेदवारांच्या खर्चाबाबतच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते.
****
बीड
जिल्ह्यात काल अवैध वाहतुक होणाऱ्या मद्यासह सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
करण्यात आला. कळंब-अंबाजोगाई मार्गावर महसूल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई
केली.
****
धाराशिव इथंल्या जात प्रमाणपत्रासाठी
१९ हजार रुपये लाच घेताना संबंधित कार्यालयातला शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने
काल रंगेहात पकडलं. सागर क्षीरसागर असं त्या सागर क्षीरसागर असं त्याचं नाव आहे.
****
परभणीचे
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी वर्षभरातल्या तीन स्थानिक सुट्यांपैकी, उद्या ३१ ऑक्टोबरची दीपावलीची
सुटी रद्द करून, त्याऐवजी सात डिसेंबर, २०२४ रोजीची चंपाषष्ठीची सुट्टी जाहीर केली आहे.
त्यानुसार ३१ ऑक्टोबरला जिल्ह्यात सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयं नियमितपणे सुरु
राहतील, असं
कळवण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment