Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 31 October
2024
Time: 7.10
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३१ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· विधानसभा निवडणुकीत राज्यभरात सात हजार ५० उमेदवारांचे
अर्ज छाननीअंती वैध
· महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढती नाहीत-काँग्रेस प्रभारी
रमेश चेन्निथला यांचा खुलासा
· महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे महायुतीसोबत
जाण्याचे संकेत
· केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांच्या
महागाई भत्त्यात तीन टक्के अतिरिक्त वाढ
· नरक चतुर्दशीचा सोहळा घरोघरी अभ्यंगस्नानानं साजरा-सर्वत्र
सांगितिक कार्यक्रमांची रेलचेल
आणि
·
येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये
नियोजित बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
सविस्तर बातम्या
विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशन
पत्र छाननीची प्रक्रिया काल पार पडली. राज्यात २८८ पैकी २८७ मतदारसंघातल्या एकूण सात
हजार ९६७ उमेदवारांपैकी, सात हजार ५० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर ९१७ उमेदवारांचे
अर्ज अवैध ठरले आहेत. नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातल्या एका उमेदवाराच्या अर्जाची
छाननी आजपर्यंत पुढे ढकलण्यात आली असल्याचं, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने
कळवलं आहे. येत्या चार नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
****
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यात सर्व नऊ विधानसभा मतदार संघ मिळून ४३७ उमेदवारांनी ६१३ अर्ज दाखल केले होते.
यापैकी ३९८ उमेदवारांचे ५२२ अर्ज वैध ठरले आहेत.
जालना जिल्ह्यात २९१ अर्ज वैध
ठरले, तर ९१ अर्ज बाद झाले. बीड जिल्ह्यातल्या सहा मतदारसंघातून ३७७ उमेदवारांचे ५०६
अर्ज वैध ठरले, तर ३३ उमेदवारांचे ६१ अर्ज अवैध ठरले आहेत.
परभणी जिल्ह्यात एकूण दाखल
२२४ अर्जांपैकी दीडशे उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर हिंगोली जिल्ह्यात २१ अर्ज बाद
झाले असून, १८७ अर्ज वैध ठरले आहेत.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी
३९ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले, तर दोन उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. जिल्ह्यातल्या
नऊ विधानसभा मतदारसंघासाठी ५५ अर्ज अपात्र ठरले असून, ४६० अर्ज पात्र ठरले आहेत.
लातूर जिल्ह्यातल्या सहा विधानसभा
मतदारसंघात १९३ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले असून, सर्वाधिक
४२ वैध उमेदवार अहमदपूर मध्ये तर सर्वात कमी २२ उमेदवार औसा आणि निलंगा विधानसभा मतदारसंघात
आहेत.
धाराशिव जिल्ह्यातल्या चारही
विधानसभा मतदारसंघात १८५ उमेदवारांनी २७१ अर्ज दाखल केले होते, यापैकी १६४
उमेदवारांचे २२३ अर्ज वैध तर ४८ अर्ज अवैध ठरले आहेत.
****
महाविकास आघाडीत जागा वाटपावरून
कोणताही वाद नसून, ज्या मतदारसंघात मित्रपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत ते दोन दिवसात चर्चा करुन
मागे घेतले जातील, असं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितलं आहे. ते काल
मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. कोणत्याही मतदार संघात मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, असं त्यांनी
सांगितलं. ते म्हणाले...
महाविकास आघाडी मे कोई मतभेद नही है। महाविकास आघाडी एकसाथ
है। हमारे कोई मतभेद नही। नो फ्रेंडली फाईट इन महाविकास आघाडी।
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना
पटोले या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. भाजपाच्या उपाध्यक्ष डॉ. अर्चना पाटील यांनी
यावेळी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
****
विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीसोबत
जाण्याचे संकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिले आहेत. ते
काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. राज्यात तीन महिन्यांपूर्वी वेगळी
परिस्थिती होती, मात्र हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं चित्रही बदललं असल्याचं
मत, राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.
****
विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा
टक्का वाढावा, यासाठी धाराशिव जिल्हा निवडणूक प्रशासनाकडूनही विविध उपक्रम राबवले जात आहेत.
या अंतर्गत काल शालेय विद्यार्थ्यांनी शहरातून सायकल फेरी काढून नागरिकांना मतदानाचं
आवाहन केलं.
****
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य
कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते काल विविध विभागप्रमुखांच्या वाहनांवर
मतदान करण्याबाबत आवाहन असलेली स्टिकर्स लावण्यात आली.
****
दरम्यान, निवडणूक
काळात चोख बंदोबस्त ठेवण्याच्या दृष्टीनं नांदेड जिल्हा पोलीस दलासाठी ३९ नवीन वाहनं
खरेदी करण्यात आली आहेत. यापैकी २२ वाहनांना काल विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप
आणि पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं.
****
निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांवर
प्रभाव टाकण्यासाठी पैशांचा वापर होण्याची शक्यता असणाऱ्या संभाव्य ठिकाणी करडी नजर
ठेवण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप
स्वामी यांनी दिले आहेत. काल जिल्हाधिकारी कार्यालयात खर्च निरीक्षकांच्या बैठकीत ते
बोलत होते.
या निवडणुकीत मतदान प्रक्रिया
निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात व्हावी, यासाठी निवडणूक यंत्रणेच्या प्रयत्नांना सर्व मतदार, राजकीय पक्ष, उमेदवार
आणि प्रसार माध्यमं या सगळ्यांनी सहकार्य करावं, असं आवाहन दिलीप स्वामी यांनी
केलं आहे.
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतांना माझी सर्व नागरिकांन
विनंती असणार आहे की दिवाळी साजरी करा. त्याचबरोबर लोकशाहीचा महोत्सव साजरा करा. कुणाच्याही
भावना दुखावणार नाहीत, कुणालाही अडचण होणार नाही, कोणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी
प्रत्येकानी घ्यावी. जिल्ह्यातील सर्व नागरिक, राजकीय पक्ष, पदाधिकारी सुजाण नागरिक
आहेत. ते निश्चितपणे निवडणूक विभागाला सहकार्य करतील. आणि आपल्या जिल्ह्यातील विधानसभा
निवडणूक ही शांततेत पार पाडतील असा मला विश्वास आहे.
****
श्रोते हो, विधानसभा
निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी
सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज लातूर आणि
धाराशिव जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा ऐकता येईल.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
केंद्र सरकारी कर्मचारी आणि
निवृत्ती वेतन धारकांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के अतिरिक्त वाढ करण्यात आली आहे.
कार्मिक आणि पेंशन मंत्रालयानं काल याबाबतची अधिसूचना जारी केली. यावर्षीच्या एक जुलैपासून
वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. यामुळे महागाई भत्ता मूळ वेतन किंवा निवृत्तीवेतनाच्या
५३ टक्के इतका झाला आहे.
****
दीपावली सणात मानाचं स्थान
असलेला नरक चतुर्दशीचा अभ्यंगस्नान सोहळा आज पहाटे घरोघरी साजरा झाला. आजच्या दिवशी
सूर्योदयापूर्वी सुवासिक तेल आणि उटण्याने शरीराचं मर्दन अर्थात मालिश करून ऊन पाण्याने
स्नान करण्याचा, आणि औक्षण करण्याचा प्रघात आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
यांनी देशवासियांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, दिवाळीनिमित्त
स्नेहमिलन कार्यक्रमांसह दिवाळी पहाट आणि दीपावली संध्या सारख्या सांगितिक कार्यक्रमांची
सर्वत्र रेलचेल आहे. सर्वसामान्य रसिकांचा या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं
दिसून येत आहे.
****
दीपावली पर्वानिमित्त अयोध्येच्या
प्रभू श्रीराम मंदिरात काल भव्य दीपोत्सव साजरा झाला. या मंदिरात श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा
झाल्यानंतरची ही पहिलीच दिवाळी आहे. शरयू नदीचा घाट तब्बल २८ लाख दिव्यांच्या प्रकाशात
उजळून निघाला होता. यावेळी झालेल्या शरयू आरती सोहळ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री
योगी आदित्यनाथ सहभागी झाले होते.
****
हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी
अग्रीम रक्कम भरण्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी ही रक्कम भरण्याची मुदत आज म्हणजे
एकतीस ऑक्टोबरला संपणार होती, मात्र यात्रेकरूंच्या विनंतीवरून आता ही मुदत येत्या
अकरा नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक
आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणार्या
बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ३१ ऑक्टोबर ते १०
नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह, तर १५ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत
विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार असल्याचं, मंडळानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे
कळवलं आहे.
****
तेराव्या झेंग्झू आंतरराष्ट्रीय
शाओलिन वुशू महोत्सवात अहिल्यानगरची खेळाडू नयना खेडकर हिनं भारताचं प्रतिनिधित्व करत, कुंग फू
मध्ये रौप्य पदक पटकावलं आहे. चीनच्या हेनान प्रांतातल्या झेंगझोऊ या शहरामध्ये झालेल्या
या स्पर्धेत छप्पन्न देशातल्या विविध वयोगटातल्या अडीच हजारहून जास्त खेळाडूंनी सहभाग
नोंदवला होता.
****
छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या
१९ वर्षांखालील विभागीय मैदानी स्पर्धांमध्ये अंबाजोगाई इथल्या खोलेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या
दोन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं, यामध्ये भालाफेक स्पर्धेत ओंकार पवार यानं पहिला तर
हातोडा फेक स्पर्धेत कार्तिकी ठवरे हिने दुसरा क्रमांक पटकावला. या दोघांची राज्यस्तरीय
स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
****
मराठवाड्यात काल अपघाताच्या
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जण ठार झाले. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यात पहीला अपघात झाला. निलंगा
इथल्या भाविकांना घेऊन पंढरपूरकडे जाणाऱ्या जीपची काक्रंबा गावानजिक टॅम्पोशी धडक झाली, या अपघाताचं
बचावकार्य सुरू असतांना, लातूरहून येणारी भरधाव कार या वाहनांवर आदळली, या कारमधील
दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर जीपमधल्या जखमी भाविकांना नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी
दाखल करण्यात आलं आहे.
अन्य एका घटनेत, छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यात नदीत बुडून तीन तरुणांचा मृत्यू झाला. हे तिघे
मित्र चिंचोली लिंबाजी इथं पूर्णा नदीत पोहण्यासाठी गेले असता, ही दुर्घटना
घडली.
****
छत्रपती संभाजीनगर शहरालगत
मिटमिटा परिसरात दिव्यांश मिल्क ॲण्ड डेअरी प्रोडक्ट्स या दुकानात पोलिसांनी ७१ हजार
९१० रुपये किमतीचा, ४२५ किलो भेसळयुक्त खवा काल जप्त केला. या खव्याचे नमुने
अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
****
दिवाळी आणि
छटपूजेनिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड-पनवेल-नांदेड
विशेष गाडीची एक फेरी लातूर-पुणे मार्गे चालवण्याचं ठरवलं आहे. ही विशेष गाडी येत्या
सहा नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता नांदेडहून निघेल आणि पनवेल इथं दुसऱ्या दिवशी दुपारी
दोनला पोहचेल
****
No comments:
Post a Comment