Tuesday, 29 October 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक : 29.10.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 29 October 2024

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २९ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      राज्य विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

·      एकनाथ शिंदे, अजित पवार, विश्वजीत कदम आणि वरूण सरदेसाईंसह दिग्गजांचे अर्ज दाखल

·      औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे किशनचंद तनवाणी यांची निवडणुकीतून माघार

·      नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपची डॉ. संतुक हंबर्डे यांना उमेदवारी

·      भ्रष्टाचारमुक्त समाजाला चालना देण्यासाठी देशभरात दक्षता सप्ताहाला कालपासून प्रारंभ

आणि

·      प्रकाशासह आनंदाचं पर्व असलेल्या दीपोत्सवात आज धनत्रयोदशी

सविस्तर बातम्या

राज्य विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. सकाळी ११ ते दुपारी तीन या कालावधीमध्ये अर्ज दाखल करता येत असले तरीही, अर्ज भरणं आणि त्यापूर्वीच्या अन्य पूरक प्रक्रियेसाठी आज सकाळी साडे नऊ वाजेपासून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय सुरू असतील, असं संबंधित विभागाकडून कळवण्यात आलं आहे.

दरम्यान, काल अनेक पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातल्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, तर याच मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला.

कर्जत - जामखेड मतदार संघातून महाविकास आघाडीचे रोहित पवार, शिर्डीतून महाविकास आघाडीच्या प्रभावती घोगरे, तर राहुरीतून महाविकास आघाडीचे प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

सांगली जिल्ह्यात पलूस- कडेगाव मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विश्वजीत कदम यांनी तर जत मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल अर्ज भरला.

मुंबईतल्या माहीम मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अमित ठाकरे यांनी तर वांद्रे पूर्व मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई यांनी अर्ज दाखल केला.

वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड इथं महायुतीतल्या शिवसेना तसंच भारतीय जनता पक्षात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेनं आमदार भावना गवळी यांना उमेदवारी जाहीर केलेली असतांना, भाजपकडून काल माजी मंत्री अनंत देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार बच्चू कडू यांनी अचलपूर-चांदूरबाजार मतदारसंघातून काल सलग सहाव्यांदा अर्ज दाखल केला.

धुळे जिल्ह्यात धुळे ग्रामीण मतदारसंघासाठी कॉंग्रेसचे कुणाल पाटील, धुळे शहर साठी समाजवादी पार्टीचे इर्शाद जहागीदार तर वंचित बहुजन आघाडीचे जितेंद्र शिरसाठ यांनी अर्ज दाखल केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे विद्यमान आमदार नितेश राणे यांनी कणकवलीतून तर कुडाळ मतदार संघातून शिवसेनेचे निलेश राणे यांनी अर्ज दाखल केला.

****

काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार अनिस अहमद यांनी काल वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. अहमद हे नागपूर मध्य विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरी आणि हिंगोली मतदार संघातून काल एकूण ६४ अर्ज दाखल झाले. तर जालना जिल्ह्यातल्या पाचही विधानसभा मतदार संघातून काल ९९ उमेदवारांनी १२२ अर्ज दाखल केले.

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत २२ इच्छुकांनी अर्ज दाखल केले असून, नऊ विधानसभा मतदार संघात २२७ इच्छुकांचे एकूण २७९ अर्ज दाखल झाले आहेत.

लातूर जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघात काल ५१ उमेदवारांनी ७३ अर्ज दाखल केले. तर परभणी जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदार संघात काल ६६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

****

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे, याच मतदार संघातले महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांनी, तर औरंगाबाद पूर्व मतदार संघाततून महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी काल उमेदवारी अर्ज भरले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काल पुढची यादी जाहीर केली, यात औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघातून सुहास दाशरथे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

****

दरम्यान, औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपल्या मतदार संघात २०१४ च्या निकालाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आपण महाविकास आघाडीने दिलेली उमेदवारी परत करत असल्याचं, तनवाणी यांनी जाहीर केलं. पक्षानं त्यांच्या जागी बाळासाहेब थोरात यांना औरंगाबाद मध्य मतदार संघातून उमेदवारी दिली आहे.

****

नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने डॉ. संतुक हंबर्डे यांना उमेदवारी घोषित केली आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

****

भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी २५ उमेदवारांची तिसरी यादी काल जाहीर केली. यामध्ये माळशिरसमधून राम सातपुते, आष्टीतून सुरेश धस, देगलूर जितेश अंतापूरकर तर लातूरमधून माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा अर्चना पाटील- चाकूरकर यांना उमेदवारी मिळाली आहे.

शिवसेनेनं १३ उमेदवारांची तिसरी यादी काल जाहीर केली. घनसावंगी मतदारसंघातून हिकतम उढाण, कन्नड - संजना जाधव, तर धाराशिव मतदारसंघातून अजित पिंगळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

****

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने काल चार मित्र पक्षांसाठी प्रत्येकी एक जागा जाहीर केली. गंगाखेडची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला, कलिना- रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला, बडनेरा-युवा स्वाभिमान पार्टीला, तर शाहुवाडीची जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला जाहीर करण्यात आली आहे.

शिवसेनेनंही दोन जागा मित्रपक्षांना दिल्या असून, यामध्ये हातकणंगले मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाचे अशोकराव माने यांना, तर शिरोळ मतदारसंघातून राजर्षी शाहुविकास आघाडीचे राजेंद्र येड्रावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सात उमेदवारांची चौथी यादी काल जाहीर केली. पक्षाने आतापर्यंत ९२ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.

काँग्रेसनेही काल चार उमेदवारांची यादी जाहीर केली, यात अकोला पश्चिममधून साजिद खान, सोलापूर शहर चेतन नरोटे, तर कोल्हापूर उत्तर मतदार संघातून राजेश लाटकर यांच्याऐवजी मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

****

श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.

****

येत्या २० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल यांनी केलं आहे... 

 

Byte…

****

 

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत

****

भ्रष्टाचारमुक्त समाजाला चालना देण्यासाठी देशभरात दक्षता सप्ताहाला कालपासून प्रारंभ झाला. भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी हा सप्ताह पाळला जातो. राष्ट्राच्या भरभराटीसाठी एकात्मतेची संस्कृती विकसित करणं ही या सप्ताहाची संकल्पना आहे.  या सप्ताहात भ्रष्टाचारविरोधात जागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. विविध मंत्रालयं, विविध सरकारी विभाग, सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या, बँका आणि इतर संस्थामधले सरकारी अधिकाऱ्यांनी काल भ्रष्टाचाराविरोधात शपथ घेतली.

****

प्रकाश आणि आनंदाचं पर्व असलेल्या दीपोत्सवात धनत्रयोदशीचा सण आज साजरा होत आहे. पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनातून अमृतकलश घेऊन प्रकट झालेले भगवान धन्वंतरी यांचं आज पूजन करण्याचा प्रघात आहे. यमदीपदानही आज केलं जातं. दिवाळीच्या उत्सवाला आज आतिषबाजीनं प्रारंभ होतो. या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत आकाशदिवे, रोषणाईच्या माळा, आणि गृहसजावटीच्या साहित्यासह फटाके, फराळाचं साहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

दरम्यान, काल सायंकाळी सवत्स धेनू अर्थात गाय वासराच्या पूजनाने वसुबारसेचा सण साजरा झाला. पोषक अन्नघटक असलेलं दूध देणाऱ्या गायीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

राज्य गौसेवा आयोगाच्या निर्देशानुसार "गाव तिथे गोमाता पूजन- वसुबारस उपक्रमांतर्गत, जालना शहरातल्या पांजरापोळ गोशाळेत विश्वस्त आणि गोसेवकांच्या हस्ते गायींचं पूजन करण्यात आलं. हिवरा रोषणगाव इथल्या श्रीकृष्ण गोशाळेत सरपंच शिला निलखन, किसन बरडे यांनी गाय-वासराची पूजा करून वसुबारस साजरी केली. छत्रपती संभाजीनगर इथंही बीड बायपासवर शारदा गोशाळेत गाय वासरांची पूजा करण्यात आली.

****

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बल्लवाचार्य विष्णु मनोहर यांनी ‘न थांबता २४ तास डोसे बनवणे‘ आणि ‘२४ तासात जास्तीत जास्त डोसे बनवणे‘ हे दोन विश्वविक्रम केले आहेत. परवा सकाळी सात वाजल्यापासून काल सकाळी ९ वाजेपर्यंत त्यांनी १४ हजार १७४ डोसे बनवले. पोलिस आयुक्‍त डॉ. रविंद्र सिंघल यांच्‍या हस्‍ते विष्णू मनोहर यांचा वर्ल्‍ड रेकार्ड्स बुक ऑफ इंडियाचे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्‍यात आला.

****

नांदेड दक्षिण मतदारसंघातल्या नागरिकांसाठी मतदान जनजागृती रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ३१ आक्टोबर रोजी वजीराबाद इथल्या मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये सकाळी अकरा ते एक या वेळेत स्पर्धा होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं, मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांकडून "मतदारा जागा हो" या पथनाट्याचे प्रयोग केले आहेत. 

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...