Thursday, 31 October 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 31.10.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 31 October 2024

Time: 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ३१ ऑक्टोबर २०२ सकाळी.०० वाजता.

****

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आज देशभरात राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी होत आहे. नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पटेल चौक इथं त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं.

गुजरातमध्ये केवाडिया इथं आयोजित राष्ट्रीय एकता दिवसाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. एकतानगर इथं असलेल्या पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला त्यांनी पुष्पांजली अर्पण केली.

आता आपण नव नेशन वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणूक या दिशेनं काम करत आहोत, ज्यामुळे भारताची लोकशाही मजबूत होईल, भारताच्या संसाधनांचा इष्टतम परिणाम मिळेल आणि विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी देशाला नवी गती मिळेल असं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं. एक राष्ट्र एक नागरी संहितेकडे देखील भारत वाटचाल करत असून, जी धर्मनिरपेक्ष नागरी संहिता असल्याचं त्यांनी सांगितलं. सरदार पटेल यांचं दिडशेवं जयंती वर्ष आजपासून सुरु झालं असून, पुढचे दोन वर्ष देश हा जयंती उत्सव साजरा करेल, असं पंतप्रधानांनी सांगितलं.

आज आपण एकता दिवस आणि दिवाळी दोन्ही एकत्र साजरे करत असून, यामुळे भारत जगाशी जोडला जात असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. 

****

देशाच्या आठ प्रमुख क्षेत्रांतल्या उत्पादनात चालू वर्षात गेल्या महिन्यात दोन टक्क्यांची वाढ नोंदवल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयानं प्रसिद्ध केली आहे. या आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर काळात या प्रमुख क्षेत्रांतली वाढ चार पूर्णांक दोन दशांश टक्के इतकी होती. सिमेंट, रिफायनरी उत्पादन, कोळसा, खते आणि स्टील उत्पादनात गेल्या महिन्यात चांगली वाढ झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत सिमेंट क्षेत्रातल्या उत्पादनात सात पूर्णांक एक दशांश टक्के, रिफायनरीत पाच पूर्णांक आठ दशांश टक्के वाढ झाली आहे. कोळसा क्षेत्रात दोन पूर्णांक सहा, खत क्षेत्रात एक पूर्णांक नऊ आणि स्टिल क्षेत्रात गेल्यावर्षीच्या तुलनेत एक पूर्णांक पाच दशांश टक्के वाढ नोंदवली आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी याच महिन्याच्या तुलनेत यावर्षी कच्च्या तेलाच्या उत्पादनात तीन पूर्णांक नऊ दशांश टक्के घट झाली आहे. नैसर्गिक गॅस उत्पादनातही एक पूर्णांक तीन दशांश टक्के आणि वीज क्षेत्रात अर्ध्या टक्क्यानं घट नोंदवण्यात आली आहे.

****

विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशन पत्र छाननीची प्रक्रिया काल पार पडली. राज्यात २८८ पैकी २८७ मतदारसंघातल्या एकूण सात हजार ९६७ उमेदवारांपैकी, सात हजार ५० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर ९१७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातल्या एका उमेदवाराच्या अर्जाची छाननी आजपर्यंत पुढे ढकलण्यात आली असल्याचं, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळवलं आहे. येत्या चार नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.

****

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या ४३ मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली. या टप्प्यासाठी ७४३ उमेदवार रिंगणात आहेत. तर दुसऱ्या टप्प्यातल्या २८ मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी काल पूर्ण झाली. या टप्प्यासाठी ६३४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आता उमेदवारांना एक नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. झारखंड विधानसभेसाठी पहिल्या टप्प्याकरता १३ नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप्प्यासाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

****

राज्यात विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून एकंदर १८७ कोटी ८८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदेशीर पैसे, दारू, अंमली पदार्थ, मौल्यवान धातू इत्यादींचा प्रामुख्यानं समावेश असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. राज्य पोलीस विभागानं सुमारे ७५ कोटी रूपये, प्राप्तिकर विभागानं सुमारे ६० कोटी रूपये, तर राज्य उत्पादन शुल्क विभागानं जप्त केलेल्या, सुमारे ११ कोटी रूपयांचा यामध्ये समावेश आहे. मतदारांना आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या सी-व्हिजील ॲपवर तक्रार करता येते. या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्यानं आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे.

****

पालघर जिल्ह्यालगत दादरा नगर हवेली मधून महाराष्ट्रात येणाऱ्या एका गाडीमधून पोलिसांनी काल चार कोटी २५ लाख रुपये तपासणी नाक्यावर जप्त केले. नाशिक जिल्ह्यात सातपूर पोलिस ठाणे हद्दीतील पिंपळगाव बहुला नाक्यावर एका मोटारीतून २० लाख ५० हजारांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. तसंच उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बिगारी काम करणाऱ्या एका मजुराच्या घरातून ११ लाख रुपये जप्त करण्यात आले. नवी मुंबईतल्या सीवूड्स परिसरात काल एका चार चाकी वाहनातून ८६ लाख ५० हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली.

****

No comments: