Thursday, 31 October 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 31.10.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 31 October 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ३१ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय एकतेच्या भावनेवर भर दिला असून, राष्ट्रीय एकातेचा भंग करू पाहणाऱ्या फुटीरतावादी शक्तींपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आज राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी होत असून, यानिमित्त गुजरातमध्ये केवाडिया इथं आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. पुढच्या २५ वर्षात विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी राष्ट्रीय एकता अत्यंत महत्वपूर्ण असल्याचं त्यांनी नमूद केलं. नागरीकांनी सावध रहावं आणि एकतेच्या भावनेला आत्मसात करा, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं, ते म्हणाले,

 

Byte…

 

वन नेशन वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणूक, एक राष्ट्र एक नागरी संहितेकडे देखील भारत वाटचाल करत असून, जी धर्मनिरपेक्ष नागरी संहिता असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

सरदार पटेल यांचं दिडशेवं जयंती वर्ष आजपासून सुरु झालं असून, पुढचे दोन वर्ष देश हा जयंती उत्सव साजरा करेल, असं पंतप्रधानांनी सांगितलं.

आज आपण एकता दिवस आणि दिवाळी दोन्ही एकत्र साजरे करत असून, यामुळे भारत जगाशी जोडला जात असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. 


तत्पूर्वी त्यांनी एकतानगर इथं असलेल्या पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला पुष्पांजली अर्पण करुन नागरीकांना एकतेची शपथ दिली.

दरम्यान, या एकता दिनाच्या कार्यक्रमात रायगड जिल्ह्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती साकारण्यात आली होती. रायगडाची भूमी सामाजिक न्याय, देशभक्ति आणि राष्ट्र प्रथम या संस्कारांची भूमी असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, ही प्रतिकृती साकारुन रायगडाला मानाचं स्थान दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

****

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नवी दिल्लीत इंदिरा गांधी यांच्या शक्ती स्थळ या समाधीस्थळावर अभिवादन केलं.

****

विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशन पत्र छाननीची प्रक्रिया काल पार पडली. राज्यात २८८ पैकी २८७ मतदारसंघातल्या एकूण सात हजार ९६७ उमेदवारांपैकी, सात हजार ५० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर ९१७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातल्या एका उमेदवाराच्या अर्जाची छाननी आज होत असल्याचं, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळवलं आहे. येत्या चार नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.

****

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत्या सहा नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. येत्या सहा तारखेला सकाळी नागपूर इथं या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत संविधान सन्मान संमेलन आयोजित केलं असून, संध्याकाळी मुंबईत बीकेसीमध्ये महाविकास आघाडीची गॅरंटी जाहीर केली जाणार असल्याची माहिती, पटोले यांनी दिली.

****

विधानसभा निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघांसाठी पोलीस निवडणूक निरीक्षक म्हणून पोलीस उपमहानिरीक्षक प्रमोद कुमार मंडल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी काल औराद शहाजनी इथल्या तपासणी नाक्याची पाहणी केली. दुर्गम भागातल्या काही ठिकाणांना भेटी देऊन कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीचा आढावाही त्यांनी घेतला.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २७ हजार ९६४ दिव्यांग मतदार असून, ८५ वर्षां पेक्षा अधिक वय असलेले ४० हजार ५७७ मतदार आहेत. या मतदारांना फॉर्म १२ ड भरुन गृह मतदानाचा पर्याय निवडायाचा असतो, यापैकी ७१५ दिव्यांग तसंच तीन हजार ५३७ वयोवृद्ध मतदारांनी गृह मतदानाचा पर्याय दिला आहे. जिल्ह्यात दोन हजार ५०८ सर्व्हिस मतदार आहेत, त्यांना टपाली मतदानाची सुविधा दिली जाते.

****

शेतात जागेवर फळबाग नसताना बनावट फळपीक विमा उतरवल्याचं राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यात उघड झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात फळबाग विमा तपासणीचे आदेश पुणे कृषी आयुक्तालयानं दिले आहेत. त्यामध्ये पुणे, सांगली, सोलापूर, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगरसह अन्य जिल्ह्यांचा समावेश आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...