Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 October
2024
Time: 7.10
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या अखेरचा
दिवस-अनेक मतदार संघात प्रमुख पक्षांकडून उमेदवारीची अद्याप प्रतीक्षा
· महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून तर
महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून काही उमेदवारांची घोषणा
· औरंगाबाद पूर्व मतदार संघात काँग्रेसपाठोपाठ वंचित
बहुजन आघाडीकडून उमेदवारीत बदल
· सायबर घोटाळ्यांच्या प्रतिबंधासाठी प्रत्येकानं जागरुक
राहण्याची आवश्यकता पंतप्रधानांकडून व्यक्त
आणि
· दीपोत्सवाला आजपासून प्रारंभ-खरेदीसाठी ग्राहकांच्या
गर्दीने बाजारपेठा फुलल्या
सविस्तर बातम्या
राज्य
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या संपत आहे. महायुती तसंच महाविकास
आघाडीसह अनेक पक्षांनी अद्यापही काही ठिकाणचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत. आतापर्यंत
महायुतीकडून २३५ उमेदवार जाहीर झाले असून, यामध्ये भाजपचे १२१, शिवसेनेचे ६५, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४९ उमेदवारांचा समावेश
आहे. महाविकास आघाडीकडून आतापर्यंत २५९ उमेदवार घोषित झाले असून, यामध्ये काँग्रेसचे ९९, शिवसेना उद्धव बाळासाहेब
ठाकरे पक्षाचे ८४, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ७६ उमेदवारांचा
समावेश आहे.
महायुतीचा
घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने उमेदवारांची तिसरी यादी काल जाहीर केली.
यात बीड जिल्ह्यातल्या गेवराईतून विजयसिंह पंडित, तर अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेर मधून काशिनाथ दाते
यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेनेनं
२० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये हदगाव मतदारसंघातून बाबुराव कदम कोहळीकर, नांदेड दक्षिण - आनंद तिडके
पाटील, परभणी
- आनंद भरोसे, वरळी
- मिलिंद देवरा, कुडाळ - निलेश राणे, तर रिसोड मतदारसंघातून भावना गवळी यांना उमेदवारी
देण्यात आली आहे.
काँग्रेसनं
१४ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. यामध्ये नांदेड उत्तर मधून अब्दुल सत्तार अब्दुल
गफूर, यांना
उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेससह
वंचित बहुजन आघाडीने औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून दिलेला उमेदवार बदलला आहे. आता या
मतदार संघात काँग्रेसकडून मधुकर देशमुख यांच्याऐवजी आता लहू शेवाळे निवडणूक लढवणार
आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून आता विकास दांडगे ऐवजी अफसर खान यांना उमेदवारी देण्यात
आली आहे.
राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये माजलगाव
मतदारसंघातून मोहन जगताप, परळी - राजेसाहेब देशमुख, तर अणुशक्तीनगरमधून फहद अहमद, यांना उमेदवारी देण्यात
आली आहे.
महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेनं ३२ उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली. भोकर मतदारसंघातून - साईप्रसाद
जटालवार, नांदेड
उत्तर - सदाशिव आरसुळे, तर परभणी मतदारसंघातून श्रीनिवास लाहोटी यांना उमेदवारी
देण्यात आली आहे.
****
श्रोते
हो, विधानसभा
निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी
सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज रत्नागिरी
आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
डिजिटल
अरेस्ट सारख्या सायबर घोटाळ्यांना प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक नागरिकानं जागरुक राहण्याची
आवश्यकता, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम
मालिकेतून संवाद साधत होते. सायबर घोटाळ्याविरोधातल्या मोहिमेत सर्व विद्यार्थ्यांना
सहभागी करून घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. समाजातल्या सगळ्यांच्या
प्रयत्नानेच या आव्हानाचा सामना करू शकतो, असं सांगताना, पंतप्रधानांनी या प्रकारापासून सावध राहण्याबाबत
सविस्तर मार्गदर्शन केलं...
Byte…
सुलेखन, लोककला, शास्त्रीय नृत्यकला, संरक्षण, अंतराळ आणि माहिती तंत्रज्ञानाच्या
क्षेत्रात भारताच्या यशस्वी वाटचालीचा त्यांनी आढावा घेतला. फिट इंडिया अभियानाच्या
अनुषंगाने त्यांनी
विविध मुद्यांच्या माध्यमातून व्यायामाचं महत्त्व
विशद केलं.
उद्याच्या
'जागतिक
ॲनिमेशन दिवसाच्या निमित्तानं बोलतांना, पंतप्रधानांनी ॲनिमेशनच्या जगात ‘मेड इन इंडिया’
आणि ‘मेड बाय इंडियन्स’ ह्यांचा प्रभाव असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत, भारताला जागतिक ॲनिमेशन
ऊर्जा केंद्र बनवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन केलं. आपल्या आसपासच्या परिसरातल्या
नवीन शोधाबाबत किंवा स्थानिक स्टार्ट-अपबाबत आत्मनिर्भर इनोव्हेशन ह्या हॅशटॅगसह सामाजिक
संपर्क माध्यमांवर लिहिण्याचं त्यांनी आवाहन केलं.
सरदार
पटेल आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती महोत्सवात सहभागी
होण्याचं तसंच सरदार वन फाईव्ह झिरो तसंच बिरसामुंडा वन फाईव्ह झिरो या हॅशटॅगसह या
दोन्ही राष्ट्रपुरुषांबाबतचे विचार सामाजिक संपर्क माध्यमांवरून सामायिक करण्याचं आवाहन
पंतप्रधानांनी यावेळी केलं.
सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी ३१ ऑक्टोबरला होणारी राष्ट्रीय एकता दौड यंदा दिवाळीमुळे
२९ ऑक्टोबरला होणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं.
सर्व
देशवासियांना दीपावली आणि छट पूजेसह सर्व सणांच्या शुभेच्छा देतांना, vocal for local चा
मंत्र लक्षात ठेवत, या सणांसाठीची खरेदी स्थानिक दुकानदारांकडूनच करण्याचं
आवाहन करत, पंतप्रधानांनी
आपल्या संबोधनाचा समारोप केला.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून
देत आहोत
****
आनंद
आणि उत्साहाचं पर्व असलेल्या दीपोत्सवाला आज वसुबारसेच्या पूजनाने प्रारंभ होत आहे.
सवत्स धेनु अर्थात गाय आणि वासराची पूजा करून दिवाळीला घरोघरी सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर
बाजारपेठेत आकाशदिवे, रोषणाईच्या माळा, आणि गृहसजावटीच्या साहित्यासह फटाके, फराळाचं साहित्य खरेदीसाठी
नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
****
मुंबईत
वांद्रे टर्मिनसवर काल पहाटे प्रचंड गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरी झाली, यात नऊ जण जखमी झाले असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे.
वांद्रे टर्मिनस, इथल्या फलाट क्रमांक एक वर वांद्रे-गोरखपूर या गाडीत बसण्यासाठी
मोठी गर्दी झाल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली. दिवाळीसाठी आपल्या गावी जाणाऱ्या कामगारांचा
या गर्दीत समावेश होता.
दरम्यान, दिवाळीनिमित होणारी अतिरिक्त
गर्दी टाळण्यासाठी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर यासह रेल्वेच्या
काही प्रमुख स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री येत्या आठ नोव्हेंबर पर्यंत बंद
राहणार आहे.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या किनवट इथल्या सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात
काल युवा संसद, पालकांना
संकल्प पत्र आणि मतदार शपथ कार्यक्रम घेण्यात आला. युवा संसद कार्यक्रमात नवमतदारांचं
स्वागत करण्यात आलं.
****
लातूर
जिल्ह्यातल्या निलंगा विधानसभा मतदारसंघातल्या दोन हजार १६५ मतदान अधिकारी आणि कर्मचार्यांचं
प्रथम प्रशिक्षण काल निलंगा इथं पार पडलं. निवडणुकीमध्ये सर्वसाधारण समस्यांच्या अनुभव
कथनातून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं.
****
नांदेड
इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापाठीच्या ज्ञान स्त्रोत केंद्र इमारतीमध्ये
लोकसभा पोटनिवडणूक आणि जिल्ह्यातल्या सहा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. याठिकाणी
लोकसभेसाठी सहा आणि विधानसभेसाठी सहा अशा १२ मतमोजणी केंद्रांची निर्मिती करण्यात आली
आहे. तसंच स्ट्राँग रूमची निर्मिती करण्यात आली आहे. लोहा, हदगाव, किनवट या तीन विधानसभा क्षेत्राची मतमोजणी त्या-त्या ठिकाणी
होणार आहे.
****
बीड
जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासत असून, नागरीकांनी रक्तदान करण्याचं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक
अशोक थोरात यांनी केलं आहे. या रुग्णालयात आपत्कालीन अपघात विभाग, शस्त्रक्रिया विभाग, त्याचबरोबर जिल्हाभरातून
हेमोफिलिया, थैलेसिनियाचे
काही बाल रुग्ण सुद्धा आहेत. त्यांना आठवड्याला किंवा पंधरा दिवसाला रक्त द्यावंच लागतं, त्यामुळे जिल्हा रुग्णालयात
दररोज ४० ते ४५ रक्त पिशव्यांची आवश्यकता असते, असं थोरात यांनी सांगितलं.
****
महिला
क्रिकेटमध्ये, दुसऱ्या
एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून ७६ धावांनी पराभव पत्करावा लागला.
काल झालेल्या सामन्याय न्यूझीलंडच्या महिलांनी प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात ९ बाद
२५९ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलग करताना भारतीय महिला संघ ४८ व्या षटकात १८३ धावांवर
सर्वबाद झाला. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत असून, शेवटचा सामना उद्या अहमदाबाद
इथं होणार आहे.
* ***
बीड
जिल्ह्यातल्या परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे
संभाव्य उमेदवार राजेभाऊ फड यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांचे कार्यकर्ते आक्रमक
झाले होते. पक्षाने या मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
संतप्त कार्यकर्त्यांनी काल फड यांच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेले बॅनर फाडले असल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment