Sunday, 29 December 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २९ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 29 December 2024

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २९ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.

****

माजी पंतप्रधान पद्मविभूषण डॉक्टर मनमोहनसिंग यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार 

मस्साजोग हत्या प्रकरणी बीड इथं सर्वपक्षीय निषेध मोर्चा - घटनेची तातडीनं दखल न घेतल्यास, तीव्र आंदोलनाचा इशारा

दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं येत्या १५ जानेवारीपासून आयोजन-यंदाचा पद्मपाणि पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक सई परांजपे यांना जाहीर  

आणि 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाचा समारोप 

माजी पंतप्रधान पद्मविभूषण डॉक्टर मनमोहनसिंग यांच्या पार्थिव देहावर काल दिल्लीत निगमबोध घाटावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी डॉक्टर सिंग यांचा पार्थिव देह काल सकाळी त्यांच्या निवासस्थानाहून काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, पदाधिकारी तसंच असंख्य कार्यकर्ते आणि नागरिकांनी डॉक्टर सिंग यांचं अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या सैन्यदलाच्या वाहनातून डॉक्टर सिंग यांची अंत्ययात्रा निगमबोध घाट इथं पोहचली. 


निगमबोध घाटावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि दिल्लीच्या मुख्यमंत्रह आतिशी यांच्यासह उपस्थितांनी डॉक्टर सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. डॉ सिंग यांच्या शवपेटीवरचा तिरंगा त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर शीख धर्माच्या प्रथेनुसार प्रार्थना पठण करून डॉ सिंग यांच्या पार्थिव देहाला मुखाग्नी देण्यात आला. यावेळी सैन्यदलाच्या वतीनं शोकधून वाजवून तसंच हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.


****

डॉक्टर मनमोहन सिंग यांचं यथोचित स्मारक बांधण्यासाठी सरकार जागा देणार असल्याचं, केंद्रीय गृह मंत्रालयानं सांगितलं आहे. स्मारकासाठी जागा देण्याची विनंती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारकडे केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लगेचच गृहमंत्री अमित शहा यांनी सिंग यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून ही माहिती दिली. 

****

मुंबई इथं प्रदेश काँग्रेस मुख्यालयात डॉक्टर सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी सिंग यांच्या कार्याला उजाळा देतांना, आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर देशाला आर्थिक दिशा देण्याचं आणि आर्थिक शिस्त लावण्याचं काम मनमोहन सिंग यांनी केलं, ही बाब कधीही विसरता येणार नसल्याची भावना व्यक्त केली. पंतप्रधान पदाच्या दहा वर्षांच्या काळात डॉक्टर सिंग यांनी देशाला मनरेगा, शिक्षण हक्क, अन्न सुरक्षा कायदा, तसंच माहिती अधिकार कायदा देऊन सर्वसामान्यांचं हित पाहिलं, असंही पटोले यांनी म्हटलं आहे. 

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम श्रृंखलेचा हा एकशे सतरावा भाग असेल. 

****

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत, परभणी घटनेच्या संदर्भात काही मागण्या केल्या. परभणी प्रकरणातले पीडित सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई द्यावी, त्यांच्या कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, एक जानेवारी रोजी होणाऱ्या भीमा कोरेगावच्या अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर समाजात चुकीची माहिती भडकावण्याच्या संभाव्य प्रयत्नांना आळा घालण्यासाठी पोलिसांना निर्देश द्यावेत, असं आंबेडकर यांनी म्हटल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 

****

मस्साजोग हत्या प्रकरणी तातडीनं दखल न घेतल्यास, आंदोलन तीव्र होऊन राज्यभर पसरेल, असा इशारा सर्वपक्षीय मोर्चातून देण्यात आला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी बीड इथं निघालेल्या सर्वपक्षीय सर्वधर्मीय मूक मोर्चानंतरच्या सभेतून हा इशारा देण्यात आला. या सभेचा आमचे प्रतिनिधी रवी उबाळे यांनी घेतलेला हा आढावा.. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून निघालेला हा मूकमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या ठिकाणी या महामूक मोर्चाचं रूपांतर विराट सभेत झालं. यावेळी व्यासपीठावर बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विजयसिंह पंडित, आमदार जितेंद्र आव्हाड, छत्रपती संभाजीराजे, मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील, माजी आमदार सय्यद सलीम, यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह दिवंगत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी आणि मुलगा विराज यांच्यासह देशमुख कुटुंबीय यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. वैभवी हिने यावेळी केलेल्या भाषणात आपल्या वडिलांना न्याय देण्याची मागणी केली.

(वैभवी देशमुख)

आपण सर्व एक आहोत. माझ्या सोबत रहा. माझ्या कुटुंबासोबत. आणि 

माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या.


इतर मान्यवरांचीही यावेळी भाषणं झाली, या घटनेतल्या सर्व दोषींवर नि:पक्ष कारवाईची मागणी सर्वच नेत्यांनी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

****

आमदार सुरेश धस यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी महिला कलावंतांवर कुत्सित टिपण्णी केल्याचं, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी म्हटलं आहे. धस यांनी नुकत्याच केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या अनुषंगानं महिला आयोगाकडे तक्रार नोंदवल्यानंतर त्या काल पत्रकार परिषदेत बोलत होत्या. धस यांची ही भूमिका अत्यंत निंदनीय, अशोभनीय आणि खेदजनक असल्याचं सांगत, राजकारणासाठी अभिनेत्रींच्या नावांचा वापर करू नये, असं आवाहन प्राजक्ता माळी यांनी केलं. माध्यमांनीही अशा प्रकरणात संयम बाळगण्याची गरज त्यांनी नमूद केली. 

****

दहावा अजिंठा - वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या १५ ते १९ जानेवारी दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित करण्यात आला आहे. सिनेसृष्टीतल्या अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका, पटकथाकार, निर्मात्या, लेखिका आणि नाटककार पद्मभूषण सई परांजपे यांना जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि दोन लाख रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात सई परांजपे यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. १५ जानेवारीला सायंकाळी सहा वाजता छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठातल्या रुख्मिणी सभागृहात हा उद्घाटन सोहळा होईल. तर पुढील पाच दिवस प्रोझोन मॉल इथल्या, आयनॉक्स चित्रपटगृहात हा महोत्सव होणार आहे. 

****

छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाचा काल समारोप झाला. कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारोप सोहळ्यात अभिनेते समीर चौगुले आणि श्याम राजपुत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. चार दिवस चाललेल्या या महोत्सवात २९५ महाविद्यालयातल्या एक हजार ८८० विद्यार्थ्यांनी ३६ कलाप्रकारात सादरीकरण केलं, उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या कलावंतांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान करण्यात आली. 

विद्यापीठाच्या संघाने ललित कला गटातल्या सात कलाप्रकारात प्रथम क्रमांक पटकावून सांघिक विजेतेपदासह  प्रा.दिलीप बडे स्मृती चषक जिंकला. धाराशिव उपपरिसराच्या संघाने आठ पारितोषिकांसह जगन्नाथ नाडापुडे चषक पटकावला. बीडच्या बलभीम महाविद्यालयाच्या संघानं वाड्ःमय विभागात उत्कृष्ट संघ पुरस्कार मिळवला, तर छत्रपती संभाजीनगर इथल्या देवगिरी महाविद्यालयाच्या संघाला डॉ.संजय नवले लोककला चषक प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट ग्रामीण संघ म्हणून कन्नड इथल्या शिवाजी महाविद्यालयाच्या संघाला गौरवण्यात आलं. 

****

ओडिशातल्या राउरकेला इथं हॉकी इंडिया लीग स्पर्धेला कालपासून प्रारंभ झाला. उद्घाटनाच्या सामन्यात शुटआउटमध्ये, दिल्लीच्या एसजी पायपर्स संघानं गोनासिका संघाला चार-दोन असं नमवत विजय मिळवला. 

****

बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मेलबर्न इथं सुरू असलेल्या चौथ्या सामन्यात, भारताच्या पहिल्या डावात ३६९ धावा झाल्या. नितीश कुमार रेड्डीनं ११४, यशस्वी जयस्वालनं ८२, वॉशिंग्टन सुंदरने ५० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरु झाला असून, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दोन बाद ४७ धावा झाल्या होत्या. ऑस्ट्रेलिया १५८ धावांनी आघाडीवर आहे. 

****

नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातल्या श्री क्षेत्र माळेगाव इथं देव स्वारी आणि पालखी पूजनाने आज खंडोबा यात्रेला प्रारंभ होत आहे. प्रशासनाने या ठिकाणी पायाभूत सुविधा तसंच नागरिकांसाठी सुविधा संपर्क केंद्र उभारली आहेत. 

दरम्यान, या यात्रेत आजच्या नियोजित डॉ. शंकरराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. आता हे प्रदर्शन दोन जानेवारीपासून सुरू होणार असून, चार तारखेपर्यंत चालेल. या प्रदर्शनात सर्वात महत्त्वाची असलेली फळे, भाजीपाला आणि मसाला पीक स्पर्धा, दोन जानेवारीला होत आहे. 

****

कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना क्रमांक दोनच्या पाचव्या टप्प्याचं काम पूर्ण होत आलं आहे. इथल्या पंपगृहाची चाचणी जानेवारी महिन्यात घेण्याचं नियोजन असल्याची माहिती, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. या योजनेची पाहणी तसंच आढावा बैठकीसाठी वेळ देण्याची विनंती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना केली असल्याचंही पाटील यांनी सांगितलं. 

****

छत्रपती संभाजीनगर इथं अवैध गुटखा प्रकरणी पोलिसांनी कारवाई करून सुमारे १३ लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे. 

****


No comments: