Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 31 December 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप असलेले वाल्मिक कराड हे पुणे इथं सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले आहेत. तत्पूर्वी त्यांनी स्वतःचा एक व्हिडीओ प्रसिद्ध करून त्यात स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय द्वेषापोटी आपल्याविरोधात आरोप केले जात असून, पोलिस तपासात दोषी आढळल्यास जी शिक्षा होईल, ती भोगण्यासाठी तयार असल्याचं ते म्हणाले.
****
आज ३१ डिसेंबर, सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं स्वागत करण्याचा दिवस. नव्या वर्षाचं उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यासाठी नागरिक उत्सुक असून, विविध पर्यटन स्थळ नागरिकांनी फुलून गेली आहेत. तिथल्या प्रशासनानंही यासाठी जय्यत तयारी केली आहे. मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट विविध बसमार्गांवर रात्री २५ जादा बसगाड्या सोडणार आहे. नवीन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीन हजार पोलीस-अधिकारी कर्मचारी आणि ७०० वाहतूक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. शहरात २३ ठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे. पहाटे पाच वाजेपर्यंत मद्याची दुकानं सुरू ठेवण्याला परवानगी आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही आज रात्री वाहतूक शाखेच्या वतीने विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. मद्य किंवा अंमली पदार्थांचं सेवन करुन वाहन चालवणार्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं, वाहतूक शाखेनं कळवलं आहे.
****
बीड इथं आज सरत्या वर्षाला निरोप देताना व्यसनमुक्ती फेरी काढण्यात आली. शिवसंग्रामच्या अध्यक्ष ज्योती मेटे यावेळी उपस्थिती होत्या. व्यसनमुक्ती विषयी जनजागृतीचे फलक घेऊन बाल वारकरी आणि विद्यार्थ्यांसह नागरिक या फेरीत सहभागी झाले होते. यानिमित्त सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे.
****
यंदाच्या रब्बी हंगामात देशभरात ६१४ लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. यंदा गव्हाच्या पेरणीअंतर्गतचे क्षेत्र सुमारे ३२० लाख हेक्टरवर पोहचलं आहे. याशिवाय १३६ लाख हेक्टर क्षेत्रात कडधान्यांची, ४८ लाख हेक्टर क्षेत्रावर श्री अन्न, भरड धान्यांची, तर ९६ लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची पेरणी झाली असल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे.
****
कोरेगांव भीमा इथं उद्या होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी पाच हजार पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे एक हजार जवान आणि ७५० पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोरेगाव भिमा परिसरात ४५ ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. ३०० सीसीटीव्ही, दहा ड्रोन, आणि ५० पोलीस टॉवरद्वारे परिसरात देखरेख ठेवली जाईल. चोरीच्या घटना रोखण्यासाठी विशेष पोलीस पथकही तैनात असेल असं अमितेश कुमार यांनी सांगितलं.
दरम्यान, विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायींना तिथल्या सुविधांची माहिती मिळावी यासाठी जिल्हा परिषदेनं ‘विजयस्तंभ सुविधा’ ॲप तयार केलं आहे. या ॲपचा उपयोग करुन अनुयायांना शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सुविधांपर्यंत सहजपणे पोहोचता येणार असल्याचं, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी सांगितलं. आज आणि उद्या कोरेगाव भिमा इथं बससेवा, आरोग्य सेवा, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, शौचालय सुविधा, निवारा कक्ष, पिण्याचं पाणी, पोलीस मदत कक्ष आदी विविध सुविधा प्रशासनानं उपलब्ध करुन दिल्या आहेत.
****
श्री क्षेत्र तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेला आज सायंकाळी प्रारंभ होत आहे. सात ते चौदा जानेवारी दरम्यान तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला सुरूवात होणार आहे. विविध अलंकार महापूजा, जलयात्रा यासारखे धार्मिक कार्यक्रम यावेळी होणार आहेत. तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना करून घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सुरुवात होणार आहे.
****
बीड जिल्हा ग्रंथालय कार्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. यानिमित्त उद्यापासून १५ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातल्या ६२५ शासकीय सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी मोहीम राबवली जाणार असून, वाचकप्रेमींनी या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांनी केलं आहे.
परभणी इथंही ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन काल जिल्हा नियोजन अधिकारी किशोर परदेशी यांच्या हस्ते झालं.
****
उत्तर प्रदेश इथल्या प्रयागराज कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांसाठी दक्षिण मध्य रेल्वे विशेष गाड्या सोडणार आहे. नांदेड - पाटणा - नांदेड, छत्रपती संभाजीनगर - पाटणा - छत्रपती संभाजीनगर, काचीगुडा - पाटणा - काचीगुडा आणि सिकंदराबाद - पाटणा - सिकंदराबाद या विशेष रेल्वे प्रयागराजमार्गे चालवण्यात येणार आहेत. १३ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान या गाड्या धावणार असल्याचं रेल्वे कार्यालयानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment