Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 31 December 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३१ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
आज ३१ डिसेंबर, सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं स्वागत करण्याचा दिवस आहे. नव्या वर्षाचं उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यासाठी नागरिक उत्सुक असून, विविध पर्यटन स्थळ नागरिकांनी फुलून गेली आहेत. तिथल्या प्रशासनानंही यासाठी जय्यत तयारी केली आहे. मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट विविध बसमार्गांवर रात्री २५ जादा बसगाड्या सोडणार आहे. नवीन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीन हजार पोलीस-अधिकारी कर्मचारी आणि ७०० वाहतूक पोलीस तैनात करण्यात येणार असून, शहरात २३ ठिकाणी तपासणी होणार आहे. पहाटे पाच वाजेपर्यंत मद्याची दुकानं सुरू ठेवण्याला परवानगी आहे. यासंबंधीच्या नियमांचं पालन न करणाऱ्या पब आणि हॉटेल्सवर कारवाई केली जाईल, असा इशारा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही आज रात्री वाहतूक शाखेच्या वतीने विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. मद्य किंवा अंमली पदार्थांचं सेवन करुन वाहन चालवणार्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं, वाहतूक शाखेनं कळवलं आहे.
****
आरटीजीएस अथवा एनईएफटी प्रणालीचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने बँक खात्यात पैसे जमा करणाऱ्या व्यक्तींना, असा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यासोबत नोंदवलेल्या नावाची पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकनं दिले आहेत. या संदर्भातलं परिपत्रक बँकेनं काल जारी केलं. आरटीजीएस आणि एनईएफटीचे थेट किंवा उपसदस्य असलेल्या सर्व बँकांनी येत्या एक एप्रिल २०२५ पर्यंत ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही बँकेनं केली आहे.
****
करचोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी डिजी यात्रेच्या माहितीचा वापर केला जाणार असल्याच्या माध्यमांमध्ये प्रसारीत होत असलेल्या बातम्या सरकारनं फेटाळल्या आहेत. या संदर्भातले अहवाल निराधार आणि चुकीच्या माहितीवर आधारित आहेत, असं नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे. मंत्रालयाकडून प्रवासी माहिती कर विभागाकडे सामायिक केली जात नाही, असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विविध विभगांचा आढावा घेतला. वस्त्रोद्योग विभागाच्या पुढील शंभर दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीत त्यांनी, महाराष्ट्रात टेक्निकल टेक्सटाईल मिशनची स्थापना करण्याचे निर्देश दिले. यासोबतच महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळाची स्थापना करणं, नवी दिल्ली इथं आयोजित भारत टेक्स २०२५ मध्ये सहभाग घेणं, टेक्निकल टेक्सटाईल पार्कसाठी अभिरूची पत्रे मागवणं तसेच स्थानिक वस्त्रोद्योगासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना प्रभावीपणे लागू करावी, आदी सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. परिवहन विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचा देखील पुढील शंभर दिवसांचा आराखडा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निश्चित करण्यात आला.
****
केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषी योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं, कृषीमंत्री विधिज्ञ माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं. त्यांनी काल कृषीमंत्री म्हणून पदभार स्विकारला, त्यावेळी ते बोलत होते. कृषी विभागात आवश्यक सुधारणा करून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल, असंही कोकाटे यावेळी म्हणाले.
दरम्यान, शेतीशी निगडीत वस्तू, अवजारं यांचा काळाबाजार करणारे दुकानदार आणि अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा कोकाटे यांनी दिला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांकडून तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते.
****
दादा भुसे यांनी देखील काल शालेय शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सकस आहार पुरवण्यास शासन कटीबद्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले.
****
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर जर अतिक्रमण झालं असेल, तर ते तात्काळ हटवण्यात येईल, असं राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. नवी मुंबईत वाशी इथल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देत विविध प्रकल्पांची पाहणी त्यांनी काल केली, त्यानंतर ते बोलत होते. कायदा कडक करण्यापेक्षा व्यापार आणि मार्केट सुरळित करणं, हा मुख्य हेतू असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी तीन विशेष मुलांच्या शाळांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. नाशिक इथल्या प्रबोधिनी विद्या मंदिर, श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय आणि नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या तीन संस्थांसोबत विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या ‘सेंटर फॉर डिसेबिलेटी स्टडीज’ तर्फे दोन प्रकारचे द्विपक्षीय सामंजस्य करार करण्यात आले. यांच्या सहकार्याने शिक्षणक्षेत्रात दिव्यांग व्यक्तींसाठी भरीव कार्य करण्याचा विश्वास कुलगुरू संजीव सोनवणे यांनी व्यक्त केला.
****
नांदेड - अमृतसर - सचखंड एक्सप्रेस आज दुपारी एक वाजता सुटेल अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे दिली आहे. या मार्गावरून येणाऱ्या रेल्वे उशिरा धावत असल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.
****
उत्तर प्रदेश इथल्या प्रयागराज कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांसाठी दक्षिण मध्य रेल्वे विशेष गाड्या सोडणार आहे. नांदेड - पाटणा - नांदेड, छत्रपती संभाजीनगर - पाटणा - छत्रपती संभाजीनगर, काचीगुडा - पाटणा - काचीगुडा आणि सिकंदराबाद - पाटणा - सिकंदराबाद या विशेष रेल्वे प्रयागराजमार्गे चालवण्यात येत आहेत.
****
No comments:
Post a Comment