Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 30 December 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
वर्ष २०२५-२६ च्या आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत अर्थसंकल्पपूर्व बैठक पार पडली. विविध विभागांचे सचिव या बैठकीला उपस्थित होते. २०२५-२६ चा अर्थसंकल्प येत्या एक फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता आहे.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो आज स्पेडेक्स मिशन अंतर्गत अतिशय महत्त्वाचं प्रक्षेपण करणार आहे. हे प्रक्षेपण करुन अंतराळ क्षेत्रात एक मोठी झेप घेण्यासाठी इस्रो सज्ज झालं आहे. या प्रक्षेपणानंतर असं तंत्रज्ञान असलेला अंतराळ क्षेत्रातला भारत हा चौथा देश बनणार आहे. अंतराळामध्ये दोन उपग्रहांना किंवा अंतराळ यानांना जोडण्याचं म्हणजेच डॉपिंग करण्याचं तंत्रज्ञान सध्या केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन पीएसएलव्ही सी - 16 या प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या वर्षांतलं इस्रोचं हे शेवटचं प्रक्षेपण आहे. अंतराळ आणि सहकार्यासाठी ही मोहिम नवी दालनं खुली करणार आहेत. जागतिक अंतराळ समुदायात यामुळे भारताचं स्थान अतिशय बळकट होणार आहे. या मोहिमेत इस्रोचे एच डी एच सी झिरो वन आणि एच डी एच सी झिरो - टू हे उपग्रह समाविष्ट असतील. या दोन्ही उपग्रहांचं वजन प्रत्येकी २२० किलो आहे. पीएसएलव्ही सी -16 द्वारे या दोन्ही उपग्रहांचं प्रक्षेपण केल्यानंतर त्यांना पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ४७० किलोमीटर अंतरावर पृथ्वीच्या खालच्या कक्षेमध्ये स्थापित करण्यात येणार आहे.
****
राज्यात खरीप हंगामात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणांमध्ये मुबलक पाणी साठा आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागानं निश्चित केलं असून, त्याच्या अंमजबजावणीला सुरुवातही झाली आहे. राज्यात २०२४-२५ या वर्षात ५० हजार वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागानं केलं आहे. त्यापैकी सद्य:स्थितीत १४ हजार १०९ वनराई बंधारे बांधून तयार झाले आहेत. या बंधाऱ्याद्वारे सुमारे एक लाख हेक्टरवरील रब्बी पिके, भाजीपाला, फळबागा, फुलशेतीला पाणी उपलब्ध होणार आहे. तसंच भूगर्भातली पाणीपातळी वाढण्यासही मदत होईल, असं कृषी आयुक्तालयानं म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात ८६५, लातूर एक हजार २५३, कोकण - ९६३, नाशिक - दोन हजार १३४, पुणे एक हजार ८७२, कोल्हापूर एक हजार पाच, अमरावती तीन हजार ५६६, तर नागपूर विभागात दोन हजार ४५० वनराई बंधारे तयार झाले आहेत.
****
जेजुरी इथं खंडोबा देवाची सोमवती यात्रा आज होत आहे. दुपारी श्री खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्याचं गडावरून प्रस्थान होईल. या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत.
****
मराठवाड्याच्या अनेक भागात आज वेळ अमावस्येचा सण साजरा होत आहे. शेतजमिनीप्रति कृतज्ञता म्हणून लातूर, धाराशिव तसंच नांदेड आणि बीड जिल्ह्याच्या काही भागात हा दिवस साजरा होतो. या दिवशी शेतात विशेष पूजा आणि सहभोजनाचं आयोजन केलं जातं.
****
नवीन वर्ष स्वागतासाठी ठिकठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. नाशिकमध्ये धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढत असून, वणी इथं नववर्षाच्या निमित्तानं सप्तशृंगी देवीचं मंदिर २४ तास खुलं ठेवण्यात येणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यातल्या संत नगरी शेगाव इथं भक्तांची गर्दी लक्षात घेता संत श्री गजानन महाराज संस्थान मधल्या श्रीं चं समाधी स्थळ, आणि मंदिरातले सर्व विभाग भक्तांच्या दर्शनासाठी उद्या ३१ डिसेंबरच्या रात्री खुले राहणार आहेत.
****
शिवसंग्राम संघटनेच्या वतीने बीड इथं उद्या ३१ तारखेला व्यसनमुक्ती जनजागृती महारॅली काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनापर्यंत ही रॅली काढण्यात येणार आहे.
****
बॉर्डर -गावस्कर चषक क्रिकेट स्पर्धेत मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारतावर १८४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं मालिकेत दोन - एक अशी आघाडी घेतली आहे. कसोटी सामन्याच्या आज शेवटच्या दिवशी ३४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव १५५ धावांवर आटोपला. यशस्वी जयस्वालनं ८४ धावांची खेळी केली, त्याच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स आणि स्कॉट बोल्डनं प्रत्येकी तीन बळी टिपले. कसोटीत दहा बळी आणि ९० धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणारा पॅट कमिन्स सामनावीर ठरला. मालिकेतला शेवटचा कसोटी सामना तीन जानेवारीपासून सिडनी इथं होणार आहे.
दरम्यान, या विजयासोबतच ऑस्ट्रेलियाच्या संघाने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे. दक्षिण आफ्रिका संघानं पाकिस्तानचा पराभव करत यापूर्वीच अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे.
****
किंग कप आंतरराष्ट्रीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेननं कांस्य पदकाची कमाई केली. त्याने काल झालेल्या सामन्यात फ्रेंच बॅडमिंटनपटू ॲलेक्स लॅनियरवर २१ - १७, २१ - ११ असा विजय मिळवला.
****
No comments:
Post a Comment