Friday, 27 December 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.12.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 27 December 2024

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २७ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहाचं दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. डॉ सिंग यांचं काल रात्री निधन झालं, त्यांचा पार्थिव देह नवी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी डॉ सिंग यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण केलं, तसंच डॉ सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांची भेट घेऊन सांत्वन केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनीही डॉ सिंग यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. 


डॉ सिंग यांच्या पार्थिव देहावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून, आजचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेऊन माजी पंतप्रधान डॉ सिंग यांना सरकारकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.


डॉ मनमोहनसिंग यांना जगभरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. अफगाणिस्ताने माजी राष्ट्रपती हमीद करझई, मालदीवचे माजी राष्ट्रपती मोम्मद नशीद, रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह, यांच्यासह अनेक नेत्यांनी डॉ सिंग यांच्या आठवणींना उजाळा देत, शोक व्यक्त केला आहे.

****

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे अत्यंत शांत विनम्र मितभाषी व्यक्तिमत्व होते. त्यांची अर्थतज्ज्ञ म्हणून कामगिरी जागतिक दर्जाची होती. त्यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली, या शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डॉ. सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

****

मकर संक्रांतीच्या सणादरम्यान होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेत दक्षिण मध्य रेल्वेनं पूर्णा तिरूपती पूर्णा, नांदेड इरोड नांदेड, आणि तिरूपती अकोला तिरूपती या गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, गुंटूर- औरंगाबाद गाडी उद्या २८ तारखेला रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे परवा २९ तारखेला सुटणारी औरंगाबाद गुंटूर गाडीही धावणार नसल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात आज पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, राज्यात अनेक जिल्ह्यात आजपासून तीन दिवस गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान, अकोल, वाशीम जिल्ह्यात तुरळक पाऊस होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

लातूर इथं उद्या २८ डिसेंबर पासून अखिल महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे यांच्यावतीने दोन दिवशीय मुख्याध्यापकांचं ६१ वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन होत आहे. दोन दिवस असणआऱ्या या संमेलनाचं उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असून, संमेलनाध्यक्ष म्हणून प्राचार्य बाबुराव जाधव तर स्वागताध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे असणार आहेत, अशी माहिती लातूर जिल्हा माध्यमिक व आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी दिली आहे.

****

महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या आयसीसी चॅम्पियनशिप मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवशीय सामना आज वडोदरा इथं सुरू आहे. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त आलं तेव्हा वेस्ट इंडिज संघाने १९ षटकात ३ खेळाडू बाद ८० धावा केल्या आहेत. तीन सामन्यांच्या या मालिकेतले दोन सामने भारताने जिंकले आहेत.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्याच्या पहिल्या डावावर यजमान संघानं पकड मजबुत केली आहे. मेलबर्न इथं होत असलेल्या या सामन्यात, ऑस्ट्रेलिया संघानं आपल्या पहिल्या डावात ४७४ धावा केल्या आहेत. शेवटचं वृत्त हाती आली तेंव्हा भारतीय संघानं पहिल्या डावात २ बाद ८२ धावा केल्या आहेत. या मालिकेत दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीत आहेत.

****

अग्नीवीर योजनेअंतर्गत सैन्यदलात कारकून तसंच सामान्य श्रेणीत विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी बेळगावी इथल्या मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर इथं दोन जानेवारी २०२५ पासून नऊ जानेवारीपर्यंत भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. वीरपत्नी, हुतात्मा सैनिकाचे भाऊ, माजी सैनिक, तसंच विशेष प्रावीण्यप्राप्त क्रीडापटूंसाठी हा मेळावा आहे. सर्व निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची या मेळाव्यात शारीरिक चाचणी तसंच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. साडे सतरा ते २१ वर्ष वयोगटातले युवक यासाठी पात्र असतील. सामान्य श्रेणीसाठीचा उमेदवार ४५ टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण तर कारकून श्रेणीसाठी ६० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयानं केलं आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यात हवामान बदलामुळे भुईमुग पिकावर टीका रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसून येत आहे. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत बाधा येत असल्याने रब्बीच्या भुईमूग पिकाच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज जिंतूर कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण शिंदे यांनी व्यक्त केला आहे. 

****


No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...