Sunday, 29 December 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.12.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 29 December 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

**** 

राज्यघटना आपल्यासाठी मार्गदर्शक प्रकाश - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन.

खेळाच्या मैदानापासून विज्ञान, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत भारत नवी शिखरं गाठत असल्याबद्दल पंतप्रधानांकडून गौरवोद्गार.

भाविकांच्या बसला पंढरपूरनजिक अपघात, दोघांचा मृत्यू तर २५ जण जखमी. 

आणि

कोनेरू हंपीला जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेचं दुसऱ्यांदा अजिंक्यपद. 

****

देशाच्या सामूहिक शक्तीचा जिवंत दस्तावेज `मन की बात` कार्यक्रमाच्या आतापर्यंत प्रसारीत ११६ भागांद्वारे निर्माण झाला असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीवरील आपल्या ‘मन की बात’च्या ११७व्या भागाद्वारे देशवासियांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. देशाची राज्यघटना लागू होण्यास येत्या २६ जानेवारीला ७५ वर्ष पुर्ण होत असून ही राज्य घटना आपल्यासाठी मार्गदर्शक प्रकाश- दीपस्तंभ असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले...

देश के नागरिकों को संविधान की विरासत से जोड़ने के लिए constitution75.com नाम से एक खास website भी बनाई गई है। इसमें आप संविधान की प्रस्तावना पढ़कर अपना video upload कर सकते हैं। अलग-अलग भाषाओं में संविधान पढ़ सकते हैं,संविधान के बारे में प्रश्न भी पूछ सकते हैं। ‘मन की बात’ के श्रोताओं से, स्कूल में पढ़ने वाले बच्चों से, कॉलेज में जाने वाले युवाओं से, मेरा आग्रह है, इस website पर जरूर जाकर देखें, इसका हिस्सा बनें।


या संवादादरम्यान युवा नवोन्मेषकाच्या कल्पनांनी आपल्याला प्रभावित केलं तर कधी यशानं गौरवान्वित केलं, असं ते म्हणाले. आपला भारत विविधतेत एकतेसह पुढे जात असून खेळाच्या मैदानापासून विज्ञान, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत भारत नवीन शिखरं गाठत असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण देशवासीयांनी या काळात एका कुटुंबाप्रमाणं मिळून प्रत्येक आव्हानाचा सामना केला आणि नवीन यश संपादन केलं आहे. देशभरात खेळ-आरोग्या बाबत विविध उपक्रम सुरु असून जनता सुदृढ आरोग्याला दिनचर्येचा भाग बनवत असल्याबद्द्ल मोदी यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं. काश्मीरमधल्या स्कीईंग पासून गुजरातमधील पतंग महोत्सवापर्यंत, `सायकलचा रविवार` तसंच `सायकलचा मंगळवार` या सारख्या अभियानातून सायकल चालवण्यास प्रोत्साहन मिळत असल्याचं ते म्हणाले.

छत्तीसगडच्या बस्तर इथं घेण्यात आलेल्या बस्तर ऑलिंपिकचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले...

मैं आप सभी से आग्रह करता हूँ, अपने क्षेत्र में ऐसे खेल आयोजनों को प्रोत्साहित करें। #खेलेगा भारत – जीतेगा भारत के साथ अपने क्षेत्र की खेल प्रतिभाओं की कहानियां साझा करें। स्थानीय खेल प्रतिभाओं को आगे बढ़ने का अवसर दें। याद रखिए, खेल से, न केवल शारीरिक विकास होता है, बल्कि ये Sportsman spirit से समाज को जोड़ने का भी एक सशक्त माध्यम है। तो खूब खेलिए-खूब खिलिए।


जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार भारतात वर्ष २०१५ पासून २०२३ दरम्यान मलेरिया रुग्ण आणि त्यामुळं होणाऱ्या मृत्यूमध्ये ८० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. तसंच कर्करोगविरोधी लढाईत जगप्रसिद्ध वैद्यकीय मासिक लान्सेटच्या अभ्यासानं देशात मोठी आशा निर्माण केली असून भारतात वेळेवर कर्करोगावरील उपचार सुरू होण्याची शक्यता वाढली आहे, असं ते म्हणाले. यानुसार कर्करोग रुग्णावरील उपचार तीस दिवसांच्या आत सुरू होणं आवश्यक असल्यानं आयुष्मान भारत योजना पैशांचा हातभार लावून दिलासा देत असल्यानं महत्वपूर्ण ठरल्याचं मोदी यांनी सांगितलं. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं येणाऱ्या कुंभमेळ्याशी संबंधित प्रत्येक प्रकारची माहिती ११ भारतीय भाषांत मिळणार असल्याचं सांगून यात सहभागी होत Ekta Ka MahaKumbh या हॅशटॅगसह सेल्फी टाकण्याचं आवाहन त्यांनी केलं.       

देशाच्या सर्जनशीलतेच्या उद्योगातील क्षमतेबाबत बोलतांना मोदी यांनी, KTB  ॲनिमेशन मालिका अर्थात क्रृश, तृश आणि बाल्टीबॉय या ॲनिमेशन पात्रांद्वारे देशाच्या  स्वातंत्र्यलढ्याबाबत मिळणा-या माहितीचा उल्लेख केला. राज कपूर यांची  साजरी होत असलेली शतकमहोत्सवी जयंती तसंच, भारतात लवकरच होत असलेल्या `वर्ल्ड ऑडिओ - व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट` म्हणजेच `WAVES` मध्ये सहभाग घेण्याबाबत मोदी यांनी माहिती दिली. वर्ष २०२५ आता जवळ आलं असून या वर्षातही  या उपक्रमाच्या  माध्यमातून आपण आणखी प्रेरणादायी प्रयत्न मांडू, असं नमुद करत पंतप्रधानांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 

****

ठिकठिकाणी `मन की बात`चं सामुहिक श्रवण करण्यात आलं. लातूर जिल्ह्यात आज विविध भागात पंतप्रधानांच्या 'मन की बात'चं थेट प्रसारण ऐकण्यात आले. लातूर शहरातल्या रिलायन्स त्रिपुरा महाविद्यालयात हा कार्यक्रम ऐकण्यासाठी नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपल्या देशाच्या सांस्कृतिक विकासाची प्रेरणा आज संपूर्ण जग घेत असल्याची प्रचिती आल्याचा अनुभव उपस्थित श्रोत्यांनी यावेळी व्यक्त केला. रत्नागिरी इथं, तसंच धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर शहरात श्रोत्यांनी सामूहिकपणे 'मन की बात' कार्यक्रमाचं थेट प्रसारण ऐकलं. वाशिम जिल्ह्यातल्या भाजपच्या कार्यालयातही कार्यक्रमाचं प्रसारण ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आमदार प्रसाद लाड यांच्या मुंबईतल्या सायन सर्कल इथल्या जनसंपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात आलं. पंतप्रधानांचं सातत्यानं आपल्याला मार्गदर्शन लाभत असून, त्यामुळं एक नवी ऊर्जा मिळते, अशी भावना आमदार लाड यांनी व्यक्त केली. 

****

सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यात भटुंबरे इथं आज सकाळी साडे पाच ते सहा वाजेच्या सुमारास भाविकांची बस आणि ट्रकचा अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला तर अन्य २५ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक वयस्क महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातल्या कामशेत या गावातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असलेले प्रवासी या बसमध्ये होते. अपघातातल्या जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

****                   

भारताची आघाडीची बुद्धिबळपटू कोनेरू हंपी हिनं न्यूयॉर्क इथं झालेल्या जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटाचं जेतेपद पटकावलं आहे. इंडोनेशियाच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करून हंपीनं या स्पर्धेतलं आपलं दुसरं जेतेपद पटकावलं. ११ फेऱ्यांमध्ये तिनं साडेआठ गुणांची कमाई केली. ३७ वर्षांची हंपी, या स्पर्धेत दोनदा अजिंक्य ठरणारी, चीनच्या जू वेंजून हिच्यानंतरची दुसरीच बुद्धिबळपटू आहे. २०१९ मध्ये हंपीनं पहिल्यांदा या स्पर्धेत अजिंक्यपद मिळवलं होतं. पुरुषांच्या गटात रशियाच्या १८ वर्षीय वोलोदार मुर्झिन विजेता ठरला. 

****

भारत-ऑस्ट्रेलिया,बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत मेलबर्न इथं सुरू चौथ्या सामन्यात आजच्या चौथ्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियानं आपल्या दुस-या डावात नऊ बाद २२८ धावा केल्या. ऑस्ट्रेलिय संघाने आता एकूण ३३३ धावांची आघाडी घेतली आहे. भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रति बुमराहनं पुन्हा एकदा भेदक मारा करताना चार गडी बाद केले तर मोहम्मद सिराजनं तीन गडी बाद करून त्याला साथ दिली. बुमराहनं विक्रमी कामगिरी नोंदवत कसोटीतील दोनशे बळींचा टप्पाही आज ओलांडला. ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनं सर्वाधिक ७० तर पॅट कमीन्सनं ४१ धावा केल्या. या दोघांनी ऑस्ट्रेलियाची अवस्था सहा बाद ९१ असताना सोबत येत संघाचा कोसळणारा डाव सावरला.   

****

रायगड जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर आज पहिल्या व्यावसायिक विमानाचं आगमन झालं. इंडिगो ए थ्री ट्वेंटी या विमानानं मुंबई विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर ते नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं. या विमानावर पाण्याचे फवारे मारून या विमानाला सलामी देण्यात आली. 

****

नांदेड जिल्ह्यात सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत ही चळवळ पोहोचवण्यासाठी जिल्हा सहकार विकास समितीची  जिल्हास्तरावर स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्याला संगणीकरणात राज्यात दुसरा क्रमांक मिळाला असल्याची माहिती शासनातर्फे देण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक उपक्रम सुरू आहेत. याअंतर्गत जिल्ह्यातल्या ६४ विविध सहकारी संस्थाचं संगणकीकरण करण्यात आलं आहे. 

****

हरंगुळ -पुणे आणि पुणे -हरंगुळ या लातूरसह धाराशिव आणि बार्शी इथल्या प्रवाश्यांच्या पुण्याला जाणाऱ्या महत्वाच्या रेल्वेगाड्यांना मुदतवाढ मिळाली आहे. या गाड्यांची मुदत उद्या संपत होती. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी  या गाडीला मुदतवाढ देणेबाबत मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे मागणी केली होती. त्यानुसार या रेल्वेला मुदतवाढ दिली असल्याचं रेल्वे मुख्यालयातर्फे कळवण्यात आलं आहे. 

****

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्त अकोल्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय ॲग्रोटेक २०२४ कृषी प्रदर्शन सुरु आहे. या प्रदर्शनात महाबीज म्हणजे महाराष्ट्र राज्य बियाणं महामंडळाची दोन दालनं आहेत. सोयाबीनच्या संशोधित जातींचं वाण, उत्कर्ष हे मूग पिकाचं वाण आणि एमयू चव्वेचाळीस हे उडीद पिकाचं वाण अशी अनेक बियाणं यात मांडली आहेत. शेतकरी या प्रदर्षणाला भेट देऊन माहिती घेत असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. 

****


No comments: