Tuesday, 31 December 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.12.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 31 December 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.

****

इस्रोच्या स्पेडेक्स मिशनचा पहिला टप्पा पूर्ण-दोन्ही उपग्रह निर्धारित कक्षेत दाखल

'विवाद से विश्वास' योजनेला सीबीडीटीकडून महिनाभराची मुदतवाढ

मस्साजोग तसंच परभणी इथल्या पीडित कुटुंबीयांचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून सांत्वन

छत्रपती संभाजीनगराला नव्या जलवाहिनीतून मार्च महिन्यात पाणीपुरवठ्याचं नियोजन करण्याचे मंत्री अतुल सावे यांचे निर्देश

अहिल्यानगर-परळी रेल्वेमार्गावर विघनवाडी ते राजुरी दरम्यान लोहमार्गाची चाचणी यशस्वी

आणि

लातूर, धाराशिव आणि बीडसह अनेक गावांत वेळ अमावस्येचा सण उत्साहात साजरा

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोने स्पेडेक्स मिशनचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन काल रात्री पीएसएलव्ही सी - 16 या प्रक्षेपकाद्वारे एस डी एक्स 01 आणि एस डी एक्स 02 या दोन उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलं, हे दोन्ही उपग्रह आपल्या निर्धारित कक्षेत यशस्वीरित्या दाखल झाले. या वर्षांतलं इस्रोचं हे शेवटचं प्रक्षेपण यशस्वी ठरलं असून, आता पुढच्या दहा दिवसांत डॉकिंग अर्थात हे दोन्ही उपग्रह अंतराळात जोडण्याचा दुसरा टप्पा सुरू होईल.

हा प्रयोग यशस्वी झाल्यास, अंतराळ क्षेत्रात असं तंत्रज्ञान असलेला भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतरचा चौथा देश ठरेल. चांद्र मोहिमा तसंच अंतराळ स्थानकासारख्या प्रकल्पांसाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाचं ठरणार असून, या क्षेत्रात भारताचं स्थान अतिशय बळकट होणार आहे.

****

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ - सीबीडीटीने विवाद से विश्वास या योजनेची मुदत ३१ जानेवारी २०२५ पर्यंत वाढवली आहे. आज ही मुदत संपणार होती. यामुळे करदात्यांना प्राप्तीकराची देय रक्कम निश्चित करण्यासाठी तसंच कर भरण्यासाठी वेळ मिळणार आहे.

****

वर्ष २०२५-२६ च्या आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत अर्थसंकल्पपूर्व बैठक पार पडली. २०२५-२६ चा अर्थसंकल्प येत्या एक फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता आहे.

****

राष्ट्रीय छात्रसेनेच्या प्रजासत्ताक दिन संचलन शिबिराला काल नवी दिल्लीच्या करिअप्पा मैदानावर प्रारंभ झाला. महिनाभर चालणाऱ्या या शिबीरात २८ राज्यं आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमधून आलेले दोन हजार ३६१ छात्रसैनिक सहभागी होत असून, त्यात ९१७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. १४ मित्रदेशांमधले कॅडेट्सही या शिबीरात सहभागी झाले आहेत.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विविध विभगांचा आढावा घेतला. वस्त्रोद्योग, परिवहन, सांस्कृतिक कार्य, ग्रामविकास आणि पंचायत राज, आदी विभागांचा पुढील शंभर दिवसांचा आराखडा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निश्चित करण्यात आला.

****

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणातल्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. मस्साजोग इथं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ते काल वार्ताहरांशी बोलत होते. या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी आठवले यांनी केली, ते म्हणाले...

मराठवाड्यामध्ये अशा मोठ्या दोन घटना घडलेल्या आहेत. जे काही प्रकार घडत आहेत, हे योग्य नाही. महाराष्ट्र सरकार याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष देऊन आहे. पोलिसांना पण सूचना दिलेल्या आहेत. जिल्हाधिकारी भेटले होते, त्यांनाही मी सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. आणि त्या प्रकरणामध्ये या सुत्रधारांना सुद्धा पकडणे अत्यंत आवश्यक आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियातल्या कुणाचा जबाब अजून नोंदवला नाहीये. हे प्रकरण सीआयडीकडे असल्यामुळे सीआयडीने सुद्धा लवकरात लवकर जबाब घ्यावा.


दरम्यान, आठवले यांनी काल परभणी इथं सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडे यांच्या कुटुबीयांचीही भेट घेतली. यावेळी सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना पक्षातर्फे पाच लाख रुपये मदत करण्यात आली, तर वाकोडे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसंच कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी या अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं.

****


आमदार सुरेश धस यांनी काल जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेऊन, शिफारशीने बंदुकीचा परवाना मिळवलेल्यांची चौकशी करावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं, अशी आपली मागणी असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाबद्दल धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

****

मस्सजोग हत्याप्रकरणी महिनाभरात मोठी कारवाई केली जाईल असा विश्वास, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केला आहे. काल बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

****

छत्रपती संभाजीनगराला नव्या जलवाहिनीतून मार्च महिन्यात पहिल्या टप्प्यात पाणीपुरवठ्याचं नियोजन करण्याचे निर्देश, इतर मागासवर्ग आणि बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. शहराच्या पाणी पुरवठ्याशी निगडित बैठकीत ते काल बोलत होते. या बैठकीला खासदार संदिपान भुमरे, जालन्याचे खासदार कल्याण काळे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. येत्या जून महिन्यात काम पूर्ण होऊन पाणी पुरठा सुरू होईल, असं सावे यांनी सांगितलं. ते म्हणाले...

‘‘आमचा प्रयत्न हा राहणार आहे की ॲटलिस्ट पहिला टप्पा जो जॅकवेलचा आहे, तो मार्चपर्यंत सुरु व्हावा. जवळ जवळ ८८ टक्के पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. सात टँक ऑलरेडी कमीशन झालेल्या आहेत. २२ टँक मार्चपर्यंत पूर्ण होतील अशी परिस्थिती आहे. मार्च पर्यंत आमचा प्रयत्न हा राहणार आहे की एक टप्पा आपला पाण्याचा कमी करुन आणि जूनपर्यंत संपूर्ण काम पूर्ण करुन शहराला पाणी मिळायला सुरुवात होईल.’’


****

अहिल्यानगर - बीड- परळी या रेल्वेमार्गावरील शिरूर तालुक्यातील विघनवाडी ते बीड जवळील राजुरी पर्यंत झालेल्या मार्गाची यशस्वी चाचणी काल करण्यात आली. बीड इथं झालेल्या या चाचणीच्या वेळी खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते. मार्च २०२६ पर्यंत हा मार्ग परळीपर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

****

तमिळनाडूत कन्याकुमारी इथं देशातल्या पहिल्या काचेच्या पुलाचं काल लोकार्पण करण्यात आलं. विवेकानंद स्मारक ते संत तिरुवल्लुवर प्रतिमा या दोन ठिकाणांना जोडणारा हा पुल तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांना राष्ट्राला अर्पण केला. १३३ फूट उंच आणि ७७ मीटर लांबीच्या या पुलावरून समुद्राचं विहंगम दृश्य अनुभवता येणार आहे.

****

मराठवाड्याच्या अनेक भागात काल वेळ अमावस्येचा सण साजरा झाला. लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात, 'येळवस' नावाने हा सण ओळखला जातो. लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मित्र-परिवारासोबत शेतात पूजा करून वनभोजनाचा आनंद घेतला. लातूरचे प्रसिद्ध व्यापारी अशोक उर्फ गट्टू शेठ अग्रवाल यांनी आकाशवाणीशी बोलताना याबद्दल अधिक माहिती दिली.

‘‘या सणाचं महत्व म्हणजे रब्बीच पूर्ण पीक बहरलेलं असते आणि आज या ठिकाणी शेतामध्ये कुप्पी करुन पाच पांडवाची आणि लक्ष्मीची या ठिकाणी काळी आईची पुजा केली जाते. आज या दिवशी सर्व नातेवाईक, मित्रपरिवार यांना शेतामध्ये बोलावून विशेष करुन आंबील, भज्जी, तिळाची पोळी वनभोजनाचा स्वाद हे सर्वजण येऊन घेत असतात.’’


****

बॉर्डर -गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारतावर १८४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं मालिकेत दोन - एक अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतला शेवटचा सामना तीन जानेवारीपासून सिडनी इथं सुरु होणार आहे.

****

मुंबई झालेल्या राज्यस्तरीय वरीष्ठ ज्युदो स्पर्धेत धाराशिव इथले ओमप्रसाद निंबाळकर यांनी ९० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. यामुळे राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेसाठी निंबाळकर यांचं स्थान निश्चित झालं आहे.

सातारा इथं घेण्यात आलेल्या ११ वर्षाखालील राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेत धाराशिव जिल्हा रोलबॉल संघटनेचा खेळाडू प्रणव मलदोडे यानंही सुवर्णपदक जिंकलं आहे.

****

जालना शहरातल्या फ्रेजर बॉईज शाळेच्या मैदानावर काल एका क्रिकेटपटूचं हृदयविकारानं निधन झालं. विजय पटेल नावाचे हे क्रिकेटपटू मुंबईतल्या नालासोपारा इथून ख्रिसमस ट्रॉफी खेळण्यासाठी जालन्यात आले होते.

****

नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत भाविकांची मोठी गर्दी होत आहे. येत्या पाच तारखेपर्यंत ही यात्रा सुरु राहणार असून, शासकीय कार्यक्रम दोन जानेवारीपासून सुरु होणार आहेत. या यात्रेबाबत खंडोबा संस्थानचे पुजारी संजय पाटील यांनी अधिक माहिती दिली...

‘‘ही साधारणत: बाराव्या शतकापासुनची परंपरा आहे अशी अख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते. हेमांडपंथी मंदिराचे बांधकाम बाराव्या शतकामध्ये झालेले आहे. आमच्या माळेगाव खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शनाची पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर भाविक या ठिकाणी श्रध्देने देवाचे दर्शन घेईल त्यासाठी या मंदिर ट्रस्टच्या वतीने याठिकाणी विनामुल्य अशा प्रकारची दहा दिवस भोजनाची किंवा अन्नछत्राची सोय देखील या ठिकाणी केलेली आहे.’’


****

नांदेड जिल्ह्यात बालविवाह थांबवण्यासाठी कायद्याची जनजागृती आणि प्रबोधन करण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या. ते काल याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावर्षी जिल्ह्यात ६३ बालविवाह थांबवण्यात आले असल्याची माहिती राऊत यांनी दिली.

****

उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसंदर्भात एक जिल्हास्तरीय समिती तयार करुन सर्व आस्थापनांमध्ये तपासणी करावी आणि दर महिन्याला तसा अहवाल सादर करावा, असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाचा काल स्वामी यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

****

नांदेड - अमृतसर - सचखंड एक्सप्रेस आज सकाळी साडे नऊ ऐवजी दुपारी एक वाजता सुटेल अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे दिली आहे.

****

No comments:

Text-آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 14 اگست 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 14 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...