Saturday, 28 December 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.12.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 28 December 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.

****

माजी पंतप्रधान पद्मविभूषण डॉक्टर मनमोहनसिंग यांच्या पार्थिव देहावर आज दिल्लीत निगमबोध घाटावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत आहेत. तत्पूर्वी डॉक्टर सिंग यांचा पार्थिव देह आज सकाळी त्यांच्या निवासस्थानाहून काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी या ठिकाणी डॉक्टर सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. अनेक काँग्रेस नेते, पदाधिकारी तसंच असंख्य कार्यकर्ते आणि नागरिकांनी डॉक्टर सिंग यांचं अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर डॉक्टर सिंग यांची अंत्ययात्रा निगमबोध घाट इथं पोहचली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी डॉक्टर सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. या अंत्यसंस्काराचं आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरुन प्रसारण करण्यात आलं. 

****

२०२३-२४ या वर्षात देशात सर्वाधिक कोळसा उत्पादन झालं आहे.  २०२२ - २३ या वर्षाच्या तुलनेत ११ पूर्णांक ७१ टक्के अधिक उत्पादन यंदा नोंदवण्यात आलं आहे. १५ डिसेंबरपर्यंत ९६३ पूर्णांक ११ मेट्रीक टन कोळसा उत्पादन देशभरात झालं असल्याचं कोळसा मंत्रालयानं आपल्या एका निवेदनात म्हटलं आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत परिवर्तनकारी उपायांच्या सहाय्यानं घरगुती, कच्च्या कोकचं उत्पादन येत्या पाच वर्षात १४० मेट्रीक टनापर्यंत जाण्याची शक्यता आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात सुरु असलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पांबाबत सर्व वाद आणि तक्रारींचं निराकरण करण्‍यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉ. मैनक घोष यांनी सांगितलं आहे.

जिल्हाधिकारी डॉ. घोष यांनी महाऊर्जा विभागाच्या वतीनं जिल्ह्यात परवानगी देण्‍यात आलेल्या पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची माहिती घेतली. तसंच प्रकल्प उभे करण्‍यासाठी पवन ऊर्जा कंपन्या कोणत्या प्रक्रिया राबवतात, कोणकोणत्या नियमांची अंमलबजावणी करावी लागते, याबाबत महाऊर्जाच्या अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली. प्रकल्पांशी संबंधित असलेल्या कोणात्याही शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही, याचा विचार केला जाणार असून पवन ऊर्जा कंपन्यांना जिल्हास्तरावर विविध स्वरुपाच्या परवानगी देण्यासाठी नियमावली बनवण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी घोष यांनी सांगितलं.

****

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे २६ डिसेंबर ते एक जानेवारीपर्यंत सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात माळेगाव यात्रेदरम्यान होणाऱ्या डॉ. शंकरराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या नियोजित २९ डिसेंबरच्या उद्घघाटन कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. आता हे प्रदर्शन दोन जानेवारीपासून सुरू होणार असून चार तारखेपर्यंत चालेल. शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.

या प्रदर्शनातील सर्वात महत्त्वाची फळे भाजीपाला आणि मसाला पिकं स्पर्धा दोन जानेवारीला होईल. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या पुरस्कार प्राप्त शेतकरी, स्टॉल धारक तसंच शेतातील फळं, भाजीपाला आणि पिकं, स्पर्धेसाठी आणणाऱ्या स्पर्धकांनी हा बदल कटाक्षाने लक्षात घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं.

****

दरम्यान, अकोल्यातही आज नियोजित असलेल्या कृषी प्रदर्शनातील सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा उद्घघाटन समारंभही रद्द करण्यात आला आहे. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर कृषी मंत्र्यांनी विविध दालनांना भेटी देऊन कृषी संशोधन, प्रयोगशील आणि नव उत्पादनांची माहिती घेतली.

****

नव वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात, त्यामुळे वाहतूक कोंडी अपघात टाळण्यासाठी आज सकाळपासून उद्या २९ तारखेच्या रात्री १२ वाजेपर्यंत धरमतर ब्रिज ते अलिबाग, अलिबाग ते मांडवा जेट्टी आणि अलिबाग ते रेवदंडा - मुरूड या मार्गावर अवजड वाहनांना वाहतूक बंदी करण्यात आली आहे. यातून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहनं वगळण्यात आली आहेत.

****

पर्यटनासाठी गेलेल्या पुणे जिल्ह्यातील एका मुख्यध्यापकाचा काशिद समुद्र किनाऱ्यावर बुडून मृत्यू झाला. धर्मेंद्र शहाजी देशमुख असं या मुख्यध्यापकाचं नाव आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातल्या पिसोली इथून धर्मेंद्र देशमुख आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांसह एकूण १३ जण काशीद समुद्र किनारी गेले होते. समुद्रात आंघोळीसाठी गेल्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर स्पर्धेच्या चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी चहापानापर्यंत भारतीय संघानं आपल्या पहिल्या डावात नऊ गडी बाद ३५८ धावा केल्या. नितीश रेड्डीनं आपल्या कसोटी कारकिर्दीतलं पहिलं शतक झळकावलं असून १०५ धावांवर तो खेळत आहे. तत्पुर्वी त्यानं वॉशिंग्टन सुंदरसोबत शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. 

****

No comments: