Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 30 December 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो आज स्पेडेक्स मिशन अंतर्गत अतिशय महत्त्वाचं प्रक्षेपण करणार आहे. हे प्रक्षेपण करुन अंतराळ क्षेत्रात एक मोठी झेप घेण्यासाठी इस्रो सज्ज झालं आहे. या प्रक्षेपणानंतर असं तंत्रज्ञान असलेला अंतराळ क्षेत्रातला भारत चौथा देश बनणार आहे. अंतराळामध्ये दोन उपग्रहांना किंवा अंतराळ यानांना जोडण्याचं म्हणजेच डॉपिंग करण्याचं तंत्रज्ञान सध्या केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन पीएसएलव्ही सी - 16 या प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या वर्षांतलं इस्रोचं हे शेवटचं प्रक्षेपण असून, जागतिक अंतराळ समुदायात यामुळे भारताचं स्थान अतिशय बळकट होणार आहे.
****
राज्यात खरीप हंगामात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणांमध्ये मुबलक पाणी साठा आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागानं निश्चित केलं असून, त्याच्या अंमजबजावणीला सुरुवातही झाली आहे. राज्यात २०२४-२५ या वर्षात ५० हजार वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागानं ठेवलं आहे. त्यापैकी सद्य:स्थितीत १४ हजार १०९ वनराई बंधारे बांधून तयार झाले आहेत. या बंधाऱ्याद्वारे सुमारे एक लाख हेक्टरवरील रब्बी पिके, भाजीपाला, फळबागा, फुलशेतीला पाणी उपलब्ध होणार आहे. तसंच भूगर्भातली पाणीपातळी वाढण्यासही मदत होईल, असं कृषी आयुक्तालयानं म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात ८६५, लातूर एक हजार २५३, कोकण - ९६३, नाशिक - दोन हजार १३४, पुणे एक हजार ८७२, कोल्हापूर क हजार पाच, अमरावती तीन हजार ५६६, तर नागपूर विभागात दोन हजार ४५० वनराई बंधारे तयार झाले आहेत.
****
जेजुरी इथं खंडोबा देवाची सोमवती यात्रा आज होत आहे. दुपारी श्री खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्याचं गडावरून प्रस्थान होईल. या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत.
****
मराठवाड्याच्या अनेक भागात आज वेळ अमावस्येचा सण साजरा होत आहे. शेतजमिनीप्रति कृतज्ञता म्हणून लातूर, धाराशिव तसंच नांदेड आणि बीड जिल्ह्याच्या काही भागात हा दिवस साजरा होतो. या दिवशी शेतात विशेष पूजा आणि सहभोजनाचं आयोजन केलं जातं.
****
अकोला इथं काल राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप झाला. या प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात राज्यातल्या साडेआठ लाख शेतकऱ्यांनी भेट देऊन कृषीचं प्रगत तंत्रज्ञान जाणून घेतलं.
****
नवीन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीनं मध्य रेल्वेनं फलाट तिकीट विक्रीवर निर्बंध घातले आहेत. येत्या दोन जानेवारीपर्यंत लातूर रेल्वे स्थानकासह मध्य रेल्वेच्या १४ स्थानकात फलाट तिकीट विक्री करण्यात येणार नसल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे.
दरम्यान, नवीन वर्ष स्वागतासाठी ठिकठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. नाशिकमध्ये धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढत असून, वणी इथं नववर्षाच्या निमित्तानं सप्तशृंगी देवीचं मंदिर २४ तास खुलं ठेवण्यात येणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांचं प्रमाणही मोठं आहे. या पार्श्वभूमीवर, समुद्रकिनारी होणाऱ्या घटना आणि मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी रत्नागिरी पोलीस दल सज्ज असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
बुलडाणा जिल्ह्यातल्या संत नगरी शेगाव इथं भक्तांची गर्दी लक्षात घेता संत श्री गजानन महाराज संस्थान मधल्या श्रीं चं समाधी स्थळ, आणि मंदिरातले सर्व विभाग भक्तांच्या दर्शनासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री खुलं राहणार आहे.
****
लातूर, धाराशिव आणि बार्शी इथल्या प्रवाशांसाठी महत्त्वाच्या असलेल्या हरंगुळ -पुणे-हरंगुळ रेल्वेगाडीला मुदतवाढ मिळाली आहे. या गाड्यांची मुदत आज संपत होती. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी या गाडीला मुदतवाढ देण्याबाबत मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे मागणी केली होती.
****
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत रायगड जिल्ह्यात एकूण पाच कार्यकारी निरीक्षक पथकं असून, दोन भरारी निरीक्षक पथकं नेमण्यात आली आहेत. त्यांना रायगड जिल्ह्यातल्या मद्यविक्री आस्थापनांमध्ये परराज्यातलं मद्य तसंच बनावट मद्य विक्री होणार नाही याबाबत सर्व पथकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
****
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात ड्रंक अँड ड्राईव्ह प्रतिबंधक मोहीम राबवण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, नवीन वर्षात अपघात मुक्त जिल्हा करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
पालघर जिल्ह्यातल्या बोईसर - तारापूर औद्योगिक वसाहतीमधल्या एका केमिकल कंपनीत काल लागलेल्या आगीत तीन कंपन्या जळून खाक झाल्या. कंपनीतल्या कामगारांनी वेळ राहता त्यांच्या पळ काढल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या आठ बंबांच्या मदतीने अग्नीशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर काल रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
****
No comments:
Post a Comment