Tuesday, 31 December 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.12.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 31 December 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

**** 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश.  

मस्साजोग हत्या प्रकरणी आरोप होत असलेले वाल्मिक कराड पुण्यात सीआयडी समोर शरण. 

शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीच्या नोंदणीसाठी सहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय.

शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वी तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेला प्रारंभ. 

आणि

सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साह.

****

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाला अधिक गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या प्रकल्पासंदर्भात आज मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या प्रकल्पाअंतर्गत विकासकांना येणाऱ्या अडचणी नियमित बैठका घेऊन सोडवाव्यात तसंच यासंदर्भातील अहवाल १५ दिवसामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन कार्यान्वित होईल, याकडे सर्वांनी जबाबदारी पूर्वक लक्ष देण्याच्या सूचना फडणवीस यांनी यावेळी दिल्या. 

****

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात आरोप होत असलेले वाल्मिक कराड यांनी पुणे इथं सीआयडी कार्यालयात पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. तत्पुर्वी त्यांनी स्वतःची एक ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध करून संतोष देशमुख हत्येसह स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय द्वेषापोटी आपल्याविरोधात आरोप केले जात असून पोलिस तपासात दोषी आढळल्यास न्यायालय जी शिक्षा देईल, ती भोगण्यासाठी आपण तयार असल्याचं कराड यांनी या संदेशात म्हटलं आहे. 

****

वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यानंतर विरोधी पक्षांकडून तपास यंत्रणेवर टीका होत आहे. सरकारने आता यापुढचं काम करावं, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे, आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलतांना आव्हाड यांनी, मस्साजोगसोबतच परभणीच्या प्रकरणातही सरकारने न्याय मिळवून देण्याची मागणी केली. 


खासदार सुप्रिया सुळे यांनीही मुंबईत पत्रकारांशी बोलताना, परभणी आणि बीड या दोन्ही जिल्ह्यात घडलेल्या या घटनांमध्ये राजकारण न आणता दोन्ही कुटुंबाना न्याय मिळाला पाहिजे, असं मत व्यक्त केलं. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा, अशी मागणी सुळे यांनी केली.

आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात थेट कारवाई केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. कराड यांच्या मालमत्तेवर लवकरात लवकर टाच आणावी, अशी मागणी धस यांनी केली. ते म्हणाले..

या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे त्यांच्या प्रॉपर्टी सीझ करण्याच्या संदर्भात सीआयडी त्यांच्या पाठीमागे फार जोरामध्ये लागले आणि त्यांना शरण येण्यास भाग पाडलेलं आहे. लवकरात त्यांच्या प्रॉपर्टी ह्या अटॅच झाल्या पाहिजे. प्रॉपर्टी अटॅच झाल्या शिवाय अन्य गुन्हे करत होते, ते उघडे पडणार नाही.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, या प्रकरणी पुराव्याच्या आधारावर पुढील कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ज्याच्या विरूद्ध पुरावा असेल त्याच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले…… 

काय वाट्टेल ते झाले तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही, तोपर्यंतची सगळी कारवाई पोलीस करतील, हा विश्वास मी त्यांना दिला आहे. जे जे पुरावे आहेत त्याच्या आधावर कुणालाही सोडणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. या संदर्भात पोलीस वेळोवेळी निर्णय करतील, पोलीस ब्रिफींग करतील. जाणीवपूर्वक ही केस सीआयडीला देण्यात आली आहे. त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आली आहे. कोणाचाही त्यांच्यावर दबाव चालून घेतला जाणार नाही. कुठलाही दबाव राहणार नाही.


दरम्यान, संतोष देशमुख हत्येप्रकरणी राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज पुढचे दोन दिवस बंद राहणार आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि लोकप्रतिनिधींवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा बसावा, यासाठी कडक निर्बंध बसवावेत, या मागणीसाठी सरपंच संघटनेनं राज्यभरात आजपासून काम बंद आंदोलन पुकारलं आहे. 

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने प्रत्येक महिन्यांच्या एक तारखेला शेतकरी आणि शास्त्रज्ञ असा सुसंवाद कार्यक्रम घेण्यात येतो. परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी विज्ञान केंद्र -२  च्या वतीने गेल्या १०५ महिन्यांपासून हा उपक्रम निशुल्क रित्या राबवला जात आहे. उद्या सकाळी साडे अकरा वाजता, कृषी विज्ञान केंद्रात १०६ व्या  सुसंवाद कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं, असं आवाहन केंद्राच्या विस्तार शिक्षण विभागाचे विषय विषयतज्ञ डॉ बसवराज पिसुरे यांनी केलं आहे.

सद्यस्थितीमधील पशुधन व्यवस्थापन, मोसंबी बहार व्यवस्थापन, आंबा मोहोर व्यवस्थापन,नैसर्गिक शेती व के वि के चे विविध उपक्रम या विषयावर सविस्तर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आपल्या शेतीसाठी लाभ करून घ्यावा.


****

राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीच्या नोंदणीसाठी सहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली. पणन विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर रावल बोलत होते. नोंदणीची ही मुदत आज संपणार होती. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी १२ जानेवारीपर्यंत केली जाणार असल्याची माहितीही रावल यांनी यावेळी दिली. आतापर्यंत राज्यात ६ लाख ६९ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, तीन लाख ३४ हजार ३३१ मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी झाली आहे. राज्यात सध्या ५६१ खरेदी केंद्र सुरू आहेत. 

****

तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ झाला. सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी माता शेजगृहातील चांदीच्या पलंगावर विसावली. येत्या सात जानेवारीला पहाटे तुळजाभवानी माता पुन्हा सिंहासनारूढ होऊन घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सुरुवात होईल. ११ जानेवारीला शाकंभरी नवरात्र महोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेली जलयात्रा काढण्यात येणार आहे.

****

आज ३१ डिसेंबर- सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं स्वागत करण्याचा दिवस. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वत्र उत्साह आणि जल्लोष दिसत आहे. विविध पर्यटन स्थळं गर्दीने फुलून गेली आहेत. ठिकठिकाणी स्थानिक प्रशासनानंही यासाठी जय्यत तयारी केली आहेत. 

न्यूझीलंड इथं नवीन वर्षाचं स्वागत जल्लोष आणि उत्साहात करण्यात आलं. याठिकाणी नागरिकांनी फटाक्यांची अतिषबाजी करत एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी नववर्षानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. सामाजिक विषमता दूर करून समतावादी समाज निर्माण करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, अशा शब्दात राज्यपालांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. 

अहिल्या नगर जिल्ह्यातल्या सर्व पर्यटन स्थळांवर नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. भंडारदरा धरणाच्या परिसरात पर्यटकांच्या स्वागतासाठी कापडी तंबू उभारण्यात आले आहेत. यासह घाटघर रतनवाडी व्हॅली इथं नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही आज रात्री वाहतूक शाखेच्या वतीने विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. मद्य किंवा अंमली पदार्थांचं सेवन करुन वाहन चालवणार्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं, वाहतूक शाखेनं कळवलं आहे.  

****

बीड इथं आज सरत्या वर्षाला निरोप देताना व्यसनमुक्ती फेरी काढण्यात आली. शिवसंग्रामच्या अध्यक्ष ज्योती मेटे यावेळी उपस्थित होत्या. व्यसनमुक्ती विषयी जनजागृतीचे फलक घेऊन बाल वारकरी आणि विद्यार्थ्यांसह नागरिक या फेरीत सहभागी झाले होते.

****

छत्रपती संभाजीनगर शहर बस सेवेत लवकरच ३२ इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी ही माहिती दिली. या बससाठी चार्जिंग व्यवस्थेसह इतर कामं प्रगतीपथावर असल्याचं, मिनियार यांनी सांगितलं. ते म्हणाले.. 

छत्रपतीसंभाजीनगरमध्ये ३२ इलेक्ट्रीक बसेस, प्लस प्रधानमंत्री योजनेच्या आपल्याकडे आणखी १०० सिटी बस येणार आहेत. परंतू या बसेस येण्यापुर्वी आपल्याला त्याची जी पुर्वतयारी पाहिजे ज्याच्यामध्ये चार्जिंग पाँईट असणे अपेक्षीत आहे. त्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. आणि जाधववाडी या ठिकाणी जो आता सिटीबसचा डेपो बनतोय त्याठिकाणी ते होणार आहे.आणि त्यामाध्यमातून आपल्याकडे बसेस येतील आणि त्यानुसार आपले रुट पण वाढतील आणि लोकांना अधिकाधिक चांगल्या सेवा आपल्याला त्याच्या माध्यमातून देता येतील.


लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेसाठी महिलांना स्मार्ट कार्ड देण्यात येत आहेत. यासाठी नोंदणीची मुदत १० जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली असल्याचं नगरपालिकेच्या वतीनं कळवण्यात आलं आहे. ही मुदत आज संपणार होती.

****

महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण मंडल अंतर्गत येणाऱ्या  वीजग्राहकांसाठी सर्व उपविभाग कार्यालयांत दोन आणि तीन जानेवारीला वीजबिल दुरुस्ती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत वीजबिलासंबंधित तक्रार असणाऱ्या ग्राहकांनी संबधित उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केलं आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वेनं उद्यापासून रेल्वेच्या वेळापत्रकात काही गाड्यांच्या वेळात बदल केला आहे. बदललेल्या वेळापत्रकाची प्रत मोठ्या स्थानकांवर लावण्यात आली असल्याचं कार्यालयातर्फे कळवण्यात आलं आहे. 

****


No comments: