Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 December 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
• संविधान हा देशाचा दीपस्तंभ-मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन
• नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या व्यावसायिक विमानाचं आगमन
• नांदेड जिल्ह्यात माळेगाव यात्रेला प्रारंभ-येत्या पाच तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन
• बॉर्डर-गावस्कर मालिकेत मेलबर्न कसोटी जिंकण्यासाठी भारताला ३०७ धावांची गरज
आणि
• बुद्धिबळाच्या जागतिक रॅपिड स्पर्धेत भारताची कोनेरू हंपी अजिंक्य
****
देशाचं संविधान हे आपला दीपस्तंभ आणि मार्गदर्शक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या ११७व्या भागात ते काल बोलत होते. येत्या २६ जानेवारीला देशात राज्यघटना लागू होऊन ७५ वर्षे पूर्ण होतील, त्यानिमित्तानं देशभरात अनेक उपक्रम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. यानिमित्तानं सुरू केलेल्या कॉन्स्टीट्यूशन सेव्हनटी फाईव्ह डॉट कॉम या संकेतस्थळाला युवा वर्गानं भेट द्यावी, नागरिकांनी राज्यघटनेची प्रास्ताविका वाचून त्याची ध्वनीचित्रफीत या संकेतस्थळावर अपलोड करावी असं आवाहन त्यांनी केलं.
‘‘देश के नागरिकों को संविधान की विरासत से जोड़ने के लिए constitution75.com नाम से एक खास website भी बनाई गई है। इसमें आप संविधान की प्रस्तावना पढ़कर अपना video upload कर सकते हैं। अलग-अलग भाषाओं में संविधान पढ़ सकते हैं,संविधान के बारे में प्रश्न भी पूछ सकते हैं। ‘मन की बात’ के श्रोताओं से, स्कूल में पढ़ने वाले बच्चों से, कॉलेज में जाने वाले युवाओं से, मेरा आग्रह है, इस website पर जरूर जाकर देखें, इसका हिस्सा बनें।’’
देशाच्या मनोरंजन क्षेत्राच्या योगदानाचा पंतप्रधानांनी मन की बात मध्ये उल्लेख केला. आपले ॲनिमेशनपट, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका जगभरात लोकप्रिय आहेत, त्यातून भारताच्या सर्जनशील उद्योगाची क्षमता दिसून येते असं ते म्हणाले. राज कपूर मोहम्मद रफी, अक्किनेनी नागेश्वर राव गारू, तपन सिन्हा यांच्या कामगिराचा त्यांनी गौरव केला.
भारतीय संस्कृती, प्रयागराज इथं सुरु होणारा कुंभमेळा, बस्तर इथं सुरू झालेल्या बस्तर ऑलिम्पिक स्पर्धा, आदी विषयांवर पंतप्रधानांनी यावेळी भाष्य केलं.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार देशात २०१५ ते २०२३ या काळात मलेरियाचे रुग्ण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ८० टक्के इतकी घट झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. देशवासियांनी एकत्रितपणे निर्धारानं या आव्हानाचा सामना केल्यानंच हे यश मिळाल्याचं ते म्हणाले. कर्करोगा विरोधातल्या लढाईत आयुष्मान भारत योजना मोठी भूमिका पार पाडत असून, त्यामुळे ९० टक्के रुग्णांना वेळेत उपचार मिळू लागले असल्याचंही त्यांनी सांगितलं.
देशभरातल्या शेतकऱ्यांनी छोट्या छोट्या सामुहिक प्रयत्नांतून मिळवलेल्या यशाकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. छोट्या प्रारंभातूनच मोठं परिवर्तन शक्य असल्याचं सांगत, यासाठी दृढ संकल्प आणि सांघिक भावनेनं काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
नव्या वर्षात मन की बातच्या माध्यमातून आणखी प्रेरणादायी प्रयत्न सामायिक करण्याचं वचन देत, पंतप्रधानांनी सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
****
राज्यात ठिकठिकाणी `मन की बात`चं सामुहिक श्रवण करण्यात आलं. लातूर शहरातल्या रिलायन्स त्रिपुरा महाविद्यालयात हा कार्यक्रम ऐकण्यासाठी नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपल्या देशाच्या सांस्कृतिक विकासाची प्रेरणा आज संपूर्ण जग घेत असल्याची प्रचिती आल्याचा अनुभव उपस्थित श्रोत्यांनी यावेळी व्यक्त केला. रत्नागिरी इथं, तसंच धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर शहरात श्रोत्यांनी सामूहिकपणे 'मन की बात' कार्यक्रमाचं थेट प्रसारण ऐकलं. वाशिम जिल्ह्यातल्या भाजपच्या कार्यालयातही कार्यक्रमाचं प्रसारण ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
****
भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिलं. माळी यांच्या सन्मानाला बाधा येईल, असं कुठलंही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. यूट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात, अशीही तक्रारही माळी यांनी केली.
****
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आज परभणी दौऱ्यावर येणार आहेत. परभणी हिंसाचार आणि मारहाण प्रकरणात मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या नातेवाईकांची ते भेट घेणार आहेत. त्यानंतर समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
रायगड जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर काल पहिल्या व्यावसायिक विमानाचं आगमन झालं. इंडिगो ए थ्री ट्वेंटी या विमानानं मुंबई विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर ते नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं. पाण्याचे फवारे मारून या विमानाला सलामी देण्यात आली.
दरम्यान, राज्याचा प्रत्येक भाग विमानाने जोडण्यासह अस्तित्वातील विमानतळांच्या विस्तारीकरण करण्याच्या कामाला गती देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबईत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. मोठ्या शहरांतील विमानतळांवरील भार कमी करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
****
अहिल्यानगर-पुणे या १२५ किलोमीटर अंतराच्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. खासदार नीलेश लंके यांनी ही माहिती दिली. अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू करण्यासंदर्भात लंके यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारचं लक्ष वेधलं होतं, त्याची दखल घेत या रेल्वेमार्गाचं सर्वेक्षण करण्यास मान्यता मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात पर्यटन, उद्योग आणि शाश्वत सिंचनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यासाठी एक कालबद्ध कृती कार्यक्रम आखला असून, पहिल्या टप्प्यात दहा हजार रोजगार निर्मिती करण्याचा निश्चय असल्याचं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं आहे. ते काल धाराशिव इथं बोलत होते. प्रत्येक विषयावर संबंधित क्षेत्रातल्या व्यक्तींचा सहभाग घेऊन १२ सुकाणू समित्या गठीत केल्या जाणार आहेत. जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या या विकास प्रक्रियेत जनतेने सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेला कालपासून सुरुवात झाली. श्री खंडोबाच्या यात्रेला पारंपारिक पद्धतीने सुरुवात झाल्यानंतर मुख्य रस्त्याने देवस्वारी निघाली. यावेळी पालखी दर्शनाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, यांची उपस्थिती होती. येत्या पाच तारखेपर्यंत ही यात्रा सुरु राहणार असून, शासकीय कार्यक्रम दोन जानेवारीपासून सुरु होणार आहेत.
****
बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत मेलबर्न कसोटी जिंकण्यासाठी भारताला ३०७ धावांची आवश्यकता आहे. आज सामनच्याच्या शेवटच्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २३४ धावांवर संपुष्टात आला. या डावात भारताकडून जसप्रति बुमराहनं पाच, मोहम्मद सिराजनं तीन, तर रविंद्र जडेजाने एक गडी बाद केला. भारताचा दुसरा डाव सुरु झाला असून, उपाहारापर्यंत तीन बाद ३३ धावा झाल्या होत्या. दरम्यान, बुमराहनं काल या सामन्यात विक्रमी कामगिरी नोंदवत कसोटीत दोनशे बळींचा टप्पा पार केला.
****
भारताची आघाडीची बुद्धिबळपटू कोनेरू हंपी हिनं न्यूयॉर्क इथं झालेल्या जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटाचं विजेतेपद पटकावलं आहे. इंडोनेशियाच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करून हंपीनं या स्पर्धेतलं दुसरं जेतेपद पटकावलं. ११ फेऱ्यांमध्ये तिनं साडेआठ गुणांची कमाई केली. ३७ वर्षांची हंपी, या स्पर्धेत दोनदा अजिंक्य ठरणारी, चीनच्या जू वेंजून हिच्यानंतरची दुसरीच बुद्धिबळपटू आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड इथं आज जयभीम दिन आणि मक्रणपूर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ३० डिसेंबर १९३८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्याच्या हद्दीवर असलेल्या मक्रणपूर इथं महार परिषद घेतली होती, त्यानिमित्तानं हा कार्यक्रम होत आहे. पोलिस अधिक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होईल.
****
नांदेड जिल्ह्यात सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत ही चळवळ पोहोचवण्यासाठी जिल्हा सहकार विकास समितीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्याला संगणकीकरणात राज्यात दुसरा क्रमांक मिळाला असल्याची माहिती शासनातर्फे देण्यात आली. या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक उपक्रम सुरू असून, याअंतर्गत जिल्ह्यातल्या ६४ विविध सहकारी संस्थाचं संगणकीकरण करण्यात आलं आहे.
****
शिवसंग्राम संघटनेच्या वतीने बीड इथं उद्या ३१ तारखेला व्यसनमुक्ती जनजागृती महारॅली काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनापर्यंत ही रॅली काढण्यात येणार आहे.
****
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात ड्रंक अँड ड्राईव्ह प्रतिबंधक मोहीम राबवण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, नवीन वर्षात अपघात मुक्त जिल्हा करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यात भटुंबरे इथं काल सकाळी भाविकांची बस आणि ट्रकच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले. पुणे जिल्ह्यातल्या कामशेत या गावातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असलेले प्रवासी या बसमध्ये होते.
****
No comments:
Post a Comment