Thursday, 26 December 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 26.12.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 26 December 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते नवी दिल्लीत समारंभपूर्वक वितरण करण्यात आलं. कला तसंच संस्कृती, धाडस, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक सेवा, क्रीडा आणि पर्यावरण अशा विविध सात श्रेणींमध्ये १७ बालकांना असाधारण कामगिरीसाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात मुंबईची १३ वर्षीय केया हटकर आणि अमरावतीच्या १७ वर्षीय करिना थापा हिचा समावेश आहे.  केया हटकर, डान्सिंग ऑन माय व्हील्स आणि आय एम पॉसिबल या दोन बेस्टसेलर पुस्तकांची लेखिका आहे. तिला कला आणि संस्कृती क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कृत करण्यात आलं. करिना थापरला तिच्या धाडसाबद्दल राष्ट्रीय बाल पुरस्कारानं गौरवण्यात आलं. करिनानं सिलेंडरच्या आगीतून स्थानिकांचे प्राण वाचवले होते. या बालकांचे साहस अद्वितीय असून भारतीयांसाठी प्रेरणादायी असल्याचं राष्ट्रपती याप्रसंगी म्हणाल्या. शीख धर्मियांचे दहावे गुरू, गुरू गोविंदसिंह यांची दोन धाकटी मुलं, बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंह यांच्या बलिदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. 

****

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी वीर बाल दिवस समारंभात पुरस्कारविजेत्या बालकांशी संवाद साधत आहेत. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते सुपोषित ग्राम पंचायत अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीर बालदिवसा निमित्त मुंबई इथल्या शासकीय निवासस्थानी साहिबजादे बाबा जोरावार सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाकडून देशभरात ‘देश का प्रकृती परीक्षण अभियाना’च्या पहिला टप्प्यात हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच विशेष शिबीराच्या माध्यमातून जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्यासह ४९५ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि जिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमानं या विशेष तपासणी शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. अभियानाचा पहिला टप्पा हा २५ नोव्हेंबर ते २५ डिसेंबरदरम्यान राबवण्यात आला.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि जनसामान्यांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या विषयांचा अग्रक्रम ठरवून प्रलंबित कामांना गती द्यावी, असे निर्देश आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी विभागप्रमुखांच्या बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज सर्व विभागप्रमुखांच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. विभागनिहाय आगामी १०० दिवसांत प्रलंबित आणि नव्यानं सुरु करण्यात येणाऱ्या कामांच्या प्रगतीबाबतचं संभाव्य नियोजन सादर करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

****

मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवस अखेर सहा बाद ३११ धावा केल्या. आज सकाळी यजमान संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सॅम कोन्टास, उस्मान ख्वाजा, मार्कस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं तीनशे धावांचा टप्पा गाठला. जसप्रीत बुमराहनं तीन तर, रवींद्र जडेजा, आकाशदीप आणि वॉशिंग्टन सुंदर  यांनी प्रत्येकी एक बळी टिपला. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीत आहेत.

****

लाईन ब्लॉकमूळे गाडी क्रमांक १२७८८- नगरसोल -नारसपूर एक्सप्रेस काही दिवस नगरसोल ऐवजी लासुर इथुन सुटणार आहे. यात हि गाडी २६,२७,२९आणि ३१ डिसेंबर रोजी तर १ ते ३ जानेवारी २०२५ पर्यंत हि गाडी नगसरसोल ऐवजी लासुर इथुन दुपारी दिड वाजता सुटेल. तर गाडी क्रमांक १७२३२ नगरसोल - नारसपूर एक्सप्रेस २८ आणि ३० डिसेंबर रोजी नगसरसोल ऐवजी लासुर इथुन दुपारी दिड वाजता सुटेल. नागरसोल ते लासुर दरम्यान हि गाडी अंशतः रद्द करण्यात आल्याचं रेल्वेनं कळवलं आहे.

****

हवामान

राज्यात आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २९ डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणं वगळता राज्यातील बहुतांश भागांत स्थिर हवामान राहील, त्यानंतर थंडीत वाढ होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजाची दखल घेऊन शेती कामांचं नियोजन करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.

****

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२६ व्या जयंती दिनानिमित्त अकोला इथं राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सव आणि चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित या महोत्सवाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते उद्या उद्‌घाटन होणार आहे. २९ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात फळबाग, भाजीपाला, फुलशेती तसंच वनौषधी, कापूस, ज्वारी, गहू, कडधान्य, तेलबिया, पाणलोट विकास, पशु संवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, कृषी अभियांत्रिकी आणि अवजारे इत्यादी विभागांसोबतच कृषी विभाग इतर कृषी विद्यापीठं, संलग्न कृषी संस्था आणि शासनाच्या इतर विभागांची दालने आहेत. कृषी संलग्नित व्यवसाय, शेतीपूरक जोडधंदे तसंच कृषीमालाच्या प्रक्रिया उद्योगाविषयीची दालनं, हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहेत

****

No comments: