Saturday, 28 December 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.12.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 December 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहनसिंग यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार;स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याची केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती

·      मस्साजोग हत्या प्रकरणी बीड इथं निषेध मोर्चा-घटनेची तातडीनं दखल न घेतल्यास, तीव्र आंदोलनाचा इशारा

आणि

·      दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं येत्या १५ जानेवारीपासून आयोजन-यंदाचा पद्मपाणि पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक सई परांजपे यांना जाहीर

****

माजी पंतप्रधान पद्मविभूषण डॉक्टर मनमोहनसिंग यांच्या पार्थिव देहावर आज दिल्लीत निगमबोध घाटावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी डॉक्टर सिंग यांचा पार्थिव देह आज सकाळी त्यांच्या निवासस्थानाहून काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी या ठिकाणी डॉक्टर सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. अनेक काँग्रेस नेते, पदाधिकारी तसंच असंख्य कार्यकर्ते आणि नागरिकांनी डॉक्टर सिंग यांचं अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर डॉक्टर सिंग यांची अंत्ययात्रा निगमबोध घाट इथं पोहचली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी डॉक्टर सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सैन्यदलाच्या वतीनं शोकधून वाजवून तसंच हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. डॉ सिंग यांच्या शवपेटीवरचा तिरंगा त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर शीख धर्माच्या प्रथेनुसार प्रार्थना पठण करून मुखाग्नी देण्यात आला. मनमोहन सिंह अमर रहे या घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमून गेला होता.

****

डॉ मनमोहन सिंग यांचं यथोचित स्मारक बांधण्यासाठी सरकार जागा देऊ करणार असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. स्मारकासाठी जागा देण्याची विनंती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी काल सरकारकडे केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लगेचच गृहमंत्री अमित शहा यांनी सिंग यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना ही माहिती दिली. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल घेतलेल्या या निर्णयाबाबत काँग्रेस पक्षालाही माहिती देण्यात आली असल्याचं, भाजप खासदार आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी सांगितलं आहे.

****

गरीब परिस्थितीतून मात्र बुद्धीमत्तेच्या जोरावर पंतप्रधान होऊन देशाला आर्थिक दिशा आणि आर्थिक शिस्त लावण्याचं काम डॉ. मनमोहन सिंग यांनी केलं, ते देश आणि जग विसरु शकत नाही, असं कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांना आज मुंबई इथं प्रदेश काँग्रेस मुख्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, यावेळी ते बोलत होते. आपल्या १० वर्षांच्या काळात त्यांनी देशाला मनरेगा, शिक्षण हक्क, अन्न सुरक्षा कायदा, माहिती अधिकार कायदा देऊन सर्वसामान्यांचं हित पाहिलं, असं पटोले म्हणाले.

****

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत परभणी घटनेच्या संदर्भात काही मागण्या केल्या. परभणी प्रकरणातील पीडित सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची भरपाई द्यावी, यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, १ जानेवारी रोजी होणाऱ्या भीमा कोरेगावच्या अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर समाजात चुकीची माहिती भडकावण्याच्या संभाव्य प्रयत्नांना आळा घालण्यासाठी आणि ते हाणून पाडण्यासाठी पोलिसांना निर्देश द्यावेत, असं आंबेडकर यांनी म्हटल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने "देश का प्रकृती परीक्षण अभियान"देशभर राबवण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यानं या अभियानात राज्यात दुसरा क्रमांक पटकवला आहे. या बाबत छत्रपती संभाजीनगर जिल्हा आयुष अधिकारी डॉ शेख अहद यांनी अधिक माहिती दिली -

या अभियानात डॉक्टर मोनम ढवळे यांनी ७३७ प्रकृती परिक्षण केले तर डॉक्टर रामेश्वर फाळके ५३३ प्रकृती परिक्षणे नोंदवली डॉ.सारा पठाण, डॉ जयश्री पवार, डॉ सोनाली गाडगीळ यांनी ३०० पेक्षा जास्त प्रकृती परिक्षण केले. यामुळे जिल्हा २३५९ प्रकृती परिक्षण करून राज्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशावाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम श्रृंखलेचा हा एकशे सतरावा भाग असेल.

****

मस्साजोग हत्या प्रकरणी तातडीनं दखल न घेतल्यास, आंदोलन तीव्र होऊन राज्यभर पसरेल, असा इशारा सर्वपक्षीय मोर्चातून देण्यात आला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी बीड इथं निघालेल्या सर्वपक्षीय सर्वधर्मीय मूकमोर्चानंतरच्या सभेतून हा इशारा देण्यात आला. या सभेचा आमचे प्रतिनिधी रवी उबाळे यांनी घेतलेला हा आढावा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून निघालेला हा मूकमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या ठिकाणी या महामूक मोर्चाचं रूपांतर विराट सभेत झालं. यावेळी व्यासपीठावर बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विजयसिंह पंडित, आमदार जितेंद्र आव्हाड, छत्रपती संभाजीराजे, मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील, माजी आमदार सय्यद सलीम, यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह दिवंगत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी आणि मुलगा विराज यांच्यासह देशमुख कुटुंबीय यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. वैभवी हिने यावेळी केलेल्या भाषणात आपल्या वडिलांना न्याय देण्याची मागणी केली.

(वैभवी देशमुख)

आपण सर्व एक आहोत. माझ्या सोबत रहा. माझ्या कुटुंबासोबत. आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या.

 

इतर मान्यवरांचीही यावेळी भाषणं झाली, या घटनेतल्या सर्व दोषींवर नि:पक्ष कारवाईची मागणी सर्वच नेत्यांनी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज घोषणा करण्यात आली. येत्या  १५ ते १९ जानेवारी २०२५ या दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका, पटकथाकार, निर्मात्या, लेखिका आणि नाटककार पद्मभूषण सई परांजपे यांना जाहीर करण्यात आला आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि दोन लाख रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. महोत्सवाचे संस्थापक आणि संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, अंकुशराव कदम आणि महोत्सवाचे मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात सई परांजपे यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. १५ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठातल्या रुख्मिणी सभागृहात या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. तर पुढील पाच दिवस प्रोझोन मॉल इथल्या, आयनॉक्स चित्रपटगृहात हा महोत्सव होणार आहे.

****

सुरेश धस यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी महिला कलावंतांवर कुत्सित टिपण्णी केल्याचं अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी म्हटलं आहे. धस यांनी नुकत्याच केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या अनुषंगानं महिला आयोगाकडे तक्रार नोंदवल्यानंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. धस यांची ही भूमिका अत्यंत निंदनीय, अशोभनीय आणि खेदजनक असल्याचं सांगत, राजकारणासाठी अभिनेत्रींच्या नावांचा वापर करू नये, असं आवाहन प्राजक्ता माळी यांनी केलं, तसंच धस यांच्याकडून क्षमायाचनेची अपेक्षाही व्यक्त केली आहे. माध्यमांनीही अशा प्रकरणात संयम बाळगण्याच्या गरजेकडे त्यांनी लक्ष वेधलं.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर स्पर्धेच्या चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेंव्हा भारतीय संघानं आपल्या पहिल्या डावात नऊ गडी बाद ३५८ धावा केल्या आहेत. नितीश रेड्डीनं आपल्या कसोटी कारकिर्दीतलं पहिलं शतक झळकावलं असून १०५ तो धावांवर खेळत आहे. तर मोहम्मद सिराज हा २ धावांवर खेळत आहे. भारतीय संघ पहिल्या डावात अजूनही ११६ धावांनी पिछाडीवर आहे.

****

ओडिशातील राउरकेला इथं आजपासून हॉकी इंडिया लीग सुरू होत आहे. दिल्ली एसजी पायपर्स आणि गोनासिका यांच्यात रात्री आठ वाजता बिरसा मुंडा स्टेडियमवर उद्घघाटन सामना खेळवला जाईल. ही स्पर्धा दोन टप्प्यात खेळवली जाईल. पहिल्या टप्प्यातले सामने आजपासून १८ जानेवारीपर्यंत होतील तर दुसरा टप्पा १९ जानेवारीपासून सुरू होईल, दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. उपांत्य फेरीचा सामना ३१ जानेवारीला होणार आहे तसंच अंतिम सामना एक फेब्रुवारी रोजी होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाचा आज समारोप झाला. कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारोप सोहळ्यात अभिनेते समीर चौगुले आणि श्याम राजपुत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. चार दिवस चाललेल्या या महोत्सवात २९५ महाविद्यालयातील एक हजार ८८० विद्यार्थ्यांनी ३६ कलाप्रकारात सादरीकरण केलं, उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या कलावंतांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान करण्यात आली.

****

ज्येष्ठ पत्रकार डॉ. किरण ठाकूर यांचं आज पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात त्यांना थकवा जाणवल्यानं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. विविध वृत्तपत्रं, वृत्तसंस्था आणि नियतकालिकांसोबत त्यांनी काम केलं. पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाचे ते माजी विभागप्रमुख तसंच पुणे श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं होतं.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...