Monday, 30 December 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.12.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 December 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

**** 

अवकाशातल्या अनोख्या प्रयोगासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था सज्ज.  

छत्रपती संभाजीनगराला नव्या जलवाहिनीतून मार्च महिन्यात पाणीपुरवठ्याचं नियोजन करण्याचे मंत्री अतुल सावे यांचे निर्देश.

मस्साजोग तसंच परभणी इथल्या पीडित कुटुंबीयांचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून सांत्वन.

अहिल्यानगर-परळी रेल्वेमार्गावर विघनवाडी ते राजुरी दरम्यान लोहमार्गाची चाचणी यशस्वी. 

आणि

मेलबर्न कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियाची बॉर्डर गावसकर मालिकेत दोन-एकने आघाडी.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो आज अवकाशातल्या एका अनोख्या प्रयोगासाठी सज्ज झाली आहे. स्पेडेक्स मिशन अंतर्गत इस्त्रोचा अग्निबाण, ४७६ किलोमीटर वर्तुळाकार कक्षेत एस डी एक्स 01 आणि एस डी एक्स 02 या दोन उपग्रहांना स्थापित करेल. त्यानंतर अंतराळातच हे उपग्रह जोडण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास, अंतराळ क्षेत्रात असं तंत्रज्ञान असलेला भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतरचा चौथा देश ठरेल. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन पीएसएलव्ही सी - 16 या प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या वर्षांतलं इस्रोचं हे शेवटचं प्रक्षेपण असून, जागतिक अंतराळ समुदायात यामुळे भारताचं स्थान अतिशय बळकट होणार आहे. 

****

वर्ष २०२५-२६ च्या आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत अर्थसंकल्पपूर्व बैठक पार पडली. विविध विभागांचे सचिव या बैठकीला उपस्थित होते. २०२५-२६ चा अर्थसंकल्प येत्या एक फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री सीतारामन यांचा हा आठवा अर्थसंकल्प असेल.

****

राष्ट्रीय छात्रसेनेच्या प्रजासत्ताक दिन संचलन शिबिराला आज नवी दिल्लीच्या करिअप्पा मैदानावर सर्वधर्म पूजनाने प्रारंभ झाला. २८ राज्यं आणि ८ केंद्रशासित प्रदेशांसह मधून आलेले २ हजार ३६१ छात्रसैनिक महिनाभर चालणाऱ्या या शिबीरात सहभागी होत आहेत. त्यात ९१७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. १४ मित्रदेशांमधले कॅडेट्सही युवा आदानप्रदान कार्यक्रमाअंतर्गत या शिबीरात सहभागी होत आहेत. 

****

छत्रपती संभाजीनगर शहराला नव्या जलवाहिनीतून मार्च महिन्यात पहिल्या टप्प्यात पाणीपुरवठ्याचं नियोजन करण्याचे निर्देश, इतर मागासवर्ग आणि बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. शहराच्या पाणी पुरवठ्याशी निगडित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला खासदार संदिपान भुमरे, जालन्याचे खासदार कल्याण काळे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. येत्या जून महिन्यात काम पूर्ण होऊन पाणी पुरठा सुरू होईल, असं सावे यांनी सांगितलं. ते म्हणाले... 

आमचा प्रयत्न हा राहणार आहे की ॲटलिस्ट पहिला टप्पा जो जॅकवेलचा आहे, तो मार्चपर्यंत सुरु व्हावा. जवळ जवळ ८८ टक्के पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. सात टँक ऑलरेडी कमीशन झालेल्या आहेत. २२ टँक मार्चपर्यंत पूर्ण होतील अशी परिस्थिती आहे. मार्च पर्यंत आमचा प्रयत्न हा राहणार आहे की एक टप्पा आपला पाण्याचा कमी करुन आणि जूनपर्यंत संपूर्ण काम पूर्ण करुन शहराला पाणी मिळायला सुरुवात होईल.

****

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणीप्रकरणातल्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. मस्साजोग इथं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.  या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं.

दरम्यान, आठवले यांनी आज परभणी इथं न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेले सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडे यांच्या कुटुबीयांचीही भेट घेतली. यावेळी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना पक्षातर्फे पाच लाख रुपये मदत करण्यात आली, तर वाकोडे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसंच कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं. 

****

बीडचे आमदार सुरेश धस यांनी आज जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतली. शिफारशीने बंदुकीचा परवाना मिळवलेल्यांची चौकशी करावी अशी मागणी धस यांनी यावेळी केली. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारावं, अशी आपली मागणी असल्याचं धस यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं. 

****

बीड जिल्ह्यातल्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी येत्या महिनाभरात मोठी कारवाई केली जाईल असा विश्वास, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केला आहे. आज जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतल्यानंतर दमानिया या पत्रकारांशी बोलत होत्या. 

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान सेवा पुढच्या काही महिन्यात सुरू होणं अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनात आवश्यक ते बदल करण्यात येत असल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. ते म्हणाले... 

येणाऱ्या वर्षा मध्ये नवीन चॅलेंजेस प्रत्येक शहराचे असतात. त्यांच्यात प्रमुख एअर पोर्ट जे आहे. एअर पोर्टला सुध्दा आता इंटरनॅशनल फ्लाईट नव्याने दोन तीन महिन्यात सुरू होणार आहे. त्या अनुसंघाने देखील आपण मॅन पॉवर डिप्लोमॅट मिमिग्रॅशन करतांना आणि इतर योजना आपल्या चालु आहेत. त्याच्या प्रमाणे आपण लवकरच नियोजन करू.  

****

अहिल्यानगर - बीड- परळी या रेल्वेमार्गावरील शिरूर तालुक्यातील विघनवाडी ते बीड जवळील राजुरी पर्यंत झालेल्या मार्गाची यशस्वी चाचणी आज करण्यात आली. बीड इथं झालेल्या या चाचणीच्या वेळी खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते. मार्च २०२६ पर्यंत हा मार्ग परळीपर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही खासदार सोनवणे यांनी यावेळी दिली. 

****

राज्यात यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणांमध्ये मुबलक पाणी साठा आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागाने निश्चित केलं असून, २०२४-२५ या वर्षात राज्यात ५० हजार वनराई बंधारे बांधण्याच्या अंमलबजावणीला सुरुवातही झाली आहे. यापैकी छत्रपती संभाजीनगर विभागात ८६५, लातूर १ हजार २५३, कोकण - ९६३, नाशिक - १ हजार १३४, पुणे १ हजार ८७२, कोल्हापूर १ हजार पाच, अमरावती ३ हजार ५६६, तर नागपूर विभागात २ हजार ४५० वनराई बंधारे तयार झाले आहेत.

****

नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत भाविकांची मोठी गर्दी होत आहे. येत्या पाच तारखेपर्यंत ही यात्रा सुरु राहणार असून, शासकीय कार्यक्रम दोन जानेवारीपासून सुरु होणार आहेत. या यात्रेबाबत खंडोबा संस्थानचे पुजारी संजय पाटील यांनी अधिक माहिती दिली...

ही साधारणत: बाराव्या शतकापासुनची परंपरा आहे अशी अख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते. हेमांडपंथी मंदिराचे बांधकाम बाराव्या शतकामध्ये झालेले आहे. आमच्या माळेगाव खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शनाची पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे.त्याबरोबर भाविक या ठिकाणी श्रध्देने देवाचे दर्शन घेईल त्यासाठी या मंदिर ट्रस्टच्या वतीने याठिकाणी विनामुल्य अशा प्रकारची दहा दिवस भोजनाची किंवा अन्नछत्राची सोय देखील या ठिकाणी केलेली आहे.  

****

मराठवाड्याच्या अनेक भागात आज वेळ अमावस्येचा सण साजरा झाला. लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात, 'येळवस' नावाने हा सण ओळखला जातो. लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मित्र-परिवारासोबत शेतात पूजा करून वनभोजनाचा आनंद घेतला. लातूरचे प्रसिद्ध व्यापारी अशोक उर्फ गट्टू शेठ अग्रवाल यांनी आकाशवाणीशी बोलताना याबद्दल अधिक माहिती दिली. 

या सणाचं महत्व म्हणजे रब्बीच पूर्ण पीक बहरलेलं असते आणि आज या ठिकाणी शेतामध्ये कुप्पी करुन पाच पांडवाची आणि लक्ष्मीची या ठिकाणी काळी आईची पुजा केली जाते. आज या दिवशी सर्व नातेवाईक, मित्रपरिवार यांना शेतामध्ये बोलावून विशेष करुन आंबील, भज्जी, तिळाची पोळी वनभोजनाचा स्वाद हे सर्वजण येऊन घेत असतात.

****

बॉर्डर -गावस्कर चषक क्रिकेट स्पर्धेत मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारतावर १८४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं मालिकेत दोन - एक अशी आघाडी घेतली आहे. कसोटी सामन्याच्या आज शेवटच्या दिवशी ३४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव १५५ धावांवर संपुष्टात आला. यशस्वी जयस्वालनं ८४ धावांची खेळी केली, त्याच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकून राहता आलं नाही. कसोटीत दहा बळी आणि ९० धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणारा पॅट कमिन्स सामनावीर ठरला. मालिकेतला शेवटचा कसोटी सामना तीन जानेवारीपासून सिडनी इथं होणार आहे.  

दरम्यान, या विजयासोबतच ऑस्ट्रेलियाच्या संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे. दक्षिण आफ्रिका संघानं पाकिस्तानचा पराभव करत यापूर्वीच अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. 

****

जालना शहरातल्या फ्रेजर बॉईज शाळेच्या मैदानावर आज सकाळी क्रिकेट खेळत असताना फलंदाजी करणाऱ्या एका ३५ वर्षीय खेळाडूचा हृदयविकारानं मृत्यू झाला. विजय पटेल असं मृत खेळाडूच नाव असून, तो मुंबईतल्या नालासोपारा भागातला रहिवासी आहे. ख्रिसमस ट्रॉफीनिमित्त हे क्रिकेट सामने खेळवले जात होते.

****

नांदेड जिल्ह्यात बालविवाह थांबवण्यासाठी कायद्याची जनजागृती आणि प्रबोधन करण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या. ते आज याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावर्षी कन्या दिनानिमित्त शपथ देणं तसंच आणि आपल्या अल्पवयीन बालकांचा विवाह न करणेबाबत पत्र लिहून कळवण्याचे उपक्रम राबवावेत, असे राऊत यांनी सांगितलं. जिल्ह्यात या वर्षात ६३ बालविवाह थांबवण्यात आले असल्याची माहिती राऊत यांनी यावेळी दिली. 

****


No comments: