Saturday, 28 December 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 28.12.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 December 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.

****

माजी पंतप्रधान डॉ मनमोहनसिंह यांच्या पार्थिव देहावर आज दिल्लीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

राष्ट्रपती, पंतप्रधान, आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह देशभरातून श्रद्धांजली अर्पण

देश का प्रकृती परीक्षण अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

संतोष देशमुख हत्या प्रकरणी लातूर जिल्ह्यात रेणापूर इथं सकल मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा

आणि

महिला क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा निर्भेळ विजय

****

माजी पंतप्रधान डॉ मनमोहनसिंह यांच्या पार्थिव देहावर आज दिल्लीत पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. डॉ. सिंग यांचा पार्थिव देह आज सकाळी त्यांच्या निवासस्थानाहून काँग्रेस मुख्यालयात आणण्यात येईल, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी डॉ सिंग यांचं अंत्यदर्शन घेता येईल. सकाळी साडे नऊच्या सुमारास काँग्रेस मुख्यालयातूनच डॉ सिंग यांची अंत्ययात्रा निघेल, असं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

अंत्यसंस्काराचं सकाळी ११ वाजेपासून आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरुन प्रसारण होईल.


दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रिमंडळातल्या अनेक सदस्यांनी काल डॉ सिंग यांच्या निवासस्थानी त्यांना श्रद्धांजली अर्पण करून, त्यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांची भेट घेऊन सांत्वन केलं.

देशसेवा, निष्कलंक राजकीय जीवन आणि कमालीची नम्रता या स्वभावगुणविशेषांमुळे डॉ सिंग नेहमीच स्मरणात राहतील, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही डॉ सिंग यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहनसिंग यांच्या कार्याला उजाळा देत, त्यांच्या निधनानं देशाचं मोठं नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी केलेलं कार्य आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असं पंतप्रधान आपल्या शोकसंदेशात म्हणाले...

‘‘एक नेक इंसान के रूप में, एक विद्वान अर्थशास्त्री के रूप में,और रिफॉर्म्स के प्रति समर्पित लीडर के रूप में, उन्हे हमेशा याद किया जाएगा। एक अर्थशास्त्री के रूप में उन्होने अलग अलग स्तर पर भारत सरकार में अनेक सेवाए दी। एक चुनौती  पूर्ण समय में उन्होने, रिझर्व बँक के गव्हर्नर की भूमिका निभाई। पूर्व प्रधानमंत्री, भारत रत्न श्री पीवी नरसिम्हा राव जी की सरकार के वित्तमंत्री रहते हुए उन्होने वित्तीय संकट से घिरे देश को एक नयी अर्थव्यवस्था के मार्ग पर प्रशस्त किया।’’


फाळणीचा कटू अनुभव गाठीशी घेऊन भारतात आलेल्या सर्वसामान्य कुटुंबातला एक किशोरवयीन मुलगा, आपल्या प्रज्ञेच्या बळावर अर्थशास्त्रासारख्या क्लिष्ट विषयात पारंगत होतो, देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा देतो आणि पंतप्रधानाच्या रुपात दहा वर्ष देशाचा कारभार सांभाळतो, ही काही सामान्य कामगिरी नाही. डॉ मनमोहनसिंह त्यामुळेच असामान्य ठरतात. प्रतिकुल परिस्थितीतही प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर राहणाऱ्या आपल्या देशाबद्दल राज्यसभेतल्या एका भाषणात ते म्हणाले होते.. 

‘यूनान मिस्र् रोमां सब मिट गए जहां से

अब तक मगर है बाकीं नामों निशा हमारा।

कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी

सदियों रहा है दुश्मन दौर- ए- जमा हमारा’।।


मनमोहनसिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळात केंद्र सरकारवर अनेक आरोप झाले, अनेकांनी टीका केली. मात्र मृदुभाषी, मितभाषी असलेले डॉ सिंग यांनी अशा आरोपांना किंवा टीकेला उत्तर न देणं पसंत केलं. संसदेच्या एका अधिवेशन काळात लोकसभेतल्या वादळी चर्चेनंतर बाहेर आलेल्या डॉ सिंग यांनी पत्रकारांच्या या संदर्भातल्या प्रश्नाला या शब्दांत उत्तर दिलं... 


हजारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी,जो कई सवालों की आबरू ढक लेती है


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, डॉ सिंग यांच्या अशाच स्मृतिंना उजाळा देत, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली... 


‘‘देश में मनमोहन सिंग जी की एक अपनी छबी रही है एक अर्थशास्त्री के रूप में। उसके बाद एक रिझर्व बँक गव्हर्नर के रूप में। वित्त सचिव के ग्रुप में। मंत्री के रूप में। प्रधानमंत्री के रूप में। उन्होंने अपने कर्तव्यों का बहुत अच्छी तरह से निर्वहन करने का प्रयास किया है। मै उनको विनम्र श्रद्धांजली अर्पण करता हूं। और उनका जो परिवार है, उस परिवार के दुख मे हम सभी लोग शामील है।’’

****

माजी कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी काल मुंबईत राजभवन इथं त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी, मंत्रालयात देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. 

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशावाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम श्रृंखलेचा हा एकशे सतरावा भाग असेल. 

****

आयुष मंत्रालय भारत सरकारच्या वतीने घेण्यात येत असलेल्या देश का प्रकृती परीक्षण या अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २० हजाराहून अधिक नागरिकांचं परीक्षण नोंदवण्यात आलं आहे. ६४१ जणांचं प्रकृती परीक्षण करणारे डॉ मोनम डव्हळे आणि ५३३ जणांचं प्रकृती परीक्षण करणारे डॉ. परमेश्वर फालके यांचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर यांनी अभिनंदन केलं आहे.

****

जलजीवन मिशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होत असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एक स्वतंत्र समिती गठित करावी, असे निर्देश छत्रपती संभाजीनगर जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण अर्थात ‘दिशा’ समितीचे अध्यक्ष खासदार संदिपान भुमरे यांनी दिले आहेत. ते काल या समितीच्या आढावा बैठकीत बोलत होते. 

दरम्यान, जिल्हा विद्युत सल्लागार समितीच्या बैठकीला भुमरे यांनी काल मार्गदर्शन केलं. जिल्ह्यात ग्रामीण भागात विशेषतः शेतीसाठीच्या वीज वितरणाच्या बळकटीकरणाला वेग द्यावा, असे निर्देश खासदार भुमरे यांनी यावेळी दिले. 

****

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध नोंदवत लातूर जिल्ह्यात रेणापूर इथं काल सकल मराठा समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी आणि मुलगा विराज हे ही या मोर्चात सहभागी झाले.

या प्रकरणी आज बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे, या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, खंडणी गुन्हा प्रकरणी वाल्मीक कराड यांच्या पत्नी, दोन अंगरक्षक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची काल सीआयडी पथकानं चौकशी केली.

****

महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची आयसीसी चॅम्पियनशिप मालिका भारतीय संघाने ३-० अशी जिंकली आहे. काल वडोदरा इथं झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात, वेस्ट इंडिज संघाने दिलेलं १६३ धावांचं आव्हान भारतीय संघाने ५ खेळाडू गमावत २९ व्या षटकात पूर्ण केलं. दिप्ती शर्मा हिला सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून तर मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून रेणुका ठाकूर सिंह हिला गौरवण्यात आलं.

****

बॉर्डर गावसकर मालिकेतल्या मेलबर्न क्रिकेट कसोटीत भारतीय फलंदाजी निषप्रभ ठरत आहे. यशस्वी जैस्वालच्या ८२ धावा वगळता, एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. कालच्या पाच बाद १६४ या धावसंख्येवरून भारतीय संघानं आज खेळ पुढे सुरू केला, उपाहारापर्यंत भारताच्या सात बाद २४४ धावा झाल्या आहेत. सामन्यात भारत अद्याप २३० धावांनी पिछाडीवर आहे. या मालिकेत दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीत आहेत.

****

गोंदिया इथं अंध मुला-मुलींच्या चौथ्या राष्ट्रीय गोलबॉल स्पर्धेला कालपासून सुरवात झाली. या स्पर्धेत देशाच्या १५ राज्यातील ३०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत अंतिम सामने आज खेळवले जाणार आहेत.

****

लातूर इथे आजपासूनचं नियोजित मुख्याध्यापकांचं राज्यस्तरीय संमेलन, माजी पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग यांच्या निधनामुळे स्थगित करण्यात आलं आहे. मुख्याध्यापक संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी ही माहिती दिली.

****

जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातल्या अन्वा इथून तीन बांगलादेशी तरुणांना दहशतवाद विरोधी पथकाने काल ताब्यात घेतलं. विभागाच्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या पथकानी ही कारवाई केली.

****

हवामान

छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात काल पहाटे, दिवसा आणि रात्रीही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, जळगाव जिल्ह्यात काल अवकाळी पावसामुळे हरभरा आणि तुरीचं नुकसान झालं.

राज्यात अनेक जिल्ह्यात गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 

****

No comments: